कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना यूपिआय व नेट बँकिंगचा सुरक्षित वापर, ओटीपी व लिंक फ्रॉडपासून संरक्षण, बनावट कॉल-मेसेज ओळखणे, सोशल मीडिया सुरक्षितता, पासवर्ड संरक्षण तसेच चाटजीपीटी सारख्या एआय साधनांचा योग्य वापर याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन देणे हा आहे.
या डिजिटल साक्षरता प्रवासाची सुरुवात एनएसएस शिबिरांतर्गत रुंदे व अंबिवली गावात करण्यात आली. या ठिकाणी शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष मोबाईल वापरून युपिआय सेट-अप, फसव्या लिंक कशा ओळखायच्या, कॉल फ्रॉडची उदाहरणे, सायबर फसवणूक झाल्यास कुठे व कशी तक्रार करावी, तसेच फोन हरवल्यास घ्यावयाची तत्काळ पावले याची माहिती देण्यात आली. यानंतर काळा तलाव, कल्याण (पश्चिम) येथे सकाळी दोन सत्रांमध्ये सायबर जागरूकता उपक्रम राबविण्यात आला. येथे नागरिकांशी थेट संवाद साधत क्यूआर कोड स्कॅम, ओटीपी शेअरिंगचे धोके, सोशल मीडिया हॅकिंगपासून संरक्षण, सुरक्षित पासवर्ड तयार करण्याच्या पद्धती तसेच चाटजीपीटी सारख्या आधुनिक एआय साधनांचा शैक्षणिक व दैनंदिन जीवनातील उपयोग सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आला.
पुढील टप्प्यात डी मार्ट, वसंत व्हॅली, खडकपाडा तसेच राणी लक्ष्मीबाई उद्यान, सिंडिकेट परिसरात नागरिकांसाठी सायबर जागरूकता सत्रांचे आयोजन करण्यात आले. बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना युपीआय व्यवहार करताना आवश्यक खबरदारी, बनावट अॅप्स व लिंक ओळखणे, फोन हरवल्यास घ्यावयाची तात्काळ पावले, तसेच “सायबर सेफ्टीच्या सात सवयी” प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आल्या.या सर्व उपक्रमांदरम्यान सायबर दृष्टी सेलच्या टीमने लाईव्ह डेमो, प्रश्नोत्तर सत्र, प्रत्यक्ष केस-स्टडी उदाहरणे आणि वैयक्तिक मार्गदर्शन देत नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यामुळे नागरिकांना केवळ माहितीच नव्हे तर प्रत्यक्ष वापरात येणारे उपाय मिळाले. या मोहिमेचे नेतृत्व विद्यार्थी समन्वयक लक्ष्मी सिंह व प्रसाद जावळे यांनी केले. मुख्य कार्यसंघात दिव्या नायर, प्राची चौहान, यशराज गायकवाड, मुरतझा सेवक, वेदांग सगभोर, वेदिका केणी, सेजल भिलारे, प्रांशू मिश्रा, अथर्व जाधव, सुभश्री पाधी, आदित्य मिश्रा तसेच इतर विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले. या उपक्रमांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिपिनचंद्र वडेकर व शिक्षक समन्वयक डॉ. रुपेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी डिजिटल सुरक्षितता ही आजच्या काळाची गरज असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. या मोहिमेमुळे अनेक नागरिकांमध्ये डिजिटल व्यवहारांबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून सायबर फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक सजगता वाढल्याचे सहभागी नागरिकांनी सांगितले.
भविष्यात सायबर दृष्टी सेलकडून ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून पुढील टप्प्यात पोलीस स्टेशन, उल्हासनगर, वसिंद, आसनगाव, केडीएमसी परिसर, हिवरे बाजार, टिटवाळा मंदिर परिसर, शहरी वसाहती तसेच ग्रामीण समुदायांमध्ये डिजिटल साक्षरता व सायबर जागरूकतेचे उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम म्हणजे नागरिकांना डिजिटल जगात सुरक्षित, सजग आणि आत्मनिर्भर बनविण्याचा प्रभावी सामाजिक प्रवास असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






