Thursday, June 18, 2026

Nashik Vidhan Parishad Election : 99.84 टक्के मतदानाने रंगली विधान परिषद निवडणूक; आता उत्सुकता निकालाची

Nashik Vidhan Parishad Election : 99.84 टक्के मतदानाने रंगली विधान परिषद निवडणूक; आता उत्सुकता निकालाची

Nashik Vidhan Parishad Election : नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानात तब्बल ९९.८४ टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली होती. सुरुवातीला मतदारांचा प्रतिसाद काहीसा मंदावलेला दिसला, मात्र दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढली आणि जवळपास सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

८ केंद्रांवर १०० टक्के मतदान

या निवडणुकीत एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये ३१९ महिला आणि २९९ पुरुष लोकप्रतिनिधींचा समावेश होता. मालेगाव महापालिकेतील एका नगरसेवकाने मतदान न केल्याने शंभर टक्के मतदानाची संधी हुकली. जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रांपैकी आठ केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले, तर एका केंद्रावर ९८.८१ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मतमोजणी आणि निकालाकडे लागले आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळाल्या. राजकीय मतभेद बाजूला ठेवत मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच संख्याबळ अनुकूल असतानाही संभाव्य क्रॉस व्होटिंग आणि नाराजी टाळण्यासाठी महायुतीने आपल्या मतदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची रणनीती आखली होती.

मतदार संख्या

नाशिक महापालिका - १२२ मालेगाव महापालिका - ८४ मनमाड नगरपरिषद -३५ सिन्नर नगरपरिषद - ३४ येवला नगरपरिषद -३० पिंपळगाव बसवंत नगरपरिषद - २९ ओझर नगरपरिषद -२८ सटाणा नगरपरिषद -२८ इगतपुरी नगरपरिषद -२४ भगूर नगरपरिषद -२३ त्र्यंबकेश्वर नगरपरिषद - २३ नांदगाव नगरपरिषद - २३ दिंडोरी नगरपंचायत - १९ निफाड नगरपंचायत - १९ कळवण नगरपंचायत - १९ सुरगाणा नगरपंचायत -१९ पेठ नगरपंचायत -१८ देवळा नगरपंचायत -१८ देवळाली छावणी परिषद - १

दरम्यान, उच्चांकी मतदानामुळे आता उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून निकालात कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा