Wednesday, May 13, 2026

BMC News : महापालिका आयुक्त जेव्हा पहाटेच कांजूर मार्ग डम्पिंग ग्राउंडवर पोहोचतात, तेव्हा...

BMC News : महापालिका आयुक्त जेव्हा पहाटेच कांजूर मार्ग डम्पिंग ग्राउंडवर पोहोचतात, तेव्हा...

मुंबई: मुंबईकर जेव्हा गाढ झोपेत किंवा कुणी लवकर उठून मॉर्निंग वॉकला फिरत असतात,त्यावेळेस मुंबई महापालिकेच्या आयुक्त रस्त्यांवर फिरुन विविध नागरी कामे आणि प्रकल्प कामे यांचा आढावा घेत असतात. महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी बुधवार पहाटे महापालिकेच्या कांजूर मार्ग येथील नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पहाटे आकस्मिक भेट देत पाहणी केली.या प्रकल्प कामात दुर्गंधी निर्माण होऊ नये, यासाठी महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना आणि कामकाजाचा आढावा घेतला.तसेच, आवश्यक सुधारणा व कार्यक्षमतेबाबत निर्देश दिले.

महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी यांनी दीड तास प्रकल्प स्थळाची पाहणी करत घनकचरा व्‍यवस्‍थापन प्रकल्पातील प्रारंभी भिडे यांनी कचरा विलगीकरण केंद्र, खतनिर्मिती प्रकल्प स्थळ, वायुपासून वीजनिर्मिती केंद्र आणि बायो रिऍक्टर लँड फील या ठिकाणाना भेट दिली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्‍थळाच्‍या आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना दुर्गंधी येऊ नये, यासाठी घनकच-यावर ' बायो-एंझाइम'चा समावेश असलेल्या द्रव्याची फवारणी केली जाते. तसेच, कचरा स्वीकारण्यात येणा-या ठिकाणाच्या आजूबाजूला सुगंधी द्रव्याची फवारणी करण्याकरीता 'मिस्टींग'ची व्यवस्था करण्‍यात आली आहे. प्रकल्पस्‍थळी ११ ठिकाणी सुगंधी द्रव्य फवारणीसाठी 'मिस्टींग' कॅननची यंत्रणा कार्यान्वित आहे. त्‍याचीही भिडे यांनी पाहणी केली. तसेच, सभोवतालच्या परिसरातून येणाऱ्या दुर्गंधीबाबत तक्रारीसाठी मदत सेवा क्रमांक (हेल्पलाईन) कार्यान्वित करण्‍यात आला आहे. त्‍याचादेखील आढावा त्‍यांनी घेतला.

कांजूर येथे एकूण ११८.१४ हेक्‍टर जमीनीवर (सुमारे २९२ एकर) नागरी घनकचरा व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प राबविला जात आहे. सद्यस्थितीत प्रति‍ दिन सुमारे ५२०० दशलक्ष टन नागरी घनकच-यावर शास्‍त्रोक्‍त पद्धतीने बायोरिऍक्‍टर तंत्रज्ञानाद्वारे आणि १००० दशलक्ष टन नागरी घनकच-यावर खत निर्मिती तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्‍यात येत आहे. नागरी घनकचऱ्यापासून निर्माण होणा-या मिथेन वायुपासून काही प्रमाणात वीज निर्मिती होते. ही वीज याच प्रकल्पासाठी वापरण्यात येते. उर्वरीत मिथेन वायू हा शास्त्रोक्त पध्दतीने जाळण्यात येतो. नागरी घनकचऱ्याचा हवेशी संपर्क होऊ नये व दुर्गंधी पसरू नये तसेच निर्माण होणारा वायू हवेत पसरू नये, याकरीता कचऱ्यावर मातीचे आवरण टाकण्यात येते, त्‍याची भिडे यांनी पाहणी केली. तसेच, आवश्‍यक ते निर्देश दिले.

या प्रसंगी उपायुक्‍त ( महानगरपालिका आयुक्‍त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) किेरण दिघावकर तसेच अधिकारी आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा