Saturday, July 11, 2026

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमुळे मिळाली ओळख

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमुळे  मिळाली ओळख

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल 

   

रात्रीस खेळ चाले’ या भयपट मालिकेमुळे अनेक कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. या कलाकारांपैकी एक कलाकार आहे तो म्हणजे सुहास शिरसाट. सध्या ‘सनई चौघडे’ या झी वाहिनीवरील मालिकेमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत आहे.सुहास मूळचा बीडचा. बीड जिल्ह्यातील किल्ले दारूळ हे त्याचे गाव. त्याचे वडील पी. एस. आय. होते. त्याचे शालेय शिक्षण माजलगाव तालुक्यातील हिंद्रुड गावी झाले. शाळेत असताना गॅदरिंगमध्ये भाग घ्यायचा. त्यानंतर त्याने औरंगाबादमधील मिलिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे बारावीमध्ये तो नापास झाला. हा त्याचा जीवनातला पहिला टर्निंग पॉइंट ठरला. तो परत बीडला आला, त्याने के. एस. के. कॉलेजला प्रवेश घेतला. तो बारावी पास झाला. त्यावेळी त्या कॉलेजमध्ये नुकताच नाट्यशास्त्र विभाग सुरू झाला होता. संजय पाटील देवळाणकर सर हे नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्याने नाट्यशास्त्र विभागामध्ये प्रवेश घेतला. तेथे त्याला अभिनयाबद्दलची आवड निर्माण झाली. त्यावेळी 'सप्तरंग युवा मंच, बीड' हा सांस्कृतिक मंडळाचा ग्रुप होता. भगवान कांडेकर सर त्याचे प्रमुख होते. त्या मंडळातर्फे दलित नाट्य राज्य एकांकिका स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. संजय सरवदे, राजू विद्यागर, महेंद्र खिल्लारे, नीलम वाघमारे ही मंडळी नाटकाने झपाटून गेली होती, सुहासने देखील त्यांच्यासोबत एकांकिकेमध्ये भाग घेतला होता. त्याचवेळी त्याला पुण्यातील ललित कला केंद्राबद्दल माहिती कळली. नंतर तो पुण्याला गेला, तेथे त्याने नाटकात कामे केली. त्याने नाट्यशास्त्रामध्ये एम. ए. केलं. २००४ साली त्याने मुंबई गाठली. मुंबईमध्ये 'आविष्कार' संस्थेमध्ये चेतन दातारच्या मार्गदर्शनखाली चार वर्षे काम केलं. तेथे नाटक पाहायला मोठ मोठी मंडळी येत असत, त्यांच्यापुढे काम कसं मागायचं हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे होता कारण त्याचा स्वभाव मितभाषी आहे, स्वतःहून काम मागणे त्याला पटत नव्हतं, परंतु त्याला कामातून कामं मिळत गेली. संजय नार्वेकरसोबत त्याला पहिले व्यावसायिक नाटक मिळाले, तर संजय पवार सोबत दुसरे व्यावसायिक नाटक मिळाले. त्या नाटकातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट नायकाचे पारितोषिकही मिळाले. नाटकातील काम पाहून त्याला देऊळ, फॅन्ड्री, किल्ला या चित्रपटामध्ये कामं मिळाली. 'गजर' नावाच्या चित्रपटामध्ये त्याने चिन्मय मांडलेकर सोबत काम केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला राज्य शासनाचा विशेष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

नाटक, चित्रपटात काम करणे सुरूच होते, परंतु मालिकेत मात्र काम केले नव्हते. त्याची पत्नी देखील अभिनयाच्या क्षेत्रात आहे, ती मालिकेत काम करत होती, तिने त्याला मालिकेमध्ये काम करण्यास प्रोत्साहन दिले. त्याचवेळी त्याला ‘रात्रीस खेळ चाले' या मालिकेसाठी विचारणा झाली. त्याने मालिका स्वीकारली आणि पुढचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. ती मालिका व त्याची दत्ता ही व्यक्तिरेखा खूपच गाजली. आजदेखील प्रेक्षक त्याला दत्ता या नावानेच ओळखतात.'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचे शूटिंग मुंबई-गोवा हायवेवरील एक गावामध्ये चालायचे. शनिवार, रविवारी जवळपास दीड ते दोन हजार लोक त्यांना भेटायला सेटवर येत असत. त्या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखेशी प्रेक्षकांना आपुलकी वाटत होती. त्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्याच घरातील आहेत असे वाटत होत्या. आज देखील प्रेक्षक त्या मालिकेतील वाडा पाहायला जातात. सुहास आज देखील त्या ठिकाणी जाऊन तेथील लोकांना भेटतो, गप्पा मारतो. त्यानंतर अनुराग कश्यपच्या 'गँगस ऑफ वासेपूर' चित्रपटात त्याने काम केले. 'सेक्रेड गेम्स' या वेबसिरीजमध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दिकी सोबत त्याने काम केले.

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत यांनी त्यांना ' सनई चौघडे' या मालिकेत काम करण्याविषयी विचारले. सुहासला त्या मालिकेत काम करण्यास नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. त्याने सनई चौघडे ही झी मराठी वाहिनीवरील मालिका स्वीकारली. राजू सावंत या मालिकेचे निर्माते व दिग्दर्शक आहेत. ‘सनई चौघडे 'या मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील असे विचारले असता तो म्हणाला, की या मालिकेमध्ये सुभाष परब नावाची माझी व्यक्तिरेखा आहे. तो बस कंडक्टर असतो. हॅप्पी गो लकी जीवन जगत असतो. मुलीच्या लग्नाचे तो टेन्शन घेत नाही. श्री स्वामी समर्थांवर त्याची भक्ती असते. स्वामी सारे काही व्यवस्थित करतील असा त्याला विश्वास आहे. तो लालबाग - परळ भागामध्ये राहणारा आहे. तो पत्नी व चार मुलींसोबत राहत असतो.या मालिकेचे निर्माते व दिग्दर्शक राजू सावंत सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता असे विचारले असता तो म्हणाला, की राजू सावंत या मालिकेमुळे पहिल्यांदाच निर्मात्यांच्या भूमिकेत आहेत. ते कलाकारांना कोणत्याही प्रकारचे कामाचे बर्डन देत नाहीत, त्यामुळे काम करण्यास मजा येते. सेटवरून जाऊ नये असे वाटते.

या मालिकेतील इतर कलावंतासोबत काम करताना कसे वाटले असे विचारल्यावर सुहास म्हणाला, की या मालिकेमध्ये माझ्या पत्नीच्या भूमिकेत मेघना एरंडे आहे. तिचे अगोदरचे काम मला माहीत होते. या सेटवरच माझी तिच्याशी ओळख झाली. दोन दिवसांतच तिची माझ्याशी ट्युनिंग जमली. आमचे काम चांगले होत आहे. या मालिकेतील माझ्या मुली सतत मला 'पप्पा' या नावाने हाक मारीत असतात. कधी मी त्यांच्याशी थट्टामस्करी करतो, तर कधी त्या माझ्याशी मस्करी करतात. कामाच्या वेळी काम करतो. प्रेक्षकांना आमची ही फॅमिली खूप आवडते.या मालिकेतील तुमची बस कंडक्टरची भूमिका पाहून प्रेक्षकांनी काही प्रतिक्रिया दिल्या का? असे विचारल्यावर सुहास म्हणाला, की एकदा या मालिकेच्या सेटवर एक महिला आल्या होत्या, त्या म्हणाल्या की मुलीच्या लग्नाच्या वेळी तुम्ही खूप हळवे झाला होतात असा एक सीन या मालिकेमध्ये होता, त्यावेळी माझे पती रडले होते, महत्त्वाचे म्हणजे ते देखील बस कंडक्टर आहेत.

नवोदित कलाकारांना कोणता मोलाचा सल्ला देशील असे विचारल्यावर सुहास म्हणाला, की या क्षेत्रातील ग्लॅमरकडे नवोदित कलाकार पाहतात, परंतु त्या मागची मेहनत त्यांना दिसत नाही. कोणी आपला ओळखीचा असल्याने काम मिळत नाही, ते प्रत्येकाला स्वतःलाच मिळवावे लागते. या क्षेत्रात या, इथे केवळ अभिनयच आहे असे नाही, तर येथे कॅमेरा डिपार्टमेंट आहे, मेकअप डिपार्टमेंट, एडिटिंग डिपार्टमेंट आहे. कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये जा, परंतु प्रामाणिकपणे काम करा, यश हे नक्की मिळेल.सुहासच्या 'सनई चौघडे'मधील भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. नवीन नाटक देखील करण्याचा त्याचा मानस आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा