मिरा रोड: मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी. रोडच्या मागील रस्त्यावर 17 ऑगस्ट रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास भरधाव वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना धडक दिल्याची घटना घडली. धडकेनंतर चालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Mira Road Accident)
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक चारचाकी वाहन वेगाने रस्त्यावरून जाताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला काही नागरिक उभे असतानाच हे वाहन अचानक त्यांच्या दिशेने येते आणि काही जणांना धडक देते. धडकेनंतर नागरिक रस्त्यावर पडल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, चालकाने वाहन थांबवण्याऐवजी वेग वाढवत तेथून पळ काढल्याचे समोर आले आहे. (Accident video)
मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. या सुधारित ...
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील रस्त्यांवर बेफाम वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांचा वचक आहे की नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी भरधाव वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या अपघातात नेमके किती जण जखमी झाले आणि त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच संबंधित वाहन आणि चालकाची ओळख पटली आहे का, याचीही माहिती मिळालेली नाही. (Road Accident)
व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी संबंधित वाहनाचा शोध घेऊन चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे. (Hit And Run)





