Sunday, February 22, 2026

‘ना समझे वो अनाडी हैं!’·

‘ना समझे  वो अनाडी हैं!’·

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

दोबिघा जमीन’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून वयाच्या ३१व्या वर्षी करिअर सुरू केलेल्या ऋषिकेश मुखर्जी यांनी ३७व्या वर्षी स्वत: ‘अनाडी’(१९५९) दिग्दर्शित केला आणि तब्बल ५ फिल्मफेयर पुरस्कार पटकावले! ऋषीदांनी ललिता पवार यांना क्वचितच मिळणाऱ्या सकारात्मक भूमिकेसाठी ‘सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा’ फिल्मफेयर मिळवून दिला, राज कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, शैलेंद्रला सर्वोत्तम गीतकार, मुकेशला सर्वोत्तम गायक, शंकर जयकिशन यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार असे ५ पुरस्कार मिळवून दिले!

अनाडीत यात ज्येष्ठ अभिनेते मोतीलालजी होते. ते सहज अभिनयासाठी प्रसिद्ध झालेले पहिले अभिनेते. त्यांना त्यापूर्वीच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून दोन फिल्मफेयर ‘देवदास’(१९५५) आणि ‘परख’(१९६०) मिळालेले होते. शैलेंद्रची गाणी, शंकर जयकिशन यांचे संगीत, सोबत मुकेशचा नितळ आवाज यामुळे ‘किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार’आणि ‘सब कुछ सीखा हमने, ना सिखी होशियारी’सारखी ‘अनाडी’ची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. राज कपूर आणि नूतनसोबत होते शुभा खोटे, मुक्री आणि नाना पळशीकर.

राजकुमार (राज कपूर) एक चित्रकार असतो. त्याचे उत्पन्न इतके कमी की, धड घरभाडे द्यायलाही पैसे नसतात. पण प्रेमळ डिसा आंटी (ललिता पवार) त्याला झापतझापत का असेना सांभाळून घेत असते. एकदा रस्त्यात राजकुमारला पैशाने भरलेले पाकीट सापडते. तो ते मालकाला शोधून (मोतीलाल अर्थात ‘औषध उद्योगपती रामनाथ सोहनलाल’ यांना) नेऊन देतो. त्याच्या प्रामाणिकपणाने प्रभावित झालेले रामनाथजी त्याला आपल्या कार्यालयात नोकरी देतात.

तिथे त्याची भेट आरती सोहनलालशी (नूतन) होते. ती त्याच्या प्रेमात पडते, पण आपली ओळख लपवून ती स्वत:ला रामनाथ यांची कामवाली ‘आशा’ (शुभा खोटे) असल्याचे भासवते. एक दिवस सत्य उघडकीस आल्याने राज कपूर अतिशय दु:खी आणि निराश होतो व त्यांचे नाते तुटते. पुढे कोरोनासारखी फ्ल्यूची साथ येते. लालचीपणामुळे सेठ साथ पसरण्याआधीच प्रचंड प्रमाणात औषधे निर्माण करून ठेवायच्या मागे लागतात. त्यातच गडबड होऊन एका औषधात विष मिसळते. ते औषध खाल्याने डिसा आंटीचा मृत्यू ओढवतो. विषप्रयोगाच्या संशयावरून राज कपूरला अटक होते. त्याला फाशीची शिक्षा होण्याची वेळ येताच उपरती होऊन रामनाथ आपल्या चुकीची कबुली देतात आणि राज कपूरची निर्दोष सुटका होते. शेवटी राजकुमार व आरतीचे प्रेम पुन्हा जिवंत होते. अशी ही सुखांतिका!

अनाडीची गाणी प्रचंड गाजली. एकूण ७ पैकी ५ शैलेंद्रने आणि २ हसरत जयपुरी यांनी लिहिली. त्यावर्षी ‘बिनाका’च्या क्रमवारीत शैलेंद्र यांचे मुकेशच्या आवाजातले ‘सबकुछ सिखा हमने...’ तिसऱ्या क्रमांकावर आणि हसरत जयपुरी यांचे ‘वोह चांद खिला, वो तारे हसे...’ चौथ्या क्रमांकावर वाजले!

मराठीत दादा कोंडके यांनीही नेहमी निर्मळ मनाच्या ग्रामीण तरुणाची भूमिका करून लोकप्रियता कमावली. त्यांच्या फटकळ, पण प्रेमळ आईची भूमिका अभिनेत्री रत्नमाला यांना मिळायची. कदाचित दादांनी ही कल्पना राज कपूरच्या सिनेमातून उचलली असावी. कारण ‘श्री ४२०’(१९५५), परवरीश (१९५८), ‘दिवाना’(१९६७), ‘जिस देश में गंगा बहती हैं(१९६०) आणि ‘अनाडी’(१९५९)मध्येही ललिता पवारच राज कपूरच्या आईच्या किंवा त्याच्यावर मातृवत प्रेम करणाऱ्या भूमिकेत असायच्या. राज कपूर अनेकदा स्वत:कडे भोळसट, भाबड्या, अतिसज्जन युवकाची भूमिका घेऊन उलट नायिकेलाच प्रेमात पुढाकार घेताना दाखवत असे. स्वत:ला ‘चार्ली चॅप्लीन’सारखे प्रोजेक्ट करण्याच्या प्रयत्नाचाच तो एक भाग होता! एकदा नूतन ऐन पौर्णिमेच्या रात्री राज कपूरला बागेत घेऊन जाते. आपले प्रेम थेट व्यक्त करणे आणि त्यालाही प्रेमात प्रतिसाद देण्यास उद्युक्त करणे हा तिचा प्रांजळ हेतू असतो. राज कपूरला ते काहीही समजत नाही. तो फक्त तिच्या केसात फूल माळण्याचा प्रयत्न करत राहतो असा गंमतीदार प्रसंग होता. त्या प्रसंगासाठी दिलेले खेळकर प्रेमाचे गाणे आजही रसिकांना आठवते. कृष्णधवल चित्रपटातही किती सुंदर चित्रण होऊ शकते याचा ते पुरावाच होते. पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात घडणारा हा प्रसंग कवीने फार रम्यपणे शब्दांत उतरवला होता. शब्द होते -

“वो चाँद खिला, वो तारे हँसे, ये रात अजब मतवारी हैं. समझनेवाले समझ गये हैं, ना समझे, ना समझे वो अनाड़ी हैं.”

संपूर्ण गाण्यात राज कपूरच्या तोंडी मुकेशच्या आवाजात एकच वाक्य एकदाच होते! गाण्यात कॅमेरा नूतनच्या चेहऱ्यावरच खिळलेला होता. तिच्या एकेक अदा, नितळ, सात्त्विक सौंदर्य कॅमेरामनने सुंदरपणे टिपले आहे. गाणे केवळ तिच्यासाठी पाहावे इतके छायाचित्रण रेखीव आहे. श्रीमंतीतून आलेल्या आत्मविश्वासामुळे मोकळेपणाने वावरणारी आरती प्रियकराला प्रणयासाठी थेट आमंत्रण देताना त्यावेळच्या सुसंस्कृत वातावरणाप्रमाणे निसर्गातील गोष्टींचा आधार घेते. ती म्हणते ‘आजूबाजूला बघ, सगळ्या पाऊलवाटा चंद्रप्रकाशात कशा चांदीसारख्या चमकत आहेत, आपल्याला बोलावत आहेत. चंद्रकिरण बाहू पसरून जणू आलिंगनालाच उत्सुक आहेत. माझ्या मनातही प्रेमाची अभिलाषा जन्म घेते आहे, मन नुसते नाचू लागले आहे. हृदयात प्रीतीच्या तारा आपोआप छेडल्या जाताहेत. प्रीती जणू सगळ्या आसमंतात

उचंबळून नाचते आहे. ‘चाँदीसी चमकती राहें, वो देखो झूमझूमके बुलायें. किरणोंने पसारी बाहें, के अरमाँ नाच नाच लहराये. बाजे दिलके तार, गाये ये बहार, उभरे है प्यार जीवनमें. वो चाँद खिला...’

ती म्हणते, ‘चंद्राची किरणे बघ, कुणावर तरी फिदा असल्यासारखी ओढणी ताणून प्रतीक्षेत उभी आहेत. चंद्रही किती डौलात निघालाय आणि रात्र तर त्याच्यावर मुग्धपणे फिदा आहे. आकाशात अगणित ताऱ्यांनी विणलेल्या जाळ्यात माझे मन हरवले आहे. त्याला हळुवारपणे बाहेर काढशील का? ते तर अगदी वेडेच झाले आहे, त्याला कशाचेच भान नाही.

‘किरणोने चुनरिया तानी, बहारें किसपे आज हैं दीवानी. चंदाकी चाल मस्तानी, है पागल जिसपे रातकी रानी. तारोंका जाल, लेले दिल निकाल, पूछो न हाल मेरे दिलका! वो चाँद खिला...’

आता हल्ली बाहेर पौर्णिमा असली काय अन् अमावस्या असली काय आम्हाला कुठे पत्ता असतो? एखादे चंद्रग्रहण असले, तरच आपण आकाशातला किंवा वृत्तवाहिन्यांनी ग्रहण दाखवले, तर टीव्हीवरचा चंद्र पाहतो! पण अशी कर्णमधुर, अर्थपूर्ण, सुंदर गाणी ऐकल्यावर अलगद फुलणाऱ्या मानवी नात्यांपासून, निसर्गाशी समरस झालेल्या साध्यासरळ पण रसरशीत जगण्यापासून आपण किती दूर आलो आहोत त्याची जाणीव होते आणि आजचे कृत्रिम वास्तव अस्वस्थ करते.

Comments
Add Comment