Monday, May 11, 2026

Nashik News : गोवंश तस्करी प्रकरणी पोलिस आक्रमक, माजी महापौरांवर गुन्हा दाखल

Nashik News : गोवंश तस्करी प्रकरणी पोलिस आक्रमक, माजी महापौरांवर गुन्हा दाखल

Nashik News : गोवंश तस्करी (Cattle smuggling) अनेक गंभीर प्रकरणे मालेगाव (Malegaon) शहरात समोर येत आहे. त्यामुळे गोवंश तस्करीकडे पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहे. दरम्यान या गोतस्करांविरोधात पोलीस (Police) आक्रमक झाले असून पोलिसांनी थेट माजी महापौर अब्दुल मलिक युनूस ईसा (Abdul Malik Yunus Isa) यांच्या मालमत्तांवर छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. धक्कादायक म्हणजे या कारवाईत सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचे गोवंश जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात संशयित म्हणून खुद्द माजी महापौरांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ​

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे धाडसत्र राबवले. संवदगाव फाटा परिसरातील अब्दुल मलिक यांच्या फार्म हाऊसवर पवारवाडी पोलिसांनी धाड टाकली. तर किल्ला पोलिसांनी इस्लामाबाद भागातील अब्दुल मलिक यांच्या घराशेजारील गोदामावर छापा टाकला. पवारवाडी या ठिकाणी पोलिसांनी ३ गोवंश जनावरे अत्यंत निर्दयपणे बांधून ठेवलेली आढळली. पोलिसांनी ही सर्व जनावरे जप्त केली. तर इस्लामाबाद या ठिकाणी देखील ५ गोवंश जनावरे आढळून आली. ही सर्व जनावरे निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. येत्या २८ मे रोजी बकरी ईद सण आहे. त्यासाठी कत्तल करण्याच्या हेतूने ही सर्व जनावरे बांधून ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. जप्त केलेल्या गोवंश जनावरांची गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे.

​पोलीस कारवाई सुरू असताना संशयित अब्दुल मलिक यांनी पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अब्दुल मलिक (Abdul Malik Yunus Isa) यांनी पोलिसांना धमकावत काही जनावरे घटनास्थळावरून पळवून लावण्याचा प्रयत्न केल्याची पोलिसांची तक्रार आहे. अब्दुल मलिक हे ‘एमआयएम’ (MIM) पक्षाचे महापालिकेतील गटनेते असून आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. अशा बड्या नेत्याचे नाव गोवंश तस्करी आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत समोर आल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

याप्रकरणी पवारवाडी व किल्ला पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कारवाई झाल्यापासून अब्दुल मलिक हे फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठे जुळले आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >