माेरपीस-पूजा काळे
महाराष्ट्रात जन्मल्याचा; महाराष्ट्रीय असल्याचा मला नेहमी अभिमान आहे आणि पुढेही राहील. अवघा महाराष्ट्र साऱ्या देशाची शान आहे जिथे मराठी भाषा आणि संस्कृती हातात हात घालून नांदतात. या भूमीने शिवरायांची शौर्यगाथा घडताना पाहिली, थोर विचारवंत आणि संतांनी लोकसंस्कृती, लोकजागरातून सामाजिक परिवर्तनाचे धडे गिरविले. साहित्य, कला, संस्कृती आणि परंपरेचं माहेरघर म्हणून महाराष्ट्र ओळखला जाऊ लागला. महाराष्ट्राची दुसरी महत्त्वाची ओळख म्हणजे परशुरामाचा वरदहस्त लाभलेली नैसर्गिक साधनसंपत्ती. सह्याद्रीच्या रांगा, गड, किल्ले, नदी, नाले याची कृपादृष्टी महाराष्ट्रावर असल्याने सुजलाम सुफलाम, कणखर देश अर्थात महाराष्ट्र आज जगात भारी आहे. त्यामुळे वर्षभर वेगवेगळ्या ऋतूत बहरणाऱ्या वैभवसंपन्न निसर्गाची चेतनागुणोक्ती भाषा समजणं खूप आवश्यक आहे. निसर्गाचे देणे एकदाच मिळते त्याचे सार्थक करणे प्रयत्नावर अवलंबून असते. तेव्हा भरभरून देणाऱ्या निसर्गावर आपलंही प्रेम असायलाचं हवं. कोकणातल्या सागरी किनारपट्टीवरच्या अद्वितीय रूपाची मोहिनी जगभरात सगळ्यांवर पडली आहे. कडेकपऱ्यात वसलेला अखंड, बुलंद महाराष्ट्र निसर्ग भ्रमंती करणाऱ्यांना आनंद देतो हे अढळ सत्य आहे.
पावसाळ्यातल्या वातावरणात मुंबईसह अवघा महाराष्ट्र निसर्गाला कवेत घेण्यास आतूर असतो. इथली थंड हवेची ठिकाणं देशाची भूषण मानली जातात. महाराष्ट्रातल्या नैसर्गिक चमत्काराच्या अनोख्या दुनियेत कुणाला ग्रीष्म भावेल, तर कुणाला पाऊस आपला मित्र वाटेल. डोळ्यांनी पाहायला अख्खा जन्म अपुरा पडेल एवढा भव्यदिव्य नैसर्गिक खजिना आपल्याकडे आहे. निसर्गाकडून पळीभर मिळताना जळी-स्थळी मिळणारा आनंद द्विगुणित व्हावा, यासाठी करा जिव्हाळा निसर्गाशी देईल तो सुखाच्या राशी याचा प्रत्यय येतो. मेघांनो, वृक्षांनो, वेलींनो, कळ्यांनो, फुलांनो तेरी भी चूप मेरी भी चूप कुणाला काही सांगू नका, कबूल? कबूल...! निसर्ग राजा ऐक सांगते गुपित जपलं रं, कुणी माझ्या मनात लपलयं रं... म्हणताना ती लाजते. ऋतू हिरवा... ऋतू बरवा म्हणत वारा गुणगुणतो, बेभान होतो. हुंकारातून ध्वनी प्रकटतो, असा बेफाम हा वारा, नदीला पूर आलेला... कशी येऊ... कशी येऊ... म्हणत सांगावा धाडतो प्रियकराला. मनात साठलेला आद्रतेचा पाऊस मिलनानंतर घन रूपात अवतरतो. रिमझिम पावसात कवी ना. धों. महानोर घन होऊन बरसतात. घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती, पंखावरती सर ओघळती, झाडांतून झडझडती... घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती... डोंगर लाटा वेढीत वाटा, वेढीत मजला नेती... घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले... आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला. निसर्गाच्या नानाविध कला कविमनातून व्यक्त होतात. मानवी भावभावनेला स्पर्शून जातात. जमिनीत अंकुर फुटण्याआधी बहिणाबाई लिहितात, धरित्रीच्या कुशीमध्ये, बिबियाणं निजली वर पसरली माती, जशी शाल पांघरली. तारुण्य काळातील प्रेमकळ्या आनंदाच्या तऱ्हा पावसाशी निगडित असल्याने, मानवी आयुष्य समृद्ध होण्यास मदत होते. रम्य सांजवेळी क्षितिजावरची केशर रंगाची उधळण मनास सुखावते. सागर किनारी धरती आणि नभ मिलनाचा आभास निर्माण होतो. चैतन्य लहरी उठू लागतात, उन्हं कलतात, गोधन घरी परततात. या विविधांगी रंगात सजलेल्या निसर्गाचा निर्माता कोण बरं असेल? चांदण्याप्रमाणे उसळणाऱ्या सागराच्या शुभ्रधवल फेसाळ लाटा, वालूकामय किनारा, घरट्याकडे परतणारे पक्षी, मावळतीच्या शांततेतल्या संधीप्रकाशात पसरलेला फुलांचा स्मृतीगंध सगळीकडे आषाढ पसरवतो. हिरवाईने सजलेला वट पौर्णिमेचा नखरा पाहण्यासारखा असतो. पावसाला लागलेल्या वसुंधरेच्या मिलन भेटीत तिच्यासोबत घालवलेल्या सुगंधी क्षणांचा चढता आलेख स्मृतिपटलावर उमटतो, त्यावेळी अनाकलनीय जलतरंग पाण्यावर उठतात. निसर्गाने घडविलेल्या गोष्टीत कृत्रिम साैंदर्यता काम करत नाही, तिला उठाव येत नाही. वनात, अरण्यात निसर्गाच्या स्वाभाविकतेचे घडणारे दर्शन पाहण्यासारखे असते. आसमंती आलेला पौर्णिमेचा चंद्र तारकांना आकर्षित करतो. त्याला ओढ असते मिलनाची. धरणीला प्रकाशमय करण्याची. तशीचं अंतरंगी सजणीला आस असते साजणाची. हृदयातली कालवाकालव दाखवता येत नाही. विचारांचे काहूर माजतं. थोडासा दुरावा देखील दुःखाचा डोंगर वाटू लागतो. क्षणभरही नजरेआड होऊ न देणारा ती आणि तो हृदयस्थ मखमली कप्प्यातले आठवणींचे तरंगणारे मधुकण वेचण्याच्या आनंदात गुंग असतात. निर्मलजल घेऊन सागर भेटीस निघालेली सरिता. नभांगणी आलेला सतरंगी इंद्रधनू हिंदोळा पाहून उंच डोंगरातील हिरवाई साद घालते. आभाळमाया दर्शनासाठी ढगाआड राहून याचना करू लागतो. पाण्याने भरलेले काळेकुट्ट ढग त्यांच्या इच्छेनुसार बरसतात. निळ्या आकाशात दवबिंदू साठतात. निसर्गात घडणाऱ्या ईश्वरीय शक्तीच्या दर्शनाने आपण सुखावतो. अंगभर झेलतो, मनात रुजवतो आणि प्रदीप्त पाळंमुळं चौफेर पसरण्याची स्वप्न पाहू लागतो. मन का पंछी उडू लागताचं तुझा माझा हात एक होतो. निसर्गाच्या वेगवेगळ्या भूमिकेचे मानविय दर्शन इथून दृष्टिपथात येते. कर्ताधर्ता निसर्ग अद्भुत विश्वात घेऊन जातो. श्वासाच्या स्पंदनात, हृदयातून उमटलेली आरोळी अंतरंगी साद घालते. अाविष्काराची ओढ संपत नाही. निसर्गात अहंशून्यता असल्याने प्रभूस्पर्श प्राप्त करून तो फुलतो. अशा मातास्वरूप निसर्गावर केवळ प्रेम करणं आपल्या हातात असतं. संबंधित एक धागा आपणास सांभाळावा लागतो, कारण अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनवण्यासाठी निसर्ग हेच गुणकारी औषध मानलं जातं. ग्रीष्मातल्या उन्हाचे चटके झेलताना, पावसाच्या पहिल्या शिडकाव्यातला घमघमणारा मातीचा सुगंध तनामनात भिनतो. अंकुर फुटण्याच्या काळात सृजनशीलतेचा आविष्कार पाहायला मिळतो. आनंद स्थिर आणि चिरकाल असल्याने एखाद्या कवीप्रमाणे सगळेचं पावसाविषयी आणि निसर्गाबद्दल बोलू लागतो. कुणी कविता करतं. कुणी त्याला काही उपमा देतं.
समयी दुःखावर फुंकर घालणारे हिरवे, पिवळे, निळे रानमळे दोन मनांची जुळवाजुळव करू लागतात. मग तो लोणावळ्याचा भुशी डॅम असो वा बेळगावचा आंबोली घाट, पावसाचा धुंद मनमुराद आनंद घेणारी प्रेमीयुगुल याचं परिसरात दिसतात. हौशी, कुटुंबवत्सल माणसं सहलींचं आयोजन करतात. निसर्गाच्या सान्निध्यात एक दिवसीय सहली काढली जाते. वाट पाहायला लावणारा पाऊस धो-धो कोसळल्यानंतर वाट अडवत नाही. तो ज्याच्या त्याच्या वयानिशी ज्याला त्याला अवगत होतो, प्राप्त होतो आणि व्यक्त होतो. तो लहानग्यांना कागदी होडी करायला शिकवतो. तरुणांच्या मनात प्रेमाचे मळे फुलवतो. मनात हुरहूर माजवतो. रात्रीच्या पावसात भेटायला बोलावतो, वेळी अवेळी रडू आणतो. जीव कासाविस करतो.
शाळेला दांडी मारायला लावतो. सगळीकडे पाणी भरताचं कामावर सुट्टी टाकायला लावतो. घरच्या गृहिणीला कांदाभजी करायला लावतो. उतारवयात सांधे दुखतात म्हणून घरात बसून एकटक खिडकी बाहेरचा पाऊस पाहणाऱ्या आजोबांना आजीच्या गतकाळाच्या आठवणीत रमवतो. पावसाशी संधान साधणारा कौटुंबिक संवाद इथं घडतो. जगण्याच्या धावपळीत प्रत्येकाची सरस अशी कथा तयार होते. पहिल्या पावसात, गंधाळली धरणी वेड लावती जीवा झाल्या अधोरेखित आठवणी. रिमझिम धारा बरसती, सया माहेरा अंगणी पाऊस मना मनातला गातो निसर्ग गाणी. असा हा निसर्ग आणि सोबतचा पाऊस एकावेळी बहरणारे, बरसणारे असल्याने कवींसोबत सामान्यांच्याही चेतना जागृत होताना दिसतात. निसर्गाच्या प्रेमळ रूपाला साज चढताचं ओठी गाणं येत, रिमझिम गिरे सावन... सुलग सुलग जाए मन... भीगे आज इस मोसम में लगी कैसी ये लगन. मग तुम्हालाही ऐकू येतेय का अशी हाक? जाणवतोय का निसर्गाचा ध्वनी प्रतिध्वनी. चला तर ! आठवणीत असलेलं किमान एक गाणं आजचं गुणगुणूया आणि निसर्गासोबत आपणही लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या रंगात मनसोक्त डुबूया.






