Wednesday, April 29, 2026

10 वी पास दाम्पत्याचं कांड ऐकून तुम्हालांही बसेल धक्का, निवृत्त न्यायाधीशाचं घर भाड्यानं घेतलं आणि...

10 वी पास दाम्पत्याचं कांड ऐकून तुम्हालांही बसेल धक्का, निवृत्त न्यायाधीशाचं घर भाड्यानं घेतलं आणि...

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही वर्षांपूर्वी राज्यात बीडमधील मुंडे दाम्पत्याकडून होत असलेल्या गर्भपात घटनेचा उलगडा झाल्यानंतर खळबळ उडाली होती. महिलांचे अवैधपणे गर्भपात करुन पैशाच्या हव्यासापोटी माणुसकीला काळिमा फासण्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती. आता, छत्रपती संभाजीनगरमध्येही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे अवैध गर्भपाताचा हा सर्व प्रकार एका निवृत्त न्यायाधीशांचा बंगल्यात सुरु होता. 10 वी उत्तीर्ण दाम्पत्याने हे घर भाड्याने घेतलं आणि आणि या घराला काळ्या कारनाम्यांचं ठिकाण बनवलं. (Chhatrapati Sambhajinagar)

छत्रपती संभाजीनगर शहरातील रशीदपुरा भागात ही मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. येथील रशीदपुरा भागात एका निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्याने घेऊन अवैध गर्भपात केंद्र चालवले जात होते. पोलिसांच्या छाप्यात या अमानुष कृत्याचा पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गर्भपातानंतर अर्भक थेट खिडकीतून मागील नाल्यात फेकले जात होते आणि भटक्या कुत्र्यांकडून त्यांची विल्हेवाट लावली जात होती. याप्रकरणी एका सतर्क महिलेच्या फोननंतर पोलिसांनी कारवाई करत चार जणांना अटक केली असून त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी (Police custody ) सुनावण्यात आली आहे.

10 वी पास दाम्पत्याचं मोठं कांड

10 वी उत्तीर्णअसलेल्या दाम्पत्याने आपल्या घरातच मिनी ऑपरेशन थिएटर उभारून गेल्या पाच वर्षांपासून अवैध गर्भपाताचा (Illegal abortion) क्रूर व्यवसाय सुरू ठेवला होता. रशीदपुरा परिसरात गर्भपात सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता, एका 24 वर्षीय विवाहितेवर गर्भपाताची प्रक्रिया सुरू असल्याचे आढळले. यावेळी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून तिला घाटी रुग्णालयात दाखल केले.

तपासणीदरम्यान घरात सापडलेल्या साहित्याने आरोग्य पथकही हादरले. मोठ्या रुग्णालयांमध्ये वापरली जाणारी अत्याधुनिक वैद्यकीय साधने येथे उपलब्ध होती. यावेळी तब्बल 24 प्रकारची उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात धक्कादायक खुलासा झाला असून मुलगी असल्याच्या संशयावरून गर्भपात करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात गर्भात मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. गर्भपातासाठी लागणारी औषधे कुठून आणली जात होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा