Saturday, February 28, 2026

नाट्य महोत्सवाचे पडघम...

नाट्य महोत्सवाचे पडघम...

मराठी नाट्यसृष्टीत अनेक नाटकांचे महोत्सवी प्रयोग होत असतात. त्याचबरोबर विविध नाट्य महोत्सवही आयोजित केले जातात. असाच एक नाट्य महोत्सव दरवर्षी लक्ष वेधून घेत असतो. 'चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान'तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या नाट्य महोत्सवाची उत्सुकता नाट्यक्षेत्राला आणि रसिकांना असते. याच नाट्य महोत्सवाचे पडघम आता वाजू लागले आहेत. या अंतर्गत, यंदाचा 'सांस्कृतिक कलादर्पण २०२६' मराठी व्यावसायिक नाट्य महोत्सव आणि मराठी प्रायोगिक नाट्य महोत्सव, ९ ते १३ मार्च या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगत आहे. व्यावसायिक नाटकांसोबतच प्रायोगिक नाटकांची घेतली जाणारी दखल, हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

अलीकडच्या काळात रंगभूमीवर गाजलेल्या विविध प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांचे सादरीकरण या महोत्सवात होणार आहे. यंदा प्रायोगिक नाट्य विभागात 'कर्ण', 'स्वस्तिकाची ट्रॅजेडी', 'रेशनकार्ड', 'इथेच टाका तंबू', 'इतना सन्नाटा क्यों है भाई?', 'ऊन पाऊस' या नाटकांचे प्रयोग होणार आहेत. तर व्यावसायिक नाट्य विभागात 'सविता दामोदर परांजपे', 'फिल्टर कॉफी', 'गोष्ट तिच्या घटस्फोटाची', 'लागली पैज?', 'ठरलंय फॉरेव्हर' या नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत. साहजिकच, आता या महोत्सवाची उत्सुकता वाढीस लागली असून, नाट्यरसिकांसाठी हा महोत्सव म्हणजे नाट्यरंजक मेजवानी ठरणार आहे.

Comments
Add Comment