मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलबोगदा क्रमांक १ व जलबोगदा क्रमांक २ यांचे भरण अर्थात चार्जिंग, तसेच धुलाई अर्थात फ्लशिंग, क्लोरीनीकरण व डी-क्लोरीनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून यासाठी एल (कुर्ला पूर्व), एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस, टी आणि ए, बी, सी, ई, एफ उत्तर, एफ दक्षिण या विभागात सोमवार, २० एप्रिल २०२६ ते सोमवार, २७ एप्रिल २०२६ या कालावधीत पाणीपुरवठ्यात ५ टक्के कपात करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठ्याकामी अमर महल (हेगडेवार उद्यान) ते वडाळा (प्रतीक्षा नगर) आणि पुढे परळ (सदाकांत धवन उद्यान) जलबोगदा १ (एएमटी-१) कार्यान्वित आहे. तसेच, अमर महल (हेगडेवार उद्यान) ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय आणि पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशय जलबोगदा २ (एएमटी-२) हाही अविरत कार्यरत आहे. जलबोगद्याद्वारे होणा-या पाणीपुरवठ्याचे भरण (चार्जिंग), धुलाई (फ्लशिंग), क्लोरीनीकरण व डी-क्लोरीनीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहे. ही सर्व कामे सोमवारी २० एप्रिल २०२६ ते सोमवारी २७ एप्रिल २०२६ या कालावधीत केली जाणार आहेत.
परिणामी, मुंबई पूर्व उपनगरातील एल (कुर्ला पूर्व), एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस, टी आणि मुंबई शहरातील ए, बी, सी, ई, एफ उत्तर आणि एफ दक्षिण या विभागात पाणीपुरवठ्यात ५ टक्के कपात लागू राहणार आहे. याची संबंधित विभागातील नागरिकांना नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.






