Saturday, May 16, 2026

Mumbai-Hyderabad Bullet Train : बुलेट ट्रेनमुळे बदलणार महाराष्ट्राचा वेग; पंढरपूर-सोलापूरला होणार मोठा फायदा!

Mumbai-Hyderabad Bullet Train : बुलेट ट्रेनमुळे बदलणार महाराष्ट्राचा वेग; पंढरपूर-सोलापूरला होणार मोठा फायदा!

मुंबई : मुंबई ते हैदराबाद दरम्यान प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील महत्त्वाकांक्षी हायस्पीड रेल्वे प्रकल्पांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा प्राथमिक मार्ग जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे या मार्गाचा उल्लेख ‘रेल्वे ॲटलास’मध्ये करण्यात आला असून, त्यामुळे या प्रकल्पाच्या हालचालींना अधिक वेग मिळाल्याचे मानले जात आहे. या नव्या बुलेट ट्रेन मार्गामुळे पुणे, पंढरपूर आणि सोलापूरसह महाराष्ट्रातील अनेक भागांच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक आराखड्यानुसार मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेल्वे मार्ग पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी आणि विकाराबादमार्गे धावण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. त्याच हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा विस्तार पुढे पुणे आणि हैदराबादपर्यंत करण्याची योजना केंद्र सरकारकडून आखली जात असल्याची चर्चा आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी यापूर्वीच मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनबाबत संकेत दिले होते. त्यांनी मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होऊ शकतो, असे म्हटले होते.

या बुलेट ट्रेनमुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. सध्या अनेक तास लागणारा मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या ४८ ते ५० मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई ते सोलापूर प्रवास दीड तासांत होऊ शकतो. पुणे ते सोलापूर हे अंतर फक्त ४५ ते ५५ मिनिटांत पार करता येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर पुणे ते हैदराबाद हा प्रवास दोन तासांपेक्षाही कमी वेळात पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणामधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.

या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा पंढरपूर आणि सोलापूर या भागांना होणार असल्याचे बोलले जात आहे. पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे धार्मिक पर्यटन केंद्र मानले जाते. बुलेट ट्रेन सुरू झाल्यास देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी प्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सोलापूरच्या औद्योगिक, व्यापारी आणि व्यावसायिक विकासालाही या प्रकल्पामुळे नवे बळ मिळू शकते.

विशेष म्हणजे सोलापूरजवळ स्वतंत्र बुलेट ट्रेन स्टेशन उभारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला तर स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा, व्यावसायिक संकुले, निवासी प्रकल्प आणि इतर विकासकामांना वेग मिळू शकतो. यामुळे स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे सोलापूर आणि पंढरपूर हे दोन्ही भाग राज्याच्या विकास नकाशावर अधिक ठळकपणे समोर येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment