Thursday, June 18, 2026

Ambernath News: डॉक्टर पतीचा 'तो' त्रास असाह्य; लग्नाच्या दीड महिन्यात नवविवाहितेची आत्महत्या

Ambernath News: डॉक्टर पतीचा 'तो' त्रास असाह्य; लग्नाच्या दीड महिन्यात नवविवाहितेची आत्महत्या

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath) एका २६ वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी होत असलेल्या कथित मानसिक आणि शारीरिक छळामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मृत महिलेच्या डॉक्टर पतीला अटक केली आहे. (Doctor Husband Arrested)

नवऱ्याचा सततचा छळ

विशाखा टिळेकर असे मृत विवाहितेचे नाव असून तिचा विवाह ३० एप्रिल २०२६ रोजी अंबरनाथ येथील डॉ. नितीन टिळेकर यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच माहेरून पैसे आणि दागिने आणण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच लग्नात अपेक्षेप्रमाणे मानपान मिळाले नसल्याच्या कारणावरून तिचा छळ सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही 

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पतीने पत्नीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. विशाखाला माहेरच्यांशी संवाद साधण्यास तसेच शेजाऱ्यांशी बोलण्यासही मज्जाव करण्यात आला होता. शेजारच्या महिलेशी बोलल्याच्या कारणावरून तिला काही दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

आत्महत्येपूर्वी आईला फोन...

आत्महत्येपूर्वी विशाखाने आपल्या आईला फोन करून आपल्यावर होत असलेल्या त्रासाची माहिती दिली होती. तिला माहेरी आणण्यासाठी तिचे आई-वडील तयारी करत होते. मात्र त्याआधीच तिने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले.

पतीला अटक

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंड्यासाठी छळ करणे आणि इतर संबंधित कलमांनुसार पती डॉ. नितीन टिळेकर तसेच सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी असलेल्या पतीला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महिलांवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा