Saturday, June 6, 2026

U18 Asia Cup : U18 आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताचा दुहेरी विजय

U18 Asia Cup : U18 आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताचा दुहेरी विजय

पुरुषांची सुवर्ण तर महिलांची कांस्यवर मोहोर

काकामिगाहारा : भारतीय युवा हॉकीसाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. १८-वर्षांखालील पुरुष आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने यजमान जपानचा ४-१ असा पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला, तर १८-वर्षांखालील महिला संघाने कोरियावर ३-० अशी मात करत कांस्यपदाची कमाई केली. या दुहेरी यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन करत त्यांच्या चमकदार कामगिरीचे कौतुक केले. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. आशीष तानी पुर्तीने (२', २८', ३४') हॅट्ट्रिक साकारत जपानी बचावफळीची अक्षरशः दाणादाण उडवली. संघाचा कर्णधार केतन कुशवाहाने (३०) आणखी एक गोल करत भारताची आघाडी मजबूत केली. जपानकडून नुमादा गाकूने (५२') एकमेव गोल केला. भारताच्या वेगवान आक्रमण, अचूक पासिंग आणि भक्कम बचावाच्या जोरावर संघाने स्पर्धेचे विजेतेपद दिमाखात पटकावले.

या शानदार विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष संघाचे अभिनंदन करत म्हटले की, “आपल्या युवा हॉकीपटूंनी केलेली ही कामगिरी अत्यंत गौरवास्पद आहे. संपूर्ण स्पर्धेत संघाने उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि सांघिक खेळाचे दर्शन घडवले. अंतिम सामन्यातील विजय संस्मरणीय ठरला असून देशातील तरुणांमध्ये हॉकीची वाढती लोकप्रियता यामुळे अधोरेखित झाली आहे.” दुसरीकडे, १८-वर्षांखालील महिला संघाने तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कोरियाचा ३-० असा धुव्वा उडवत कांस्यपद पटकावले. संदीपा कुमारी (२), कर्णधार स्वीटी कुजूर (१६) आणि नौशीन नाझ (३३) यांनी गोल करत भारताचा विजय निश्चित केला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय महिला संघाने ३६ गोलांची नोंद करत आपली आक्रमक क्षमता, भक्कम बचाव आणि उज्ज्वल भविष्याची झलक दाखवली.

महिला संघाच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, “भारतीय महिला १८-वर्षांखालील हॉकी संघाने संपूर्ण स्पर्धेत जिद्द, चिकाटी आणि संघर्षशील वृत्तीचे दर्शन घडवले. कांस्यपदाची ही कामगिरी भारतीय महिला हॉकीच्या वाढत्या सामर्थ्याचे आणि युवा खेळाडूंच्या अफाट क्षमतेचे प्रतीक आहे.” दरम्यान, दोन्ही संघांच्या यशाचा गौरव करण्यासाठी हॉकी इंडियाने रोख पारितोषिकांची घोषणा केली आहे. सुवर्णपदक विजेत्या पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला ३ लाख रुपये, तर सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १.५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच कांस्यपदक विजेत्या महिला संघातील प्रत्येक खेळाडूला १ लाख रुपये आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. आशिया कपमधील या उल्लेखनीय यशामुळे भारतीय युवा हॉकीला नवी ऊर्जा मिळाली असून भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारताचे अनेक आश्वासक खेळाडू तयार होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >