ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. अशोक खरातशी संबंधित ट्रस्टवर असलेल्या तसेच नियमितपणे अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदू बाबासोबत वावरत असतानाचे तसेच भोंदू बाबाचे पाय धूत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवी माहिती प्रकाशात येत आहे. खरातची चर्चा जोरात सुरू असताना ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा वाढल्याच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. पमी गुरुचे अनेक रील व्हायरल होऊ लागले आहेत.
पमी गुरु ही पण एक भोंदूच असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. यातील खरे खोटे अद्याप समजलेले नाही. पण अंगावर कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने घालून तसेच फॉर्च्युनर आणि थार या महागड्या गाड्यांतून वावरतानाचे पमी गुरुचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पमी गुरुचे आलिशान जीवनशैली दाखवणारे व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहेत.
चर्चेत असलेली पमी गुरु ही ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात राहते. मुलं होत नाहीत, नोकरीत कुटुंबात वाद या समस्येमुळे अनेक सुशिक्षित महिला या पमी गुरूकडे येतात आणि तिच्या आशीर्वादाने मुलं जन्माला आल्याचे सांगतात. धक्कादायक बाब म्हणजे या गुरूला भेटण्यासाठी पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि राजकीय मंडळी देखील येत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे देखील या गुरूला भेटायला आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अद्याप पमी गुरु विरोधात एकही तक्रार पोलिसांकडे आलेली नाही. यामुळे पोलिसांनी पमी गुरु विरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. पण पमी गुरुकडे चार फॉर्च्युनर आणि तीन थार गाड्या आहेत. तसेच पमी गुरु अनेकदा अंगावर कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने घालून वावरत असते.
याआधी बलात्कार, महिलांचे लैंगिक शोषण, महिलांची फसवणूक अशा गंभीर आरोपांमध्ये भोंदू बाबा आणि स्वयंघोषीत कॅप्टन अशोक खरात याला अटक झाली आहे. अशोक खरातसोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. अशोक खरातचे पाय धुतानाचे तसेच त्याच्या सोबत कार्यक्रमस्थळी वावरत असतानाचे रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हायरल होत असताना चाकणकरांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला. आदेशाचे पालन करत रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपला राजीनामा सोपवला.






