Saturday, May 16, 2026

हास्यरसातून जीवनरस

हास्यरसातून जीवनरस

प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ

एकदा अचानक एका दिवाळी अंकाच्या संपादकाचा फोन आला, तुम्हाला ‘हास्य’ या विषयावर लिहायचे आहे. मला खरंच खूप हसायला आले कारण या विषयाचा कधी मी विचारच केलेला नव्हता. ते हसून म्हणाले, “लिहायला सुरुवात करा जमेल.” मी कसेनुसे हसून म्हटले, “प्रयत्न करते.” मी हास्यावर लिहिले खरे; परंतु तो प्रयत्न हास्यास्पदच होता. असो. म्हणजे चालता चालता एखादा माणूस जर पडला तर त्याला उचलायचे सोडून आपण सगळे हसतो. म्हणजे मुद्दाम नाही आपल्याला आपोआप हसायला येते. मग एखादा सुज्ञ माणूस आपले हसू आवरत इतरांना म्हणतो, “काय हसताय? चला त्याला उचला आधी.” या वाक्यावर तर हास्याचे अधिक धुमारे फुटतात. आता याविषयी सुज्ञास अधिक सांगणे न लगे!

रूक्ष जीवनामध्ये हास्य ही माणसाला लाभलेली देणगी आहे जेणेकरून आपले आयुष्यमान वाढते वगैरे वगैरे अनेक निबंधामध्ये लिहिलेले आहे. आज हे सर्व आठवायचे कारण म्हणजे सोशल मीडियावर स्क्रोल करता करता एक मुलाखत पाहायला मिळाली. ही मुलाखत होती महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार ओमकार राऊत यांची. त्यांनी सांगितलेला प्रसंग मी माझ्या पद्धतीने उद्धृत करते. एकदा ते काही सामान घेण्यासाठी एका दुकानात गेले होते. तिथे साधारण पंचावन्न वर्षांच्या आसपासचे गृहस्थ त्यांना भेटले. ते त्यांच्या पाया पडले आणि त्याचे कारण विचारल्यावर ते म्हणाले, “केवळ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यामुळे मी आज इथे आहे.”

हे विधान अनेक प्रश्न उपस्थित करणारे होते त्यामुळे त्याचे उत्तर त्यांच्याकडून त्याक्षणीच ओमकार यांना घेणे महत्त्वाचे वाटले. त्यामुळे त्यांनी त्याला याविषयी विचारले. तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, “मला ‘अर्धांग वायू’ हा आजार झालेला होता. मी अक्षरशः झोपून होतो. झोपूनच मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे भाग पाहायचो. मला ते पाहून खूप हसू यायचे; परंतु माझ्या या आजारपणात मला पूर्णपणे मोकळेपणे हसताही यायचे नाही. असाच एकदा मी एक भाग पाहत होतो ज्यामध्ये ‘समीर चौघुले’ आणि ‘विशाखा सुभेदार’ हे कलाकार होते. त्यांच्या एका विनोदी प्रसंगाने मी माझे आजारपण विसरून इतका खळखळून हसलो की हसता हसता कधी बेडवर उठून बसलो मलाही कळले नाही. त्या क्षणी शरीरामध्ये कोणते बदल घडून आले माहीत नाही, पण मी ‘अर्धांगवायू’ या आजारातून बाहेर पडलो.”

ही मुलाखत पाहताना मी स्वतः अवाक् झाले. एखाद्याचा आजार दूर करण्याची शक्ती हास्यरसात आहे? म्हणजे आजारपणात रुग्णांना विनोदी सिनेमे, विनोदी प्रसंग दाखवायला काहीच हरकत नाही. शारीरिक आजारपणाबद्दल मला माहीत नाही पण मानसिक आजारातून तरी हास्य आपल्याला निश्चितपणे बाहेर काढतो, याचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. हास्य हे निश्चितपणे मनाचे औषध आहे ज्याला ‘आरोग्याची गुरुकिल्ली’ म्हटले तर वावगे ठरणार नाही. इथे केवळ ओमकार यांना हे गृहस्थ भेटले म्हणून हा इतका सुंदर प्रसंग आपल्यापर्यंत पोहोचला; परंतु जगभरात अशी कितीतरी माणसे असतील ज्यांना हास्यरसातून जीवनरस मिळाला असेल!

या कार्यक्रमाचे निर्माते मा. सचिन गोस्वामी आणि मा सचिन मोटे यांचेही यानिमित्ताने कौतुक करावेसे वाटते. कारण कोणत्याही दिग्गज कलाकाराला, कसलेल्या अभिनेत्याला कोणत्याही क्षणी तुम्ही एक प्रश्न विचारला की, हसवणे सोपे आहे की रडवणे, तर तो क्षणाचाही विचार न करता उत्तर देतो की प्रेक्षकांना वा रसिकांना आपल्या अभिनयाने रडवणे अतिसोपे आहे पण हसवणे महाकठीण! तर हे महाकठीण काम करताना त्यांना त्यामागे खूप मेहनत घ्यावी लागत असणार आहे, हे निश्चितच!

तर हसण्याने नेमके काय होते याचा मी थोडासा शोध घेतला आणि माझ्या लक्षात आले की हसण्यामुळे शरीरात तणाव निर्माण करणारे कोर्टिसोल’ (cortisol) हार्मोन कमी होते. हसण्यामुळे पांढऱ्या रक्तपेशी सक्रिय होतात आणि आपल्याला संसर्ग झाल्यास त्या संसर्गजन्य जंतूंशी लढून त्यांना शरीरातून पळून लावतात वा मारून टाकतात. हसण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि चक्क हृदयविकाराचा धोका कमी होतो. हसण्यामुळे पोटांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो आणि पोटाचे आरोग्य सुधारते. हसताना नैसर्गिकरीत्या शरीरात एंडोर्फिन तयार होतात, जे वेदनाशामक आहे म्हणजेच शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करणारे आहेत.

खरंतर आणखी खूप सारे फायदे आहेत. पण तुम्ही इतकंच करा समोर कोणीही माणूस दिसला तर त्याच्याकडे पाहून हसा. छोट्या छोट्या प्रसंगात खळखळून हसा. ‘हास्य’ हे सुद्धा संसर्गजन्य आहे. एक माणूस हसला की त्याला पाहून आपोआप इतरांना हसायला येते. मग आपले आरोग्य सुधारते पण आपल्याबरोबर इतरांचे आरोग्य सुधारून ‘सामाजिक कार्य’ केल्याचे समाधान मिळते. नाहीतरी एकावर एक फ्री किंवा बोनस कोणालाही आवडतोच ना! चला तर मग... हास्यरसातून स्वतःसाठी तसेच इतरांसाठी जीवनरस निर्माण करू या!

Comments
Add Comment