Saturday, June 20, 2026

रंगभूमीवरचं पहिलंवहिलं पाऊल...

रंगभूमीवरचं पहिलंवहिलं पाऊल...

प्रत्येक रंगकर्मी कधी ना कधी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकतोच आणि तिथून त्याचा नाट्यावकाशातला प्रवास सुरू होतो. पुढे कितीही यश मिळाले; तरी हे पहिले पाऊल त्याच्या कायम लक्षात राहते. सध्या मराठी रंगभूमीवर मुक्ती साधना व धनश्री दामले या अभिनेत्रींनी असेच पहिले पाऊल टाकले आहे. त्यांच्या पहिल्यावहिल्या भूमिकेचे औचित्य साधून त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...

हा तर माझाच प्रवास... थिएटर परफॉर्मन्स म्हणून 'महोगाथा' हे माझे पहिलेच नाटक आहे. यापूर्वी मी चळवळीत काम करताना पथनाट्ये, शाहिरी जलसे वगैरे केलेले आहेत. पण आता प्रत्यक्ष थिएटर परफॉर्मन्स करत आहे आणि तेही दिग्गज रंगकर्मी व निर्मिती संस्थेसोबत...! मंगेश सातपुते यांच्यासारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या सोबत पहिले नाटक करायला मिळणे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आतापर्यंतचे माझे प्रयोग अतिशय छान झाले आणि ते फक्त सोबत काम करणाऱ्या टीममुळे...! हृदयनाथ जाधव असेल, सावित्री मेधातुल असेल; यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. 'महोगाथा' हे नाटक करताना मला खूप जास्त अभिमान वाटतोय की मला महाश्वेतादेवी यांची लोकप्रिय अशी व्यक्तिरेखा 'मोयना' रंगभूमीवर करायला मिळत आहे. सतत प्रश्न विचारणारी ही मुलगी आहे आणि व्यवस्थेलाही ती प्रश्न विचारत राहते. तिचा हा जो प्रवास आहे, तो मला माझा स्वतःचा प्रवास वाटतो. 'मोयना'ला मी स्वतःच्या आयुष्यात खूप रिलेट करते आणि मला आनंद आहे की ही व्यक्तिरेखा मला करायला मिळत आहे. माझ्यासोबत काम करणारे कलाकार हृदयनाथ जाधव, सावित्री मेधातुल, विक्रम होता हे खूप अनुभवी आहेत. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळत आहे. आमच्या नाटकाच्या आधी आम्ही जो सराव करतो; त्यात मला वेगवेगळ्या पद्धतीने नवनवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि हा आता माझ्यासाठी रोजच्या जगण्याचा भाग झालेला आहे. मला असे वाटते की ही तर माझी सुरुवात आहे. पण त्याच्यापुढे जाऊनही मी या भूमिकेत मोठ्या प्रमाणात काहीतरी चांगले देऊ शकेन. यापुढेही मला जर अशीच स्ट्रॉंग कॅरेक्टर्स करायला मिळाली म्हणजे अभ्यासपूर्ण अशा नाटकाच्या, शॉर्ट फिल्म्सच्या किंवा फिल्म्सच्या स्क्रिप्ट्स मिळाल्या; तर मला काम करायला नक्कीच आवडेल. पण तरी मला असे वाटते की मी काही ठरावीकच गोष्टी करू शकते. सरसकट कुठल्याही भूमिका मी करीन, असे मला वाटत नाही.- मुक्ती साधना (अभिनेत्री) नाटक म्हणजे सजगता... नाटकात काम करावे, अशी कॉलेजमध्ये असल्यापासून इच्छा होती. पण त्यासाठी मी कधीही काही वेगळा प्रयत्न वगैरे केला नाही. मी बरीच वर्षे निवेदनाच्या क्षेत्रात आहे आणि त्या क्षेत्रात माझे काम सुरू आहे. त्यामुळे नाटकाकडे फारसे लक्ष दिले नाही. पण जेव्हा ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांनी 'मी अश्वत्थामा चिरंजीव' या नाटकासाठी विचारणा केली; तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितले की 'मला नाटकाचा काहीच अनुभव नाही'. पण ते म्हणाले, "नाटकासाठी जे काही शिकवावे लागेल ते मी शिकवेन, तू ही भूमिका करावी अशी माझी इच्छा आहे". मग आमच्या तालमी सुरू झाल्या. पात्रे कशी उभी करायची, रंगभूमीवर उभे राहताना किंवा वावरताना कोणत्या तांत्रिक बाबी असतात; या सगळ्या गोष्टी मला हळूहळू कळायला लागल्या. मी जितकी शिकण्यासाठी उत्सुक होते; तेवढेच अशोककाका शिकवण्यासाठी उत्सुक होते आणि त्यामुळे हे सर्व जमून आले. अशोककाका यांच्यासारख्या ज्येष्ठ रंगकर्मीसोबत काम करताना सुरुवातीला खूप दडपण येईल असे मला वाटले होते; पण त्यांनी ते तसे मला जाणवू दिले नाही, हा त्यांचा मोठेपणा आहे. 'मी अश्वत्थामा चिरंजीव' या नाटकाच्या निमित्ताने सध्या या नवीन क्षेत्राचा अनुभव घेत आहे. यापुढेही कुठले चांगले नाटक माझ्याकडे आले, तर मी ते नक्कीच करीन. पण माझे निवेदन सुरूच राहील, कारण ते माझे मुख्य कार्यक्षेत्र आहे. नाटक करणे म्हणजे केवळ एक आर्टिस्ट म्हणून काम करणे असे नाही; तर नाटक हे टीमवर्क आहे आणि काम करताना ते स्पष्टपणे जाणवत राहते. कारण जरी आपण आपली व्यक्तिरेखा निभावत असलो, तरी आजूबाजूच्या व्यक्तिरेखांचे हावभाव, त्यांच्या अचानक येणाऱ्या प्रतिक्रिया लक्षात घेता; आपल्याला सुद्धा रंगभूमीवर कायम सजग असावे लागते. नाटक म्हणजे केवळ पाठांतर नाही; तर नाटक म्हणजे सजगता. माझ्या भूमिकेची तयारी करताना मी याच गोष्टी लक्षात ठेवल्या. पाठांतर कितीही अचूक असले तरी वाक्याच्या चौकटीत अडकायचे नाही, हे नक्की केले. नाटकाची चार महिने तालीम करताना आणि नाटकाचे पहिले दहा प्रयोग करताना मला जाणवले की सजगता ही सर्वात महत्त्वाची आहे.- धनश्री दामले (अभिनेत्री)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा