Wednesday, April 22, 2026

Election : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विधानसभेसाठी आज मतदान

Election : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विधानसभेसाठी आज मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा २३ एप्रिल रोजी, तर दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीत राज्य विधानसभेच्या २९४ जागांसाठी मतदान होणार आहे. तर तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३४ जागांसाठी गुरुवार, २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होत आहे. मतमोजणी होऊन निकाल ४ मे रोजी जाहीर केला जाईल.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महत्त्वाच्या नंदीग्राम जागेसह एकूण १५२ मतदारसंघांमध्ये मतदान होईल. निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार, पहिल्या टप्प्यात उत्तर बंगालमधील कूचबिहार, अलीपूरद्वार, जलपाईगुडी, कालिम्पोंग, दार्जिलिंग, उत्तर आणि दक्षिण दिनाजपूर आणि मालदा, तसेच दक्षिण बंगालमधील मुर्शिदाबाद, बीरभूम, पश्चिम बर्दवान, बांकुरा, पुरुलिया, पश्चिम मेदिनीपूर, पूर्व मेदिनीपूर आणि झाडग्राम यांचा समावेश असेल.

नंदीग्राममध्ये भाजपचे सुवेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसचे पवित्र कार, काँग्रेसचे उमेदवार सेख जरियातुल हुसेन आणि सीपीआय नेत्या शांती गिरी यांच्या विरोधात लढत आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी २०२१ मध्ये नंदीग्राम मतदारसंघात टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. २०२१ च्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशात केंद्रस्थानी असलेल्या उत्तर बंगालमध्ये संपूर्ण मतदान पहिल्याच टप्प्यात होणार आहे. या प्रदेशात विधानसभेच्या ५४ जागा असून, त्या सर्व जागांवर २३ एप्रिल रोजी मतदान होईल. या निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये तीव्र लढत पाहायला मिळत असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी १४ वर्षांपासून सत्तेत आहेत.

भाजपची प्रतिष्ठा पणाला : पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजपने आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली असून गेल्या अनेक महिन्यापासून भाजपने या राज्यात मोर्चेबांधणी केलेली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रिय गृहमंत्री अमित शहा व अन्य भाजपचे रथी-महारथी प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. भाजपने राज्यातील स्थानिक मुद्द्यांवर आणि विकास विषयावर प्रचार वाढवला आहे.

तामिळनाडूमध्ये विधानसभेसाठी आज मतदान

तमिळनाडूमध्ये २३४ जागांसाठी गुरुवार, २३ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. येथे एकूण ५ कोटी ६० लाख मतदार आहेत. तमीळनाडूत ‘द्रमुक’प्रणीत ‘धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडी’मध्ये काँग्रेस, डावे पक्ष आणि विदुथलाई चिरुथाईगल कात्ची (व्हीसीके) यांचा समावेश आहे. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर एडप्पाडी के. पलानीसामी यांच्या नेतृत्वाखाली ‘अण्णा द्रमुक’, भाजप आणि पट्टाली मक्कळ कच्ची (पीएमके) यासारखे पक्ष ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’तून निवडणूक लढवत आहेत.

तमिळनाडूमध्ये गुरुवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरक्षेची व्यापक पातळीवर तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण तमिळनाडूमध्ये सुमारे ७५ हजार ०३२ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यापैकी ३ हजार ०२२ ठिकाणांवरील ५ हजार ९३८ मतदान केंद्रांना संवेदनशील घोषित करण्यात आले आहे. तमिळनाडूचे राजकारण गेल्या काही दशकांपासून द्रमुक आणि अण्णा द्रमुक याच प्रादेशिक पक्षांभोवती फिरत आले आहे. यंदा २०२६च्या विधानसभा निवडणूक रिंगणात प्रसिद्ध अभिनेता विजयच्या ‘तमीळगा वेत्री कळघम’ पक्षाने उडी घेतल्याने तिरंगी सामना होईल. विजय यांचा पक्ष तरुण मतदारांना आणि तमीळनाडूतील पारंपरिक राजकारणास कंटाळलेल्या वर्गाला आकर्षित करत असल्याने त्यांच्या पक्षाच्या कामगिरीवर निकाल निश्चित होईल. त्यांचा पक्ष ‘द्रमुक’ की ‘अण्णा द्रमुक’ची मते घेणार, याची उत्सुकता आहे.

‘टीव्हीके’मुळे पारंपरिक मतांचे विभाजन? : अभिनेता विजयने आपल्या ‘टीव्हीके’ पक्षाद्वारे निवडणूक रिंगणात प्रवेश केला. त्यांनी भाजपला वैचारिक शत्रू आणि ‘द्रमुक’ला राजकीय शत्रू घोषित करून, स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ‘टीव्हीके’ने प्रचारात प्रामुख्याने नवमतदार आणि पारंपरिक द्रविडी पक्षांपासून दुरावलेल्या मतदारांना साद घातल्याचे दिसून आले. विजय यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे पारंपरिक मतांचे विभाजन होऊन विशेषतः ‘अण्णा द्रमुक’च्या मतपेढीला फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर काही शहरी भागांत ‘द्रमुक’च्या मतांमध्येही विभागणी होऊ शकते, ज्यामुळे त्रिशंकू विधानसभेची शक्यताही वर्तवली जात आहे.

भाजपकडून हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वावर भर : उत्तर भारतीय पक्ष अशी प्रतिमा असल्याने भाजपसाठी तमिळनाडू हे राज्य नेहमीच आव्हानात्मक ठरले. यंदाच्या निवडणुकीत भाजपचे राज्यात जनाधार वाढवण्यावर भर दिला. ‘द्रविडी अस्मिते’च्या राजकारणाला भाजपने हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व या मुद्द्यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

Comments
Add Comment