Thursday, March 19, 2026

Karachi Natural Disaster : काराचीवर नैसर्गिक संकट; वादळामुळे १९ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

Karachi Natural Disaster : काराचीवर नैसर्गिक संकट; वादळामुळे १९ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराची शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी-वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. पाऊस आणि वादळामुळे झालेल्या मृत्यूंनंतर शहर प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बुधवारी (१८ मार्च) रात्री कराचीमध्ये जोरदार वाऱ्यांमुळे अनेक घरांची छपरे उडाली आणि भिंती कोसळल्या. अनेक ठिकाणी झाडे आणि साइनबोर्ड पडले. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. अशातच पाकिस्तान हवामान विभागाने गुरुवारी आणखी पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा इशारा दिला आहे.

काराचीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संघार मलिक यांनी सांगितले की, वादळादरम्यान छत आणि भिंत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथे लोक चहा पित बसले होते. त्यांनी सांगितले, “वादळ, जोरदार वारे आणि पावसामुळे सईदाबाद परिसरातील मोचको गोठ येथेही एक इमारत कोसळली आहे.”

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचाव पथक अद्याप ढिगारा हटवण्याचे काम करत असून मलब्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता आहे. कराचीचे महापौर मुर्तजा वहाब यांनी खराब हवामान लक्षात घेऊन नागरिकांनी घरातच राहावे आणि विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

अहवालानुसार, मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. हवामान विभागाने सिंध प्रांतातील इतर भागांमध्येही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >