Friday, April 10, 2026

US Drone : अमेरिकेचा २०० दशलक्ष डॉलरचा ड्रोन इराणने पाडला ?

US Drone : अमेरिकेचा २०० दशलक्ष डॉलरचा ड्रोन इराणने पाडला ?

होर्मुझ सामुद्रधुनी : अमेरिकेचा २०० दशलक्ष डॉलरचा ड्रोन इराणने पाडला की तांत्रिक बिघाडामुळे हा ड्रोन समुद्रात पडला यावरून चर्चेला उधाण आले आहे. अमेरिकेने दिलेल्या माहितीनुसार यूएस मरिन्स अर्थात अमेरिकेच्या नौदलाचा MQ-4C ट्रायटन हा टेहळणीचे काम करणारा ड्रोन होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आकाशात असताना बेपत्ता झाला. अद्याप या ड्रोनशी संपर्क झालेला नाही. यूएस मरिन्सचा MQ-4C ट्रायटन हा २०० दशलक्ष डॉलरचा ड्रोन आहे. जगातील निवडक महागड्या ड्रोनमध्ये याचा समावेश होतो. यामुळे हा ड्रोन बेपत्ता झाल्यापासून अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी संबंधित अधिकारी अस्वस्थ असल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेने दिलेल्या माहितीनुसार MQ-4C ट्रायटन तीन तास समुद्रात टेहळणी करत होता. हा ड्रोन बेपत्ता झाला त्यावेळी होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आकाशात होता. ड्रोनने बेपत्ता होण्याच्या आधी आपत्कालीन स्थितीत पाठवला जाणारा सांकेतिक संदेश नियंत्रण कक्षाला पाठवला. यानंतर ड्रोनची उंची झपाट्याने कमी झाली. यामुळे हा ड्रोन इराणने पाडला की तांत्रिक बिघाडामुळे हा ड्रोन समुद्रात पडला यावरून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. आपत्कालीन संदेश पाठवणाऱ्या ड्रोनशी अद्याप अमेरिकेच्या नियंत्रण कक्षाचा संपर्क झालेला नाही. यामुळे ड्रोनच्या ताज्या स्थितीविषयी संभ्रम आहे.

अमेरिकेने इराणसोबत शस्त्रसंधी झाल्याचे जाहीर केले आहे. या एकतर्फी घोषणेला दोन दिवस होत नाहीत तोच अमेरिकेचा ड्रोन बेपत्ता होण्याची घटना होर्मुझ सामुद्रधुनी येथे घडली आहे.

बेपत्ता झालेला ड्रोन आखाती प्रदेशातील अर्थात गल्फमधील यूएस सेंट्रल कमांड अंतर्गत यूएस मरिन्स वापरत होते. ड्रोनचा शोध सुरू असल्यामुळे इतक्यात या विषयावर भाष्य करणे कठीण असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.

MQ-4C ट्रायटन हा ड्रोन समुद्रसपाटीपासून ५० हजार फूट उंचीवर सलग २४ तास कार्यरत राहून सात ते साडेसात हजार सागरी मैल प्रवास करू शकतो. उपलब्ध आकडेवारीनुसार अमेरिकेच्या नौदलाकडे २० MQ-4C ट्रायटन ड्रोन आहेत. यातलाच एक ड्रोन आता बेपत्ता झाला आहे.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार अमेरिका इराण विरूद्धच्या युद्धात दर सेकंदाला दहा हजार ३०० डॉलर खर्च करत आहे. इराणमध्ये सत्तांतर घडवून आणणे, इराणची अणुबॉम्ब तयार करण्याची आणि आण्विक हल्ला करण्याची क्षमता नष्ट करणे या प्रमुख हेतूने अमेरिकेने इराण विरोधात कारवाई सुरू केली. या कारवाईला २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात झाली. आज १० एप्रिल उजाडला आहे. अद्याप अमेरिकेचा हेतू साध्य झाल्याचे दिसत नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा