Saturday, June 13, 2026

प्रज्ञेच्या बळाचा नवा सुलतान!

प्रज्ञेच्या बळाचा नवा सुलतान!

वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ग्रँडमास्टर झालेल्या आर. प्रज्ञानंदने जागतिक बुद्धिबळात भारताचा तिरंगा फडकावला. कौटुंबिक संघर्ष करताना आईच्या खंबीर साथीच्या जोरावर त्याने जर्मनीच्या बलाढ्य व्हिन्सेंट कीमरला पराभूत करत ऐतिहासिक नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय क्रीडापटू म्हणून बहुमान मिळवला. त्याचे कौशल्य आणि विजिगीषू वृत्ती अवघ्या जगाला थक्क करणारी ठरली. त्याचे बुद्धिबळातील कौशल्य चितारणारा लेख.

 

नॉर्वे चेस स्पर्धेतील भारताच्या आजवरच्या कामगिरीचा विचार केल्यास एका खेळाडूशिवाय कोणी चमकदार कामगिरी केलेली नाही हे लक्षात येते. जगातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि कठीण अशा या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व प्रामुख्याने पाच वेळचे जागतिक विजेते विश्वनाथन आनंद यांनी केले आहे. २०१३ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत आनंद यांनी जगातील सर्वोत्तम खेळाडूंना वेळोवेळी तगडी झुंज दिली. २०१९ आणि २०२२ च्या आवृत्त्यांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी करत तिसरे स्थान पटकावले होते; परंतु या स्पर्धेच्या जेतेपदाने भारताला आजवर नेहमीच हुलकावणी दिली. या स्पर्धेत भारताचा खरा सुवर्णकाळ २०२६ च्या स्पर्धेने लिहिला गेला. युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने या स्पर्धेत केवळ पदार्पणच केले नाही, तर दहाव्या आणि अंतिम फेरीमध्ये जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरचा पराभव करून नॉर्वे बुद्धिबळ २०२६ स्पर्धा जिंकली. प्रज्ञानंदच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताचे या स्पर्धेतील जेतेपदाचे प्रदीर्घ काळचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आणि जागतिक बुद्धिबळाच्या पटावर भारताचे वर्चस्व अधोरेखित झाले. भारताचा युवा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंद याने आपल्या अद्भुत आणि दमदार खेळाच्या जोरावर बुद्धिबळ जगतात एक नवा इतिहास रचला आहे. नॉर्वे चेस ही जागतिक बुद्धिबळ क्षेत्रातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. २०१३ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम दहा खेळाडूंनाच निमंत्रित केले जाते. ही स्पर्धा खेळाडूंसाठी अत्यंत कठीण मानली जाते, कारण प्रत्येक फेरीत जगातील सर्वोत्तम खेळाडूशी सामना होतो. अशा रणभूमीत प्रज्ञानंदने मिळवलेले यश त्याच्या खडतर प्रवासाचे फलित आहे.नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा २०१३ पासून सुरू झाली असून, महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद तसेच विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश यांनाही या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. भारताचे पाच वेळचे जागतिक विजेते विश्वनाथन आनंद यांनी यापूर्वी येथे अनेकदा झुंज दिली; परंतु स्पर्धेचे जेतेपद मिळवणे भारतासाठी आजवर स्वप्नच राहिले होते. अशा आव्हानात्मक स्पर्धेत जगज्जेत्यांना धूळ चारत प्रज्ञानंदने विजेतेपदावर आपले नाव कोरले आणि तो ही स्पर्धा जिंकणारा पहिलाच भारतीय बुद्धिबळपटू ठरला. आर. प्रज्ञानंदने रचलेला इतिहास अभूतपूर्व आहे. त्याने केवळ स्पर्धा जिंकली नाही, तर पाच वेळच्या जागतिक विजेत्या मॅग्नस कार्लसनला त्याच्याच मायभूमीत, एकाच स्पर्धेत तब्बल दोनदा पराभवाचा धक्का दिला. प्रज्ञानंदच्या या