Saturday, February 28, 2026

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर

केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या लाखो मजुरांची होळी आता आनंदात साजरी होणार आहे. यासाठी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.

प्राप्त झालेली रक्कम थोड्या दिवसांमध्ये थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील लाखो मजुरांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, आगामी होळी सण अधिक आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यास मदत होणार आहे.

मजुरांना आर्थिक अडचणी : गेल्या काही कालावधीत मनरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची मजुरी थकीत असल्यामुळे अनेक ग्रामीण कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर मंत्री गोगावले यांनी संबंधित केंद्रीय विभागाशी सातत्याने संवाद साधत निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश येत केंद्र शासनाने ११३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

...............

राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबतच मजुरांच्या हक्काच्या मजुरीसाठी शासन कटिबद्ध आहे. भविष्यातही मनरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रत्येक मजुराला वेळेवर मजुरी मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील राहील. - भरत गोगावले, मंत्री, रोजगार हमी योजना

Comments
Add Comment