मराठी नाट्यक्षेत्रात सुरू झालेला 'नाट्य निरंतर' हा उपक्रम अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसून येत आहे. 'मराठी नाटक समूह' व 'अभिषेक थिएटर्स' यांनी एक नाट्यचळवळ म्हणून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आणि 'संकल्पना ते सादरीकरण - एक निरंतर प्रक्रिया' अशी टॅगलाईन घेत ती प्रत्यक्षात उतरवली. दर महिन्यातून एकदा या चळवळीशी संबंधित मंडळी या निमित्ताने एकत्र येत, नावीन्यपूर्ण कला सादर करतात. यावेळी, रंगकर्मी आभास आनंद यांची संकल्पना व संशोधन असलेला, 'मराठी रंगभूमीवरील बदलत गेलेला विनोद' हा विषय घेऊन हा उपक्रम सादर करण्यात आला. यात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी यांच्यापासून आतापर्यंत मराठी रंगभूमीवरच्या विनोदी लेखनात व सादरीकरणात झालेले बदल; यावर ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी मांडलेला एकूणच नाट्यप्रपंच महत्त्वाचा होता. य
शवंत नाट्यसंकुलातल्या साळगांवकर प्रायोगिक रंगमंचावर रंगणाऱ्या या उपक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पाठबळ लाभले आहे.आशीर्वाद मराठे लिखित 'पु. ल. देशपांडे यांच्या स्त्री व्यक्तिरेखा' हे मानसी मराठे यांनी यात सादर केलेले एकलनाट्य लक्षवेधी ठरले. तसेच, पु. ल. देशपांडे (अंमलदार), राम गणेश गडकरी (वेड्यांचा बाजार), श्याम मनोहर (यळकोट), आचार्य अत्रे (मी उभा आहे), अनिल सोनार (मालकीण मालकीण दार उघड), वसंत सबनीस (विच्छा माझी पुरी करा) आदी नाटकांतले प्रवेश आणि अभिवाचन आदींचा या उपक्रमात समावेश होता. श्रीनिवास नार्वेकर, आशुतोष घोरपडे, सुगत उथळे, समीर दळवी, विनीत मराठे, अनिश म्हैसाळकर, राहुल पेडणेकर, आकाश भडसावळे, विनीत मराठे, अभिषेक थोरात, अर्पित राऊळ, शंतनू राऊत, सुनीता रामटेके, मुकुल ब्रह्मे, सचिन भुसारी, श्रीपाद जोशी, सायली सारंग, हृषिकेश जाधव, दर्शना रसाळ, अक्षय नवाथे, सोनाली नाडकर, अभिजीत चांदोस्कर आदी कलाकारांचा सहभाग हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.






