Monday, July 13, 2026

America Iran War : अमेरिकेचे इराणवर १४० लक्ष्यांवर भीषण हवाई हल्ले; इराणचाही घातक पलटवार, मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद

America Iran War : अमेरिकेचे इराणवर १४० लक्ष्यांवर भीषण हवाई हल्ले; इराणचाही घातक पलटवार, मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने पुन्हा एकदा धोकादायक वळण घेतले असून, मध्यपूर्वेतील तणाव कमालीचा वाढला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) इराणमधील तब्बल १४० लष्करी लक्ष्यांवर व्यापक हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील व्यापारी जहाजांवरील हल्ले आणि इराणच्या लष्करी हालचालींना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. (America Iran War)

अमेरिकेच्या माहितीनुसार, या कारवाईत क्षेपणास्त्र तळ, ड्रोन लॉन्च केंद्रे, कमांड अँड कंट्रोल सुविधा, शस्त्रसाठे तसेच इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)शी संबंधित अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमुळे इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्याचा उद्देश असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे. (America Iran War)

इराणचा जोरदार पलटवार :

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनेही तातडीने प्रत्युत्तर देत आखाती प्रदेशातील अमेरिकी लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, बहरीन, कतार, कुवेत, संयुक्त अरब अमिराती आणि इतर काही भागांतील अमेरिकी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आले. मात्र, संबंधित देशांनी आपल्या हवाई संरक्षण यंत्रणांनी बहुतेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच निष्प्रभ केल्याचा दावा केला आहे. (America Iran War)

हॉर्मुझ सामुद्रधुनीवर पुन्हा संकट :

या संघर्षामुळे जगासाठी अत्यंत महत्त्वाच्या हॉर्मुझ सामुद्रधुनी परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गातून होत असल्याने जागतिक ऊर्जा पुरवठा आणि तेलाच्या किमतींवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनी या मार्गावरील सुरक्षेचा आढावा सुरू केला असून, समुद्री विमा प्रीमियम वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (America Iran War)

ट्रम्प यांचा इशारा, जगाची चिंता वाढली :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने व्यापारी जहाजे आणि समुद्री वाहतुकीवरील हल्ले तात्काळ थांबवावेत, अन्यथा आणखी कठोर लष्करी कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे, इराणने आपल्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्युत्तर सुरूच राहील, अशी भूमिका कायम ठेवली आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी दोन्ही राष्ट्रांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ञांच्या मते, हा संघर्ष आणखी तीव्र झाल्यास जागतिक तेलपुरवठा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक बाजारपेठांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अमेरिका-इराण संघर्षातील पुढील घडामोडींवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. (America Iran War)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >