मुंबई : कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे आधुनिक मासळी बाजार उभारण्यासाठी आवश्यक मदत आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल. मासळी बाजाराची इमारत अर्थात फिश मार्केट बिल्डिंग उभारण्यासाठी आवश्यक प्रकिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात मत्स्य व्यवसायात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार अमल महाडिक, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरच्या मासळी बाजाराला मत्स्य व्यवसाय विभागाकडील अन्य योजनांचाही लाभ मिळवून देण्यासाठी काय करता येईल याची चाचपणी करण्याचे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले.
बैठकीत प्रस्तावित भव्य, आधुनिक इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच विक्रेत्यांना सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे मार्केट उभारण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामास गती देण्यासाठी लवकरात लवकर भूमिपूजन करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या.
प्रस्तावित मार्केटमध्ये स्वच्छता, कोल्ड स्टोरेज, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन आणि ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक विक्रेत्यांना नियोजित बाजारपेठ मिळणार असून ग्राहकांनाही दर्जेदार सेवा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीनंतर गिरगाव चौपाटी येथे मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या समस्यांसंदर्भात बैठक झाली. या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि मत्स्यव्यवसाय विभागाने एकत्रित बैठक घ्यावी आणि प्रश्न सोडवावे अशी सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली.






