Thursday, June 18, 2026

Ahilyanagar Crime : 'मी माझ्या GFला मारून टाकलं'... एका फोन कॉलने उघडकीस आला थरारक गुन्हा

Ahilyanagar Crime : 'मी माझ्या GFला मारून टाकलं'... एका फोन कॉलने उघडकीस आला थरारक गुन्हा

अहिल्यानगर : राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे अशातच अहिल्यानगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्याला हादरा बसला आहे.  श्रीगोंदा तालुक्यात एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्याच्या संशयातून झालेल्या वादानंतर आरोपीने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला (Attack) केला. एवढंच नव्हे तर त्याने मृतदेह दोन दिवस घरात लपवून ठेवत वडिलांच्या मदतीने जंगलात नेऊन जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

 दोघांविरुध्द गुन्हा दाखल 

या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम सुखदेव ओहळ (वय 24) आणि त्याचे वडील सुखदेव ओहळ यांना अटक केली आहे. दोघांविरुद्ध खून आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मुलगी आणि शुभम यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघे काही महिन्यांपासून एकत्र राहत होते. मात्र, आरोपी शुभम हा तरुणीवर सतत संशय घेत असल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होते.

रागाच्या भरात प्रेयसीवर जीवघेणा हल्ला 

घटनेच्या दिवशी झालेल्या तीव्र भांडणादरम्यान शुभमने लोखंडी रॉड आणि फरशीच्या तुकड्याने तरुणीच्या डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मृतदेह गादीत गुंडाळून दोन दिवस घरातच लपवून ठेवला.

मृतदेहाची विल्हेवाट

पोलिसांनी सांगितले की, नंतर आरोपी नगर येथे गेला आणि वडिलांना सोबत घेऊन परत आला. दोघांनी मिळून मृतदेह जंगलात नेला आणि पेट्रोल टाकून जाळून टाकला. पुरावा नष्ट करण्याचा हा प्रयत्न पोलिसांच्या तपासात समोर आला आहे.

अन् त्या फोनने गुढ उकलले

दरम्यान, हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या मित्राला फोन करून गुन्ह्याची कबुली दिली. मित्राने तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे हा गंभीर गुन्हा काही तासांत उघडकीस आला. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून घटनेमागील इतर पैलूंचीही चौकशी केली जात आहे.टीप: अल्पवयीन व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असल्याने तिची वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >