Sunday, July 12, 2026

Shrirampur Crime : धक्कादायक! युवा उद्योजकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूरात कडकडीत बंद

Shrirampur Crime : धक्कादायक! युवा उद्योजकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूरात कडकडीत बंद

तरुणाच्या हत्येनंतर पालकमंत्री विखे पाटल यांची पीडित कुटुंबाला भेट

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील नेवासा (Nevasa) रस्त्यावरील लक्ष्मीनारायण पॅलेस हॉटेल अँड लॉजिंगचे युवा उद्योजक आकाश चंद्रशेखर (शेखर) वेंकटरमन दुबैय्या (वय ३४) यांच्या निर्घृण हत्येच्या (Murder) निषेधार्थ रविवारी श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद (Shrirampur city completely shut down) पाळण्यात आला. व्यापारी, विविध सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बंदला पाठिंबा देत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.

शनिवारी दुपारी हॉटेलमध्ये जेवण उशिरा मिळाल्याच्या कारणावरून मद्यधुंद अवस्थेतील तिघांचा कर्मचाऱ्यांशी वाद झाला. वाद मिटविण्यासाठी आकाश दुबैय्या पुढे आले असता, संशयितांनी त्यांच्यावर काचेचा टी-पॉय आणि इतर वस्तूंनी जीवघेणा हल्ला केला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांचे वडील आणि चुलत भाऊ कुणाल दुबैय्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

घटनेनंतर पोलिसांनी निलेश जाधव, ओंकार डफळ आणि सुरज जाधव या तिघांना ताब्यात घेतले. निलेश जाधव हा रुग्णालयातील स्वच्छतागृहात, तर ओंकार डफळ हा रुग्णालयाच्या टेरेसवर लपून बसल्याचे तपासात समोर आले. तिन्ही संशयितांची चौकशी सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतरांचा सहभाग होता का, याचा तपास सुरू आहे.  (Shrirampur Crime)

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आरोपींवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याचे आश्वासन दिले.

रविवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिवंगत आकाश दुबैय्या यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या प्रकरणातील आरोपी आणि त्यांच्या पाठीराख्यांवर कठोर कारवाई करून दुबैय्या कुटुंबाला शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या घटनेमुळे श्रीरामपूरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >