Saturday, May 16, 2026

हरवली रोषणाई

हरवली रोषणाई

स्मृतीगंध - लता गुठे

काही दिवसांपूर्वी रस्त्याने जात असताना एक दृश्य पाहिले ते असे होते. एक आंधळा माणूस रस्त्यावर बसून भीक मागत होता. एक मुलगा आला आणि त्याच्या भांड्यातील पैसे घेऊन पळून गेला. ते दृश्य पाहून पळणाऱ्या मुलामागे मी थेट माझ्या बालपणाकडे गेले. किती वेगळं होतं ते खेड्यातील वातावरण. कोणी कोणाला फसवत नसे की कोणी कोणाला ठगवत नसे. प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त-सुखी, समाधानी असे. गावात जुनी मंदिरं होती. तिथून कायम येणारा घंटानाद. झुळझुळ वाहणारी नदी. त्यावर पाणी भरणाऱ्या गावातील बायका, त्यांच्या चुड्यांचा आवाज खळखळून हसणं. आजूबाजूला पिंपळाची, वडाची झाडं गावातील लोकांचे निसर्गाशी विशेष नातं होतं. गावातल्या मंदिरांसमोर झाडाखाली बसायला बनवलेले मोठे पार असत. त्यावर गावातील वृद्ध, तरुण छान गप्पा मारत बसलेले असत. पक्ष्यांचा किलबिलाट सकाळ उजळून टाकायचा. आता गावातील झाडं कमी झाली, विहिरी कोरड्या पडल्या आणि पक्ष्यांचे थवेही विरळ झाले. विकासाच्या नावाखाली निसर्गाचं सौंदर्य कुठेतरी हरवत चाललं आहे.

आमच्या गावाच्या मधोमध मोठी पेठ होती. याच्या बाजूला वस्तूने सजलेली दुकानं. पेठ सकाळी ७ वाजल्यापासून दुपारपर्यंत गजबजलेली असे. गावात ग्रामपंचायत असे. गावातील शहाणी समंजस माणसं पाच पंच म्हणून गावातील न्यायनिवाड्याचं पूर्णपणे काम करत. त्यांचे सर्वजण ऐकत असत. त्यामुळे भांडण-तंटे जे काय असतील ते गावातल्या गावात मिटवत असत, असे वातावरण होते.

गावात घराघरात पूर्वी पाहुणेरावळे खूप येत असत. घरातील मंडळी त्यांचा खूप मनापासून पाहुणचार करत असत. ‘अतिथी देवो भव’ असे समजले जाई. चांदण्या रात्री हिवाळ्यात शेकोटी भोवती जमा होऊन घरातील वृद्ध गोष्टी सांगायचे. लहान मुलं अंगणात खेळायची. आता मोबाईलच्या पडद्यावर सगळ्यांचं जग बंदिस्त झालं आहे. मुलांच्या हातात विटीदांडू नाही, तर मोबाईलवरील गेम्स आले आहेत. संवाद हरवला आणि माणसं जवळ असूनही दूर गेली.

त्यावेळी मुलांना खास संस्कार वर्ग नव्हते किंवा बसवून शिकवले जात नव्हते. अध्यात्मिक वातावरण असल्यामुळे कोणाला त्रास होईल असे वागू नये असे सांगितले जात होते. गावातली कोणाचीही मुलगी असो किंवा मुलगा तो प्रत्येकाला आपला वाटायचा. जे अपंग आहेत त्यांना मदत करायचे. आमच्या आजोळी द्वारकामाय म्हणून एक अंध महिला होती. एकटीच राहायची. आई-वडिलांची एकटी मुलगी आणि घरी प्रॉपर्टी असल्यामुळे एका डोळस मुलाशी तिचा विवाह करून दिला. नंतर कालांतराने तिच्या सासरच्यांनी पुन्हा तिला माहेरी आणून सोडले. तिचे आई-वडीलही तिला सोडून देवाघरी गेले. तिच्याबद्दल गावातील प्रत्येकाला विशेष आपुलकी वाटायची. जन्मतःच आंधळी होती, तरी सर्व स्वतःची कामं स्वतः करत असे. नऊवारी साडी तर अशी ठासून नेसत असे की पाहत राहावे. चुलीवर स्वयंपाक करायची. कधीच तिची भाकरी जळाली नाही किंवा कच्ची राहिली नाही. हे मी शांतपणे पाहायचे आणि द्वारकामाय मी तुला मदत करू का? असं म्हटल्यानंतर लगेच विचारायची, “मास्तराची नात ना गं तू? कमलची की कौसाची? मग मी सांगायची कमलची.

मग द्वारकामाय सर्व चौकशी करायची, सर्वांची खुशाली विचारायची. आजूबाजूची लोकं तिने सांगितलेल्या वस्तू तिला लागेच आणून द्यायचे. म्हणजे घर सारवायला माती-शेण. बाजारला जाताना खास तिला विचारून जात असत. काही आणायचं आहे का? भाजीपाला, कपडे वगैरे ती सांगेल त्या वस्तू आणून द्यायचे. तिचा माझ्या आजीवर जास्त विश्वास होता. प्रत्येक बाजाराच्या दिवशी विचारायला यायची आणि पैसे हातात देऊन म्हणायची, ह्या ह्या वस्तू घेऊन ये. विळीवर भाजी कापण्यापासून ते वरवंटा पाट्यावर मसाला वाटण्यापर्यंत. ती इतकी सफाईदारपणे काम करायची की कोणालाच वाटायचं नाही की ती जन्मजात आंधळी आहे. घरात गाडगे मडक्याच्या उतरंडी लावलेल्या असायच्या. कोणत्या गाडग्यामध्ये कोणती वस्तू आहे ही तिची पाठ असायची. गावात बारवावरून पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी शेंदून पाणी आणावे लागत असे; परंतु रोज द्वारकामाईचे शेजारी-पाजारी दोन हंडे पाणी तिला आणून देत असत. ‌ज्यांना गरज लागेल त्यांना व्याजाने पैसे द्यायची. हातात धरली की तिला कितीची नोट आहे समजत असे; परंतु गावातील कुठलीही व्यक्ती तिचे पैसे बुडवत नसे किंवा व्याज ठरल्याप्रमाणे देत असे. असे म्हणतात, ज्या व्यक्ती जन्मजात अंध असतात त्यांचा तिसरा डोळा काम करत असावा. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि सेन्स कमालीचा असतो. तसंच असेल कदाचित.

जीवनातील बदल हा कायम घडत असतो. कोणतीच गोष्ट स्थिर नसते. गाव बदललं, कारण काळ बदलला. शिक्षण, तंत्रज्ञान, दळणवळण आणि आधुनिक सुविधा गावापर्यंत पोहोचल्या. गावातील मुलं मोठमोठ्या शहरांत शिक्षण घेऊ लागली. शेतकऱ्यांच्या हातात नवी साधनं आली. गावाला नव्या युगाची दारे खुली झाली. हा बदल आवश्यकही आहे तरीसुद्धा आजही असं वाटतं पूर्वीसारखं पुन्हा गाव अनुभवता यावे.

बदलामध्ये गावची माती, तिचा सुगंध, माणुसकीची ऊब आणि साधेपणाचं सौंदर्य हरवू नये, हीच खरी अपेक्षा आहे. आधुनिकतेसोबत जुन्या संस्कारांची आणि नात्यांची जपणूक झाली, तरच गावाचं खरं सौंदर्य टिकून राहील. आजही कधी गावाकडे गेलं की एखाद्या जुन्या वडाच्या झाडाकडे पाहताना मन नकळत भूतकाळात हरवून जातं. वाटतं - गाव बदललं, रस्ते बदलले, माणसं बदलली; पण मनातलं ते जुनं गाव अजूनही तसंच जिवंत आहे… मातीच्या सुगंधासारखं, चिरंतन हवंहवसं वाटणारं.

Comments
Add Comment