टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
एकदा शूटिंगच्या वेळी ज्येष्ठ अभिनेते स्व. विक्रम गोखलेजी एका दिग्दर्शकाला माझ्यासमोर म्हणाले , “मी आघात नावाचा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला आहे व त्यात एका अभिनेत्रीने सर्वोत्तम काम केले आहे. तिचे जेवढे कौतुक करावे, तेवढे कमी आहे, खरोखर ती खूपच गुणी अभिनेत्री आहे.” ते ज्या अभिनेत्रीचे नाव घेत होते, जिचे तोंडभरून कौतुक करीत होते, त्या अभिनेत्रीचे नाव आहे मुक्ता बर्वे. तिच्या अभिनयाला मिळालेली ती जिवंत पावतीच होती.
मुक्ताचा जन्म पुण्याचा, शालेय शिक्षण झाल्यावर तिने अभिनयाची वाट धरली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून तिने अभिनयाची पदवी घेतली. ‘चकवा’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट होता. ‘जोगवा’ चित्रपटातील भूमिकेसाठी तिला महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मुंबई पुणे मुंबई, आघात, डबल सीट, बदाम राणी गुलाम चोर, स्माईल प्लीज हे चित्रपट तिने केले. आतापर्यंत तिला महाराष्ट्र राज्य शासनाचे सात पुरस्कार मिळाले आहेत. घडलंय बिघडलंय, आभाळमाया, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांतून तिने प्रेक्षकांना अभिनयाची विविधता दाखविली आहे. फायनल ड्राफ्ट, देहभान, छापा काटा या नाटकातून तिने अभिनयाची झलक दाखविली होती.
नात्यांच्या गुंत्यातील भावविश्व अधिक गहिरे करणारा ‘माया’ चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. माणूस खरोखरच एकटेपणाला घाबरतो की पोरकेपणाच्या भावनेला? नात्यांमध्ये गैरसमजुती, मनात साचत जाणाऱ्या अढी आणि त्या अढीमुळे दुरावत जाणारी माणसं यांचा भावनिक प्रवास प्रभावीपणे या चित्रपटात मांडण्यात आलेला आहे. आयुष्य पुढे सरकण्यासाठी आवश्यक असलेली भावनिक मुक्तता आणि समजूतदार संवाद या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
या चित्रपटामध्ये अनेक बेटावर जगणाऱ्या माणसांची गोष्ट आहे. त्यातले एक पात्र मुक्ताने साकारले आहे. ही माणसे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या नात्यात काय घडू शकतं, असे थोडक्यात या चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटामध्ये माया नावाची व्यक्तिरेखा तिने साकारली आहे. ती फिजिओथेरपिस्ट असते.
रोहिणी हट्टंगडी, डॉ. गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर या कलावंतासोबत तिची या चित्रपटामध्ये अभिनयाची भट्टी चांगलीच जमली आहे. जेव्हा या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, त्यावेळी तिचे रोहिणी हट्टंगडी सोबतचे ‘चारचौघी’ हे नाटक सुरू होते. ललित कला केंद्र मधून जेव्हा ती नाटक करायची, त्यावेळी विजय केंकरे तिचे गुरू होते. सिद्धार्थ चांदेकरसोबत अगोदर तिने ‘अग्निहोत्र’ ही मालिका व ‘लग्न पाहावे करून’ या चित्रपटामध्ये काम केले आहे.
डॉ. गिरीश ओकसोबत तिने ‘देहभान’ या नाटकात काम केले होते. दिग्दर्शक आदित्य इंगळेसोबत तिने ‘अलिबाबा आणि चाळिशीतील चोर’ या चित्रपटात अगोदर काम केले होते. ‘माया’ चित्रपटामध्ये तिने परत एकदा दिग्दर्शक आदित्य इंगळेसोबत काम केले आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत काम करताना कसे वाटले असे विचारले असता ती म्हणाली की, आदित्य इंगळे यांचं वैशिष्ट्य म्हणजे माणसातील भावभावनांचा पदर तो चांगल्या रीतीने उलगडून चित्रपटामध्ये प्रेक्षकांसमोर मांडतो. एखाद्या परिस्थितीमध्ये दोन वेगळ्या व्यक्ती भेटल्या, तर त्यांच्या मनामध्ये कोणत्या भावना येतात, हे तो अचूक हेरून ठेवतो. तो एक चांगला लेखक आहे व त्याचे भाषेवरचे प्रभुत्व उत्तम आहे. त्यामुळे या चित्रपटाचे संवाद डॉ. कुलकर्णी आणि त्याने छान लिहिले आहेत. त्याला चित्रपटामध्ये काय करायचे या बाबत तो ठाम होता. तरीदेखील कलाकारांना चित्रपटात काही चांगलं करण्यासाठी तो जागा ठेवून देतो. त्याला पटलं तर तो चित्रपटामध्ये ठेवतो, नाही पटलं तर कलाकारांना करू नका असे सांगतो. या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये झाले, एक छोटासा भाग पुण्यामध्ये चित्रित करण्यात आला. या चित्रपटामध्ये दोन गाणी आहेत. ती छान झाली आहेत. या चित्रपटाचे संगीत पार्थ उमरानीने दिले आहे. वैभव जोशीच्या शब्दांना पार्थ व अंजली मराठेने स्वरसाज चढविला आहे.
आयुष्यात काही नाती आपण जपतो, काही नाती नकळतपणे तुटून जातात. पण प्रत्येक नात आपल्याला काहीतरी संचित देऊन जातो. भूतकाळाच्या सावल्या कितीही गडद असल्या तरीही एकमेकांमधील संवाद आणि कुणाचा तरी मायेने झालेला स्पर्श यांच्या जोरावर आयुष्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात करता येणे शक्य असते.







