Saturday, July 4, 2026

रंगभूमीवरच्या कुटुंबात ‘नूपुर’ नाद...

रंगभूमीवरच्या कुटुंबात ‘नूपुर’ नाद...

राजरंग-राज चिंचणकर

 

कााही वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत ‘देविका’ हे पात्र साकारत एका अभिनेत्रीने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. ही अभिनेत्री म्हणजे नूपुर चितळे. गेली काही वर्षे मात्र ती मनोरंजन सृष्टीतून अचानक गायब झाली होती. पण आता तिचे 'कमबॅक' झाले आहे आणि तेही मराठी रंगभूमीवर...! सध्या ती 'कुटुंब किर्रतन' या नाटकात भूमिका रंगवत असून, तिच्या ‘एन्ट्री’ने रंगभूमीवरच्या या कुटुंबात ‘नूपुर’ नाद ऐकू येत आहे. यानिमित्ताने, तिच्याशी संवाद साधला असता ती म्हणते, "मी २०१७ मध्ये 'रात्रीस खेळ चाले' आणि त्यानंतर 'फुलपाखरू' या मालिका केल्या. नंतर मी दिल्लीला 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये गेले. तिथे मी ५ वर्षे होते. तिथला कोर्स संपवून दीड वर्षांपूर्वी मी पुन्हा मुंबईत आले आहे. इथे आल्यावर 'कुटुंब किर्रतन' हे नाटक माझ्याकडे आले. ते मी आधी पाहिलेले नसल्याने सरळ स्क्रिप्ट्च माझ्यासमोर आली. हे नाटक आणि यातली 'शिवानी' ही भूमिका वाचताच मी 'हो' म्हटले. हे नाटक संकर्षण कऱ्हाडे याने लिहिलेच इतके उत्कृष्ट पद्धतीने आहे, की ते वाचतानाच संपूर्ण नाटक डोळ्यांसमोर उभे राहते.

ही भूमिका मी करायला घेतली तेव्हा स्क्रिप्टचे पाठांतर चोख केल्याने भूमिका उभी करणे सोपे गेले. पण हे मी नक्कीच सांगू इच्छिते की आता जी ‘शिवानी’ लोकांना नाटकात दिसत आहे, ती फक्त मी उभी केलेली 'शिवानी' नाहीय, तर या नाटकात भूमिका रंगवणाऱ्या वंदना गुप्ते, संकर्षण कऱ्हाडे व अमोल कुलकर्णी या तिघांनी माझ्याकडून यासाठी खूप काही करून घेतले. तसेच आमचे दिग्दर्शक अमेय दक्षिणदास यांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवून आणि मग त्यात थोडेसे माझे काही टाकून मी हे पात्र उभे केले आहे. 'कमबॅक' करताना असे नाटक हाती यावे, यासाठी भाग्य लागते. प्रशांत दामले सर, संकर्षण कऱ्हाडे यांची मी आभारी आहे की त्यांनी या भूमिकेसाठी माझा विचार केला.

या आधी तन्वी मुंडले ही भूमिका करायची. मी तिचे काही प्रयोग पाहिलेले आहेत आणि उत्कृष्ट पद्धतीने ती ही भूमिका करायची. तन्वीला बघत असताना कुठेच मला असे वाटले नाही, की ती हे करतेय तर आपण ते करू. उलट माझ्या लक्षात आले की ती उत्तम प्रकारे नाटक करतेय आणि आपल्याला त्यात सर्वस्व ओतून या पात्राला पुढे घेऊन जायचे आहे. त्यामुळे मी तन्वीलाही या निमित्ताने 'थँक्यू' म्हणेन. तिने उभ्या केलेल्या 'शिवानी'ची मला खूप मदत झाली. मी हे नाटक करतेय; पण सातत्याने पुन्हा पुन्हा तेच ते करत राहणे खरे तर अवघड काम आहे.कधी कधी त्यातले नावीन्य जातेय की काय असेही वाटायला लागते. पण अशावेळी माझ्यासोबतच्या दिग्गज कलाकारांना मी पाहते. हे कलाकार वर्षानुवर्षे काम करत आहेत आणि त्यातले नावीन्य टिकवून ठेवत आहेत. ते हे कसे करतात, हे मी आता त्यांच्याकडून शिकतेय. हे माझ्यासाठी फक्त एक नाटक नाही; तर माझ्यासाठी एक 'ट्रेनिंग कॅम्प' आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा