Wednesday, August 5, 2026

Actress Chhaya Kadam : 'बिग बॉस'ची ऑफर आली, पण मराठमोळ्या छाया कदम म्हणाल्या 'नको'; कारण ऐकून व्हाल थक्क!

Actress Chhaya Kadam : 'बिग बॉस'ची ऑफर आली, पण मराठमोळ्या छाया कदम म्हणाल्या 'नको'; कारण ऐकून व्हाल थक्क!

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री छाया कदम (Actress Chhaya Kadam) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. लोकप्रिय रिअॅलिटी शो 'हिंदी बिग बॉस' (Bigg Boss) कडून त्यांना स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची ऑफर आली होती. मात्र, वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ही ऑफर नाकारल्याचे त्यांनी सांगितले. 'भूतम भयम्' या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत छाया कदम यांनी हा खुलासा केला.

'कान्सला गेले तेव्हा बिग बॉसची ऑफर आली' :

मुलाखतीदरम्यान, कधी एखाद्या रिअॅलिटी शोची ऑफर आली होती का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना छाया कदम (Actress Chhaya Kadam) म्हणाल्या की, त्या पहिल्यांदा कान्स फिल्म फेस्टिव्हलला गेल्या होत्या, त्याच काळात 'हिंदी बिग बॉस'च्या निर्मात्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्या म्हणाल्या, "मला हिंदी बिग बॉसकडून ऑफर आली होती. त्यांनी मला शोमध्ये सहभागी व्हावं म्हणून खूप प्रयत्न केले. पण माझ्याकडूनच काही झालं नाही. मला त्यावेळी तो शो करायचा नव्हता."

'वैयक्तिक आयुष्य जगासमोर मांडायचं नव्हतं' :

ऑफर नाकारण्यामागचे कारण सांगताना छाया कदम (Actress Chhaya Kadam) म्हणाल्या की, काही गोष्टी या पूर्णपणे वैयक्तिक असतात आणि त्या संपूर्ण जगासमोर मांडण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्या म्हणाल्या, "माझ्या काही वैयक्तिक गोष्टी मी स्वतःजवळ ठेवू इच्छिते. त्या जगाला का सांगाव्यात, असा माझा विचार होता. त्यामुळे मी त्या वेळी बिग बॉसमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला."

'TRP कमाल आहे, पण...'

छाया कदम (Actress Chhaya Kadam) यांनी शोच्या लोकप्रियतेचे कौतुकही केले. त्या म्हणाल्या, "मी त्यांना सांगितलं की, तुमचा TRP कमाल आहे. लोकांना हा शो खूप आवडतो. पण मला सध्या तो करायचा नाही." यावेळी त्यांनी एक मजेशीर किस्साही सांगितला. "माझी मावशी बिग बॉसची जबरदस्त चाहती आहे. ती रिपीट टेलिकास्टही पाहते. मला नेहमी सांगत असते की, अमुक स्पर्धकाने असं केलं, तमुकाने तसं केलं," असे त्या हसत म्हणाल्या.

अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख :

छाया कदम (Actress Chhaya Kadam) यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 'फँड्री', 'सैराट', 'न्यूड', 'गंगूबाई काठियावाडी', 'लापता लेडीज' आणि 'मडगाव एक्सप्रेस' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 'न्यूड' चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, छाया कदम लवकरच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी मराठी चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. (Actress Chhaya Kadam)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >