मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वॉर्ड क्रमांक ९८ च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका केरकर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. लीलावती रुग्णालयात शनिवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. त्या ७४ व्या वर्षांच्या होत्या. त्यांच्या त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी पहिल्या नावाची चर्चा अलका केरकर यांची होती, परंतु वयोमानानुसार महापौर पदाच्या स्पर्धेतून त्यांचे नाव मागे पडले होते.
भावपूर्ण श्रद्धांजली !
मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वार्ड क्रमांक 98 च्या विद्यमान नगरसेविका श्रीमती अलका केरकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये त्या तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. निवृत्त शिक्षिका असणाऱ्या अलका… pic.twitter.com/1fDsKXnuUd — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 21, 2026
नुकत्याच पार पडलेल्या मुंबई सार्वत्रिक निवडणुकीत त्या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. निवृत्त शिक्षिका असलेल्या अलका केरकर यांनी सन २०१२ मध्ये प्रथम निवडणूक लढवली होती. त्यानंतर पहिल्याच टर्म मध्ये त्यांना उपमहापौर पद भूषविण्याची संधी मिळाली होती. सन २०१४-२०१५ मध्ये त्यांनी मुंबईच्या उपमहापौरपदाची जबाबदारी सांभाळली होती.याशिवाय स्थायी समिती सह इतर समित्यांमध्येही सदस्यपद त्यांनी भूषवले होते.
अत्यंत शांत पण प्रत्येक कामाची इत्यंभूत माहिती आपल्या साध्या राहणीमानातून आणि प्रामाणिक कार्यपद्धतीतून जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या प्रभागात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.पक्षनिष्ठा, भ्रष्टाचाराविरोधी भूमिका आणि अनधिकृत कामांना कधीही थारा न देण्याचा त्यांचा ठाम स्वभाव यामुळे त्या आदर्श नगरसेविका म्हणून ओळखल्या जात होत्या.
सामाजिक आणि प्रशासकीय कार्य: त्या जमिनीशी जोडलेल्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नागरी सुधारणा, आरोग्य आणि स्वच्छता या विषयांवर सक्रियपणे काम केले आहे. त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचे संबंध असून पक्ष संघटनेतही त्या सक्रिय होत्या.
सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमी तत्पर असत.गेल्या तीन दशकांपासून वांद्रे पश्चिममधील जनतेची सेवा आणि भाजपाचे काम त्यांनी मोठ्या संघर्षातून उभे केले. त्यांच्या कार्यकाळात अनेक सामाजिक आणि विकासकामांना गती मिळाली.
त्यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त करताना संस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांनी असे म्हटले आहे की, “संघर्षाच्या काळातील एक महत्त्वाचा शिलेदार आम्ही गमावला आहे. त्यांच्या जाण्याने वांद्रे पश्चिम हे एक मोठे कुटुंबच दुःखात बुडाले आहे.” अलका केरकर यांच्या निधनाने वांद्रे पश्चिम विभागाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले असून त्यांच्या आठवणी आणि कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.
रविवारी सकाळी अंत्यसंस्कार
अलका केरकर यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून म्हणजे मेफेयर अपार्टमेंट, १७ वा रस्ता, शिवाजी नगर समोर, खार पश्चिम येथुन रविवारी सकाळी ११ वाजता निघून शास्त्री नगर सांताक्रूझ पश्चिम येथील हिंदू स्मशानभूमी येथे १२ वाजता अंतिम संस्कार होतील, असे कळवण्यात आले आहे.






