डार्विन : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. डार्विन कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर खराब फॉर्ममध्ये असलेल्या सलामीवीर जॅक वेदरल्डला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून, त्याच्या जागी डाव्या हाताचा फलंदाज मॅथ्यू रेनशॉ याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
डार्विन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून दणदणीत पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात तंत्रात बदल करूनही वेदरल्डला दोन्ही डावांत मिळून अवघ्या २३ आणि ० धावा करता आल्या. गेल्या वर्षी ॲशेस मालिकेत पदार्पण केल्यापासून वेदरल्डने ६ कसोटी सामन्यांत २०.३६ च्या सरासरीने केवळ २२४ धावा केल्या आहेत.
वयाच्या १९व्या वर्षी विश्वविजेती, आता अर्जुन पुरस्काराची मानकरी; नागपूरच्या दिव्या देशमुखचा यशस्वी प्रवास नागपूर : बुद्धिबळाच्या पटावर गेल्या काही ...
वेदरल्डच्या कामगिरीबाबत बोलताना प्रशिक्षक अँड्रयू मॅकडोनाल्ड म्हणाले, "जॅकने त्याच्या फलंदाजीच्या तंत्रात आणि हालचालींमध्ये काही बदल केले होते. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी संधींमध्ये खेळाचे मूल्यांकन करणे कठीण असते. पहिल्या डावात तो एका चेंडूवर त्रिफळाचित झाला तर दुसऱ्या डावात ड्राईव्ह मारताना बाद झाला. दबावाच्या परिस्थितीत हे नवीन तंत्र टिकेल की नाही हे सांगणे कठीण आहे."
मॅथ्यू रेनशॉची निवड का? : ३० वर्षीय मॅथ्यू रेनशॉने तीन वर्षांपूर्वी भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत १४ कसोटी सामन्यांमध्ये ६४५ धावा केल्या आहेत. मात्र, प्रथम श्रेणी क्रिकेट (शेफिल्ड शिल्ड) मध्ये त्याने क्वीन्सलँडसाठी शानदार कामगिरी करत १० डावांमध्ये सुमारे ५० च्या सरासरीने ४९९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मॅके येथील मैदानावर रेनशॉच्या नावे दोन प्रथम श्रेणी शतके आहेत, ज्यामुळे त्याला प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय, जोश इंग्लिस देखील ट्रॅव्हिस हेडसोबत फलंदाजीला येण्याचा एक पर्याय म्हणून उपलब्ध आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हॅझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, नॅथन लिऑन, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.





