Monday, April 13, 2026

अनेक दिग्गजांनी वाहिली ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली

अनेक दिग्गजांनी वाहिली ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना शनिवारी (११ एप्रिल) कार्डिॲक अरेस्टनंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. आशा भोसले या फुफ्फुसाचा आजार आणि वयोमानानुसार येणाऱ्या इतर आजारांशीही झुंज देत होत्या. 'मल्टी ऑरगन फेल्युअर'मुळे त्यांचं निधन झाल्याचं डॉ. समदानी यांनी सांगितलं. आज दुपारी ४ वाजता शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे... आशाताईंनी गाणी अजरामर केली भारतीय संगीतविश्वातील प्रसिद्ध आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व, पद्मविभूषण गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्राचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर आशाजींनी संगीताच्या क्षितिजावर स्वतंत्र ओळख निर्माण केली. नया दौर, तीसरी मंजिल, हरे रामा हरे कृष्णा, उमराव जान यांसह इजाजत आणि रंगीला यांसारख्या काळानुसार बदलणाऱ्या अनेक गाजलेल्या चित्रपटांतील गाणी त्यांनी आपल्या स्वरांनी अजरामर केली. प्लेबॅक गायिका म्हणूनही त्यांनी अनेक संस्मरणीय गाणी दिली. संगीत क्षेत्रातील त्यांचे 'स्वर' आणि मोलाचे योगदान पिढ्यान्पिढ्या स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना धैर्य प्रदान करो. ॐ शांती. - नितीन गडकरी, वाहतूक मंत्री सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. आशाताई भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आशाताई भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत आशाताई भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आशाताईंच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना झालेले हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करते.- सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री आशाजींनी भारतीय संगीताला नव्या उंचीवर नेले मधुर आवाज आणि अतुलनीय गायनाचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या आशा भोसलेंनी दशकानुदशके भारतीय संगीताला नव्या उंचीवर नेले. त्यांचा आवाज म्हणजे केवळ सुरांचा संगम नाही, तर भावनांचे एक असे अव्यक्त बंधन आहे, जे शब्दांत मांडता येणार नाही. त्यांनी गायलेली गाणी कायम अशीच गुंजत राहतील. हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी, कलाविश्वाशी संबंधित प्रत्येकासाठी आणि लाखो चाहत्यांसाठी अत्यंत भावनिक आहे. हे कधीही भरून न निघणारं नुकसान आहे. मी कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. माता सरस्वती त्यांच्या दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती. - पियुष गोयल, वाणिज्य मंत्री जगण्यातील श्रीमंती गमावली भोगल्या दु:खाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या... जय शारदे.. वागेश्वरी ची प्रार्थना गाणाऱ्या... कॅब्रे, लावणी, भक्ती गीत, ओवी आणि अभंगासह भावगीत, चित्रपट गीत ही विलक्षण ताकदीने गाणाऱ्या... भाषेची बंधने तोडून २० पेक्षा जास्त भाषेत गाणाऱ्या... स्वतःच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला लिलया हरवणाऱ्या... आणि भाऊबीजेला “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती...” अशी अजरामर ओवाळणी गाणाऱ्या आशाताई गेल्या. माझ्यासाठी तर माझी प्रिय बहिण मी आज गमावली... साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकारआज शांत झाली. मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी आज काय गमावले हे शब्दात सांगता येणार नाही...माझ्या जगण्यातील श्रीमंती मात्र आज गमावली... - आशिष शेलार,सांस्कृतिक कार्य मंत्री भारतीय संगीतविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली ज्या काळात स्त्रियांनी घराबाहेर पडून आपली ओळख निर्माण करणे कठीण होते, त्या काळात आशाताईंनी आपल्या आवाजाच्या जोरावर जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या सुरेल आणि भावपूर्ण गायनाने संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध केले. विविध भाषांमधील त्यांच्या असंख्य गाण्यांनी पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या आवाजातील जादूने प्रत्येक गाणे अधिक अर्थपूर्ण आणि भावनिक बनले. आज त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या सुरांची आठवण आणि त्यांनी दिलेला अमूल्य ठेवा सदैव आपल्याला प्रेरणा देत राहील. - रितु तावडे, महापौर 'आशाताई' -दि लास्ट एम्परर राज ठाकरे यांनी आपल्या श्रद्धांजली संदेशात आशा भोसले यांना “दि लास्ट एम्परर” असे संबोधत त्यांच्या संगीत प्रवासाचे वर्णन केले. त्यांनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची तुलना जागतिक कलाकार लिओनार्डो दा विंची आणि मायकलॅन्जलो यांच्याशी केली. लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन्ही बहिणींनी भारतीय चित्रपट संगीताला एक नवं रूप दिलं. त्यांच्या मते, या दोघींनी मिळून भारतीय संगीताच्या ‘रेनेसाँस’ युगाला आकार दिला. “काही वर्षांपूर्वी लतादीदी गेल्या आणि आज आशाताईही आपल्यातून निघून गेल्या. भारतीय संगीताच्या सुवर्णकाळाचा शेवटचा महत्त्वाचा अध्याय आज संपला. पण आशाताईंचा आवाज आणि त्यांचा अलौकिक प्रवास कायम आपल्या सोबत राहील” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. - राज ठाकरे, मनसे प्रमुख खाणं आणि गाणं हे दोन आवडीचे विषय मी त्यांच्याशी १९७८ पासून गप्पा मारतोय. देशातील विविध शहरांसह परदेशातील सुमारे २२ सविस्तर मुलाखती मी त्यांच्या घेतल्या आहेत. तसेच वर्तमानपत्रांकरता वेगळ्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यांच्याशी बोलत असताना एक आपुलकी, आत्मीयता होती. मी हे कधीच विसरणे शक्य नाही. नेहमी असेच वाटले की, आपण घरातील माणसांबरोबरच बोलतोय. १९७८ मध्ये मी प्रथम आशाताईंबरोबर सविस्तर बोललो. सर्वांत प्रसिद्ध गायिकांपैकी एक असणाऱ्या आशाताईंबरोबर प्रथम कसं बोलायचं, असा प्रश्न होता; पण त्या अत्यंत आपुलकीने म्हणाल्या, चल आपण गप्पा मारूया. त्यामुळे त्यांची सविस्तर मुलाखत घेणे अगदी सोपे झाले. त्या गाणं मस्त गुणगुणायच्या. खाणं आणि गाणं हे दोन आवडीचे विषय होते. - सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ मुलाखतकार आशा ताई, तुमची खूप आठवण येईल धन्यवाद ताई, आमचं आयुष्य तुमच्या प्रेमळपणाने, आणि अविस्मरणीय संगीताने भरून टाकल्याबद्दल. आशा ताई, तुमची खूप आठवण येईल. - सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार गाण्यातून कायम आपल्यासोबत असतील 'सर्वांसाठी आजचा दिवस खूप दुःखद आहे. आशा भोसले आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाहीये. संगीतक्षेत्रातील त्यांचं योगदान शब्दात मांडूच शकत नाही. आशाताई त्यांच्या आवाजातून आणि गाण्यातून कायम आपल्यासोबत असतील. - शंकर महादेवन, गायक चंद्र उगवेल का आता आकाशात ? “चंद्र उगवेल का आता आकाशात ? चांदणे तसेच बरसेल का? ही फक्त एक व्यक्ती नव्हती हा फक्त एक आवाज नव्हता. आपल्या आयुष्याचा भाग होता आणि आहे.आपल्या घरातल्या छोट्या मुलीपासून ते आजीपर्यंत सगळ्यांच्या भावना व्यक्त करणारा आवाज. - सलील कुलकर्णी, संगीतकार  
Comments
Add Comment