Friday, June 19, 2026

Eknath Shinde : ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!

Eknath Shinde : ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!

वर्धापनदिनी एकनाथ शिंदे यांचे 'ऑपरेशन टायगर'वरून सूचक विधान; तुडवण्याची भाषा करणाऱ्यांचे पाय जागेवर ठेवणार नाही

मुंबई : "शिवसेनेच्या वर्धापनदिनी मंचावर कोणकोण असणार आणि एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. काहीजण भुंकत होते, लांडग्यांचे ऑपरेशन... वैगरे. लेकींन याद रखना, झुंड मै कुत्ते आते है, शेर अकेला आता है... आपका टायगर आपके सामने खडा है! ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, आगे आगे देखो होता है क्या?" असे सूचक विधान उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले.

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को संकुलात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते, उपनेते, मंत्री, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उबाठा खासदार संजय राऊत यांनी पक्ष सोडणाऱ्या खासदारांना 'तुडवण्याचा' जो इशारा दिला होता, त्याला प्रत्युत्तर देताना, "तुडवायची हिंमत असेल तर समोर या, हा शिवसैनिक तुमचे पाय जाग्यावर ठेवणार नाही," असा प्रतिइशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. पंडित नेहरू यांचा विक्रम मोडीत काढत सर्वाधिक काळ देशसेवा करणारे पंतप्रधान ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे, तसेच महाराष्ट्रासह देशाला नक्षलमुक्त केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे यावेळी विशेष अभिनंदन करण्यात आले.

या मेळाव्यात शिंदे यांनी भाजप आणि त्यांच्यामधील अंतर्गत वादाच्या चर्चांवरही भाष्य केले. ते म्हणाले, "माझ्यामध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी काही लोक सातत्याने काड्या घालण्याचे काम करत आहेत. पण त्यांना हे माहीत नाही की, आमचा अजेंडा ही मुख्यमंत्र्यांची खुर्ची नसून महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडवणे हा आहे. तुम्ही देवेंद्रजींच्या कानात जे जे जाऊन सांगता, ते ते स्वतः येऊन माझ्या कानात सांगतात. त्यामुळे आमच्यात दुरावा आणण्याचे तुमचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. उलट, महायुतीची ही घोडदौड आता दुप्पट वेगाने सुरू राहणार आहे."

कंपाउंडर कधी ऑपरेशन करत नसतो, 'खरा डॉक्टर' मीच!

'ऑपरेशन टायगर'बाबत बोलताना शिंदे म्हणाले, "कोणीतरी म्हणाले की आम्ही लांडग्याचे ऑपरेशन केले, पण तो स्वतः एक कंपाउंडर आहे. कंपाउंडर कधी रुग्णाचे ऑपरेशन करू शकत नाही. श्रीकांत शिंदे डॉक्टर आहे.पण, मी डॉक्टर नसलो तरी आजही अचूक राजकीय 'ऑपरेशन' करतो आणि ते कसे करायचे हे मला चांगले ठाऊक आहे. वाघाचे कातडे पांघरून कोणी लांडगा वाघ होत नाही," असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

प्रॉपर्टी घेऊन तिकीट वाटणारे वारसदार असू शकत नाहीत

"केवळ रक्ताचे नाते सांगून किंवा सातबारा नावावर करून कोणी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार होत नाही. शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, तो आमच्या शिवसैनिकांच्या काळजाचा तुकडा आहे," अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केला. "आधी प्रॉपर्टी आणि पैसे घेऊन तिकीट वाटले जायचे. पण आमच्या शिवसेनेत वशिला, शिफारस किंवा मर्सिडीज गाडी लागत नाही. आम्ही राज्यसभेसाठी भीमाच्या लेकीला म्हणजेच ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देऊन पक्षाचा खरा विचार दाखवून दिला आहे. ज्यांनी गहाण पडलेला धनुष्यबाण सोडवला त्यांना तुम्ही शिव्या देता आणि ज्यांनी शिवसेना फोडली त्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे गुणगान गाता, मग तुम्ही कसले वारसदार?" असा सवाल त्यांनी केला.

त्यांच्याकडे फक्त काटे आणि 'चमचे' शिल्लक

मागील ऐतिहासिक बंडाची आठवण करून देताना ते म्हणाले, "मागे जेव्हा आम्ही उठाव केला, तेव्हाही आम्हाला अशाच धमक्या दिल्या गेल्या होत्या. पण मी मुंबई विमानतळावर उतरून एकटाच वांद्रे, वरळी करत पुढे गेलो. वरळीत मी काही वेळ थांबलोही होतो. पण त्या फेसबुक लाईव्ह वाल्यांचे कोणी भुंकले नाही आणि माझ्या आडवेही आले नाही. आज त्यांच्याकडे फक्त काटे आणि 'चमचे' शिल्लक राहिले आहेत, तर आमच्याकडे नैसर्गिक आणि निष्ठावंत शिवसैनिकांची फौज आहे. रावणाची लंका देखील गर्वामुळे जळून खाक झाली, तर तुम्ही आम्ही कोण आहोत?" असा हल्लाबोल त्यांनी केला.

श्रीकांत शिंदेंना कोणते पद देणार?

- शिंदे म्हणाले, रामदास कदम यांनी मला सुचवले होते की, श्रीकांत शिंदे यांना आपण युवासेनेचा प्रमुख करूया. पण मी जेव्हा यावर श्रीकांतशी चर्चा केली, तेव्हा त्याने 'आपण स्वतः पद घेण्यापेक्षा सामान्य कार्यकर्त्याला मोठे करूया,' असे सांगत ते पद नाकारले. एवढेच नव्हे तर, मागे जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदाचा विषय आला होता, तेव्हाही श्रीकांतने स्वतः ऐवजी 'हे मंत्रिपद ज्येष्ठ नेते प्रतापराव जाधव यांना दिले पाहिजे,' असा आग्रह धरला."

- "माझ्या पाठीशी कोणताही राजकीय गॉडफादर नव्हता. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची प्रेरणाच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. म्हणूनच, सामान्य शिवसैनिकाला न्याय देण्याची आणि त्याला पुढे नेण्याची दानत आज आमच्या शिवसेनेत आहे. कारण, सामान्य शिवसैनिक हाच या शिवसेनेचा खरा कणा आहे", असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा