भालचंद्र कुबल-पाचवा वेद
आत्ता कुठे नव्या पिढीचे, नव्या दमाचे मराठी दिग्दर्शक हळूहळू सावरून चालायचा प्रयत्न करू लागलेत. रिलिज होणाऱ्या बहुतांशी नाटकांचे दिग्दर्शक स्ट्रगल करत करत मराठी नाटकं उभी करताहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवायला निर्मात्यांची अद्यापही वानवाच दिसतेय. कारण कोविड काळाचा झटका बसलेला नाट्यनिर्माता वर्ग स्वतःची सेफ साईड बघणारच. टाकलेला पैसा रिकव्हर होऊन वर थोडाफार प्रॉफीट झाला की पुढल्या नाटकाकडे वळणारा रेग्युलर निर्माता आणि नाटक धंद्यातील रिस्कशी दोन हात करायला निघालेला नवा निर्माता असे दोघेही नाटक इंडस्ट्रीत सावधपणे खेळताना दिसताहेत. संतोष वेरुळकर, प्रसाद खांडेकर, अभिजित झुंजारराव, ऋषी मनोहर, समीर खांडेकर, सुरज पारसनीस, संदीप दंडवते, प्रमोद शेलार इत्यादी नवे दिग्दर्शक तोच तोच दिवाणखानी नाटकाचा बाज सोडून जरा हटके देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुणेकर दिग्दर्शक किंवा नीरज शिरवईकर यांची नावे मी स्ट्रगलर्समधे घेत नाहिये, कारण त्यांचा स्ट्रगल हा स्ट्रॅटेजिक असतो, जो मुंबईकर दिग्दर्शकाशी तुलना करता येणारा नाही. या विषयावर एखाद्या दिवाळी अंकात दीर्घ लेख लिहिण्याचा विचार आहेच पण सध्या या नव्या दिग्दर्शकांवर लक्ष केंद्रित करू. हल्लीच प्रमोद विठ्ठल शेलार यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले ‘शिक्कामोर्तब’ हे नवे नाटक बघितले.
MLA Amit Satam : ओशिवरा सोसायटीतील अतिक्रमणांवर बीएमसी-मुंबई पोलिसांची संयुक्त कारवाई
‘लँड जिहाद’बाबत मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांच्या पत्रानंतर कारवाई; ओशिवरा सोसायटीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
ज्येष्ठ नागरिक, ...
प्रमोद शेलारला मी गेली जवळपास वीस वर्षे ओळखतो. त्याच्या दिग्दर्शन शैलीशी मी चांगलाच परिचित आहे. त्याच्या शैलीवर संस्कार म्हणाल तर नाटक हे प्रेक्षकांना काहीतरी देऊन जाणारे असावे, या मताशी तो ठाम असतो. बऱ्याचदा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा करता करता एक अॅटीट्युड आणि स्वभावधर्म बनून जातो. मराठी व्यावसायिक नाटकाशी याचे सूत्र जमत नाही. केवळ कॉमेडी आणि त्याद्वारे मनोरंजन म्हणजे व्यावसायिक नाटक मानणाऱ्या जुन्या पिढीला नव्या पिढीचा झुकाव कळायला थोडा जो वेळ लागेल तोच या नव्या दिग्दर्शकांचा स्ट्रगलिंग पिरीअड असेल हे विधान मी जाता जाता जबाबदारीने करत आहे. त्यामुळे आशावादाचा पेला जोपर्यंत भरत नाही माझ्या सारख्या नाट्यनिरीक्षकांनी या दिग्दर्शकांची पाठराखण करणे गरजेचे आहे, असे मी समजतो. वर्षभरापूर्वी प्रमोद शेलारांचे "सात बेलवलकर्स" नामक नाटक रंगभूमीवर प्रकाशित झाले होते. एकंदर लिखाणातच नाही तर सर्व आघाड्यांवर फसलेले नाटक प्रमोदच्या वाट्याला आले होते. नाटक बघितल्यावर जी निराशा झाली होती ती त्यावेळच्या लेखात स्पष्टपणे उमटली होती. प्रमोदला मी झोड झोड झोडला होता. ज्यावेळी मी प्रेक्षकांचा विचार करतो तेव्हा नाटक सादरकर्त्यांच्या कारणांना मी अत्यंत कमी मानतो. पाचशे रुपये खर्च करून नाटक बघायला येणाऱ्या प्रेक्षकांना प्रयोगाच्या दर्जा विषयी कारणे देणे पटतच नसल्याने, मी कुणाचीच गय करत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की बघत होतो तो प्रयोग अवघा चौथा होता. म्हणजे प्रयोगाला व्यावसायिक सफाई अद्याप यायची होती. तरी प्रयोग हा प्रयोगासारखाच चोख व्हावा ही किमान अपेक्षा बाळगून होतो आणि नाटकात काम करणाऱ्या चारही पात्रांकडून ही अपेक्षा पूर्ण करण्यात नाटक यशस्वी झाले.
सुरुवातीलाच सागर कारंडे नाटक हातात घेतो, मग ते हळूहळू उलगडतं कधी नवरा- बायकोच्या कौटुंबिक वादापर्यंत जाऊन पोहोचते आणि नंतर एका केसमुळे तीनशे साठ अंशात फिरलेला नाटकाचा प्लॉट सुखद धक्का देऊन जातो, हे सारे नक्कीच बघणेबल आहे. आपण प्रेक्षक सागर कारंडेला कॉपी मास्टर म्हणून अनुभवलेलं आहे. परंतु या नाटकातील चिडचिडा वकील त्यांनी स्वतःच्या लकबीतून उभा केलाय. प्रत्यक्ष स्क्रिप्टमधे नसतील एवढे पंचेस तो जाता जाता सहज वाजवतो. पण एक गोष्ट खटकते ती म्हणजे सागर ज्यावेळी हाय पिचमधे सुरू होतो, बाकी तिघेही त्याला सातत्याने फाॅलो करत राहतात, त्यामुळे आवश्यक नसतानाही नाटक मोनोटोनस होत जाते. बंगाली जोडप्याच्या उच्चारांपासून ते मॅनरिझम्स पर्यंतचा विकास म्हणजे भक्ती रत्नपारखी आणि कांचन पगारे या जोडीने घातलेली अभिनयाची भर नाटक सातत्याने इंटरेस्टींग करत ठेवते. शेवटचा प्रसंग तर भन्नाट आहे. त्याचा स्पायलर मी देत बसणार नाही पण मगाशी मी जे म्हटलंय की प्रमोद शेलार शेवटच्या क्षणी काहीतरी सामाजिक कानफाटीत मारूनच जातो, त्याचा विचार करत करत आपण थिएटर बाहेर पडतो. सर्वात जास्त कौतुक करायचे म्हणून मी स्नेहा पराडकरचा उल्लेख शेवटी करतोय. बाकी तिघांच्या अनुभवापुढे स्नेहाचा अनुभव तसा तोकडा आहे. परंतु ती ज्या खंबीरपणे स्वतःला सिद्ध करते, ते तिच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. हे नाटक सुरु होते हलक्यात पण मग पुढे पुढे ते जड होत जाते. बऱ्याच कालावधीनंतर अभिजित पेंढारकरचे संगीत ऐकायला मिळाले आणि इथेही नेपथ्य व प्रकाश योजनेसाठी संबें आणि शीत आहेच. वरील परिच्छेदात जे नव्याने येणाऱ्या निर्मात्यांबाबत विधान केलेय त्यात महेंद्र खराडे यांचे नाव नव्याना संधी देणारा दिग्दर्शक म्हणून करावे लागेल. नाटकाचे ‘पोझिशनिंग’ जर व्यवस्थित झाले तर हे नाटक नव्या पिढीचे स्ट्रगलिंग दूर करण्याचं ‘शिक्कामोर्तब’ असेल, हे नक्की.