विजयाने जागतिक बुद्धिबळात भारताचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बुद्धिबळाच्या पटावर रशिया आणि युरोपियन देशांची असलेली जुनी मक्तेदारी मोडून काढत, या १८ वर्षांच्या भारतीय तरुणाने जागतिक व्यासपीठावर भारताची ताकद आणि बौद्धिक क्षमता दाखवून दिली आहे. हा ऐतिहासिक विजय भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी एक सुवर्णक्षण ठरला आहे. या स्पर्धेत प्रज्ञानंदचा खेळ कमालीचा आक्रमक आणि तितकाच संयमी होता. स्पर्धेच्या सुरुवातीलाच त्याने अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला क्लासिक डावात पराभूत करून खळबळ उडवून दिली. कार्लसन आपल्याच देशात पराभूत झाल्याने क्रीडा जगतात प्रज्ञानंदचे प्रचंड कौतुक झाले; परंतु प्रज्ञानंद एवढ्यावरच थांबला नाही. स्पर्धेच्या उत्तरार्धात जेतेपदासाठी कमालीचा मानसिक दबाव असताना त्याने पुन्हा एकदा कार्लसनला आर्मागेडन (टायब्रेकर) डावात पराभूत करत आपली परिपक्वता आणि पोलादी मनोधैर्य दाखवून दिले. केवळ कार्लसनच नव्हे, तर जगातील इतर सर्वोत्तम खेळाडूंचाही एकेक करून पाडाव करत त्याने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आणि अत्यंत दिमाखात जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम दिवसाची सुरुवात १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानंदने अत्यंत महत्त्वाच्या क्षणी उत्कृष्ट खेळ दाखवला. त्याने क्लासिकल प्रकारातील विजय मिळवत तीन पूर्ण गुणांची कमाई केली आणि एकूण १८ गुणांसह एलिट बुद्धिबळातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या किताबांपैकी एकावर नाव कोरले. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना, प्रज्ञानंदने खेळाच्या मधल्या टप्प्यात कीमरच्या चुकांचा पुरेपूर फायदा घेतला आणि ४५ व्या चालीमध्ये आपल्या वर्चस्वाचे रूपांतर एका निर्णायक विजयात केले. या विजयामुळे त्याने १८ गुणांची कमाई करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. त्याने अमेरिकेच्या वेस्ली सो याच्यापेक्षा एक गुण अधिक मिळवला आणि विजेतेपदासह एक लाख डॉलर्सचे सर्वोच्च पारितोषिकही आपल्या नावे केले. या प्रतिष्ठित स्पर्धेचा विजेता होणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. वेस्ली सो आणि अलीरेझा फिरुझा यांच्यातील सामना बरोबरीत सुटल्यामुळे सोच्या विजेतेपदाच्या आशा मावळल्या; त्यानंतर सलग चार क्लासिकल सामने जिंकून २० वर्षीय प्रज्ञानंदने स्पर्धेत अव्वल स्थान गाठले. प्रज्ञानंदने जागतिक विजेता देशबांधव डी. गुकेशचा पराभव करून सोच्या पाठोपाठ दुसरे स्थान गाठले होते. प्रज्ञानंदच्या या स्पर्धेतील कामगिरीमध्ये नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचा सात वेळचा विजेता आणि जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनचा क्लासिकल प्रकारात दोनदा पराभव करण्याचा समावेश होता. या कामगिरीमुळे एकाच स्पर्धेत कार्लसनला दोनदा हरवणारा तो इतिहासातील केवळ तिसरा खेळाडू ठरला; याआधी विश्वनाथन आनंद (लिनेरेस-मोरेलिया २००७) आणि वेसेलिन टोपालोव्ह (बिल्बाओ मास्टर्स ग्रँड स्लॅम फायनल २००८) यांनी अशी कामगिरी केली होती. १० ऑगस्ट २००५ रोजी चेन्नईत जन्मलेल्या प्रज्ञानंदचा ग्रँडमास्टर बनण्यापर्यंतचा प्रवास प्रचंड कष्ट, जिद्द आणि त्यागाने भरला आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या प्रज्ञानंदला मोठी बहीण वैशाली (महिला ग्रँडमास्टर)मुळे बुद्धिबळाची गोडी लागली. प्रज्ञानंदचे वडील रमेशबाबू हे पोलिओग्रस्त असून बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करतात. सुरुवातीच्या काळात घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने प्रज्ञानंद आणि वैशाली या दोघांच्याही प्रशिक्षणाचा, महागड्या साहित्याचा आणि आंतरराष्ट्रीय परदेशी दौऱ्यांचा खर्च पेलणे कुटुंबासाठी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक होते. अशा परिस्थितीत आई नागलक्ष्मी प्रज्ञानंदच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. प्रज्ञानंदच्या यशामागे त्याची कठोर मेहनत आणि रोज आठ ते दहा तास सतत बुद्धीला दिलेली चालना आहे. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी तो जगातील सर्वात तरुण इंटरनॅशनल मास्टर बनला, तर वयाच्या १२ व्या वर्षी ग्रँडमास्टर झाला. या प्रतिष्ठेच्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची प्रज्ञानंदची ही दुसरी वेळ होती. सहा खेळाडूंच्या एलिट गटात प्रज्ञानंदची सुरुवात काहीशी संथ झाली होती; मात्र स्पर्धेच्या उत्तरार्धात त्याने वेग पकडत सलग चार विजय मिळवले. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत तब्बल सात वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या आणि जगातील अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसनचा प्रज्ञानंदने या स्पर्धेत दोनदा पराभव करून आपल्या क्षमतेची प्रचिती दिली. ‌‘या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रज्ञानंदचे हार्दिक अभिनंदन! हा खरोखरच एक अविश्वसनीय टप्पा असून प्रज्ञानंदच्या सातत्यपूर्ण उत्कृष्टतेची साक्ष देतो. त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.‌’ या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले. तर ‌‘या निकालामुळे मी खूप आनंदी आहे. विशेषतः ज्या पद्धतीने हे यश मिळाले, त्याबद्दल अधिक आनंद वाटतो. सलग चार सामने जिंकणे आणि शेवटच्या स्थानावरून पुनरागमन करत विजेतेपद मिळवणे याची चार दिवसांपूर्वी कल्पनाही केली नव्हती. आतापर्यंत मिळालेल्या सर्व विजयांमध्ये या स्पर्धेतील विजय सर्वोच्च ठरेल‌’, अशा भावपूर्ण शब्दात प्रज्ञानंदने आपल्या ऐतिहासिक विजयाचे वर्णन केले. आर. प्रज्ञानंदचा हा थक्क करणारा प्रवास भारतातील नव्या दमाच्या बुद्धिबळपटूंसाठी यशाचा एक उत्तम वस्तुपाठ आहे. आजच्या आधुनिक आणि गतिमान डिजिटल युगात, सोशल मीडिया तसेच मनोरंजनाचे शेकडो पर्याय लक्ष विचलित करण्यासाठी उपलब्ध असताना स्वतःला या सगळ्यांपासून पूर्णपणे दूर ठेवणे अत्यंत कठीण असते. मात्र, प्रज्ञानंदने केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले.कौटुंबिक किंवा आर्थिक आव्हाने तसेच कोणतीही शारीरिक प्रतिकूलता तुमच्या यशाच्या मार्गात कधीही अडथळा ठरू शकत नाही, हे त्याने आपल्या कर्तृत्वाने जगाला दाखवून दिले आहे. नवीन पिढीतील उदयोन्मुख खेळाडूंनी प्रज्ञानंदकडून कठोर आत्मशिस्त आणि बुद्धिबळाच्या पटावर रोज खडतर मेहनत घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. सामन्यादरम्यान येणाऱ्या मानसिक दबावाचा आणि अपयशाचा धैर्याने सामना करण्याबाबतचा धडा त्याच्या जीवनशैलीतून मिळतो. जागतिक कीर्तीच्या बलाढ्य खेळाडूंसमोर खेळतानाही कमालीचा संयम, अचूक आक्रमकता आणि मानसिक संतुलन राखल्यास अशक्य वाटणारे कडेही सर करता येतात, हीच सर्वात मोठी प्रेरणा देशातील तरुण खेळाडूंनी घेतली पाहिजे. प्रज्ञानंदचे हे जागतिक यश आगामी काळात भारतात बुद्धिबळाची नवी लाट निर्माण करेल आणि अनेक नवे ग्रँडमास्टर्स घडवण्यास नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

Comments
Add Comment