Sunday, April 28, 2024
Homeमहत्वाची बातमीसंजय राऊतांची चु...गिरी

संजय राऊतांची चु…गिरी

  • अरुण बेतकेकर, माजी सरचिटणीस, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना

माझ्या टीकाकारांसाठी मी वापरलेला शब्द असंसदीय नाही. तो शब्द योग्यच आहे. काय तक्रार करायची ती करा. हे अशिक्षित अडाणी लोक आहेत. मी वापरलेल्या ‘चु…’ आणि ‘चु…गिरी’ बंद करा, याचा अर्थ अनेक ठिकाणी मूर्ख, पढतमूर्ख, शतमूर्ख असाच आहे. पण हे लोक ते समजून घेत नाहीत. ज्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांच्यासाठी हा शब्द योग्यच आहे. बाळासाहेब ठाकरे माझे गुरू आहेत. त्यांचे शब्दभांडार आपल्याला माहीत आहे. ते गुरू असल्यामुळे हे शब्दभांडार आम्ही त्यांच्याकडूनच घेतले आहे. मूर्ख बोलणं हा काही असंसदीय शब्द आहे का? शब्दकोशात एका शब्दाला वेगवेगळ्या प्रकारे अर्थ काढले जातात. त्यांचे पर्यायी शब्द असतात. त्याची मांडणी असते. भाजप हा सुशिक्षित लोकांचा पक्ष आहे. महाराष्ट्राला संस्कार आणि संस्कृतीची परंपरा आहे. तुम्ही शिकलं पाहिजे. शिकलं तर मोठे व्हाल.” …इति प्रगल्भ, विश्वप्रवक्ते संजय राऊत.

आई – बायको – बहिणीचा असंसदीय शब्दात उद्धार करणे यास शिवीगाळ म्हटलं जातं. त्यास समानार्थी समाजाभिमुख शब्द उपलब्ध आहेत. मराठी भाषा जितकी समृद्ध तितकीच अलंकारितही आहे. असे असताना सुसंस्कृत समाजात वावरताना आपण कोणत्या शब्दाचा वापर करणे उचित समजता? स्वतःस बाळासाहेबांचे शिष्य म्हणवता, मग बाळासाहेबांच्या काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसबाबतच्या भूमिकेस तिलांजली देत आपण काँग्रेस – राष्ट्रवादीची तळी का उचलत आहात? नीती-अनीती यामधील लक्ष्मणरेषा पुसट असते. आपण अनीतीकडे झुकला आहात, नैतिकतेचा आव आणत नाक वर करून तोऱ्यात जगत आहात. आपल्यासारख्या अर्वाच्च, तोंडाळ प्रवक्त्यास बदमाश राज्यसत्तेचा आधार प्राप्त होतो, हे दुर्दैव. आपणास कोणतेही वैचारिक अधिष्ठान नाही. तारतम्य सोडून वागण्याची, बोलण्याची, लिहिण्याची सवय आपणास जडली आहे. आपला तोरा, लेखणी, वाणी म्हणजे जणू काही स्वतःसाठी काही अपेक्षा न करता विश्वाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना, अर्थात ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान, असा आभास आपण निर्माण करू पाहता. सांगोपांग विचार करता आपला मेंदू सडलेला आहे, हे निश्चित.

आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य नेमके केव्हा झालात, याचा उलगडा एकदाचा करून टाकाच. आपली अक्कलदाढ उगवली त्यावेळी आपण शरद पवार यांचे शिष्य होता. प्रत्येक लोकप्रभा अंकातील लिखाणात शिवसेनेवर शरसंधान केले, धिंडवडे काढले. आपल्या त्यावेळी लिहिलेल्या लेखातून आपला कल कोणाकडे होता हे सांगणारे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर, आज ज्या बाळासाहेब ठाकरे यांना आपले गुरू असे संबोधता त्या बाळासाहेबांनीच एका मुलाखती दरम्यान शरद पवार आणि संजय राऊत यांच्याबद्दल ‘सणसणीत’ वक्तव्य केले होते. ही घटना १० मे १९९२ ची. तेव्हासुद्धा बाळासाहेब ना आपले गुरू होते, ना आपण साधे शिवसैनिक होता. जुलै – ऑगस्ट १९९२ साली आपण दैनिक सामनामध्ये रुजू झालात. पुढील सात-आठ वर्षांतच आपणास शिवसेनेचे खासदार होण्याचे डोहाळे लागले. १९९८ साली आपणास राज्यसभेवर उमेदवारी देण्याचे मान्य केले होते, पण ते मला न देता प्रितीश नंदी यांना दिले. यावरून सामना मुखपत्रातून संपादक असूनही बाळासाहेबांवर आपण आगपाखड केली. म्हणजे १९९८ सालीसुद्धा बाळासाहेब ठाकरे आपले गुरू नव्हते. कालांतराने २००४ साली आपण खासदार झालात. आज आपली तिसरी टर्म सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे २०१२ रोजी निवर्तले आणि आपल्या मनातील शरद पवारांविषयी दबून राहिलेले प्रेम उफाळून बाहेर पडू लागले. म्हणजेच २०१२ सालीही बाळासाहेब ठाकरे आपले गुरू नव्हते.

आज आपण बेफाम – बेभान उसळला आहात. आपल्यास रोखण्याचे धारिष्ट्य सध्या शिवसेना शीर्षस्थ नेत्यात नाही. २०१४ ते २०१९ शिवसेना भाजप युतीचे सरकार होते. पण सामन्यातील आपले लिखाण युती विरोधात, भाजपला पिंजऱ्यात उभे करणारे व शरद पवारधार्जिणे होते. त्यात वृद्धी होत आज आपण शिवसेनेला शरद पवार यांच्या दावणीला नेऊन बांधले. म्हणजेच २०१९ सालीसुद्धा बाळासाहेब आपले गुरू नव्हते. बाळासाहेब म्हणत ‘शिवसेनेची काँग्रेस होईल, अशी वेळ आल्यास मी शिवसेना पक्ष बरखास्त करेन’.

दिल्लीत गेल्यापासून शरद पवार यांची अन्य पक्षांच्या एखाद्या प्रमुख नेत्यास आपल्या खिशात राखण्याची कार्यपद्धती आहे. आपण तर अलगदच त्यांच्या खिशात जाऊन बसलात. आज आपली ख्याती शिवसेनेतील शरद पवार यांच्या दावणीला बांधलेला नेता म्हणून होत आहे. उदाहरणादाखल अलीकडचीच गाजत असलेली घटना, बडतर्फीवरून विविध पक्षांचे काही खासदार संसद परिसरात धरणे आंदोलन करीत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अन्य पक्षांचे नेते पोहोचत आहेत. या बडतर्फ खासदारांत शिवसेनेच्या खासदारांचाही समावेश आहे. त्यांना भेटण्यासाठी शिवसेना खासदारांना संघटित करून संजय राऊत तेथे पोहोचले नाहीत, तर शरद पवारांच्या तेथील आगमनाचे व आदरातिथ्य करण्यासाठी मात्र ते आवर्जून पोहोचले. पवारांना खुर्ची देण्यासाठी एकही बडतर्फ खासदार जागेवरून हलला नाही. तर खुर्ची घेऊन संजय राऊत मात्र धडपडले. त्यांचे खुर्ची देणे ट्रोल झाले, मात्र मुळात संजय राऊत त्या ठिकाणी आधीच पोहोचून कोणाची वाट बघत होते, हा मुद्दा मात्र गुलदस्त्यात राहिला.

सर्वच विरोधकांवर असे अर्वाच्च भाषेत तोंडसुख घेणे, हा आपला नित्याचा कार्यक्रम झाला आहे. याआधी अभिनेत्री कंगना राणावत यांना ‘हरामखोर’ म्हणत त्याचा अर्थ ‘नॉटी’ अशी मल्लिनाथी केली. आज चु…चा अर्थ ‘मूर्ख’ म्हणत निर्लज्जपणे आपल्या वक्तव्याचे समर्थन करत आहात. अर्वाच्च भाषा वापरायची आणि अंगाशी आल्यावर बाळासाहेब ठाकरे माझे गुरू म्हणत त्यांच्या नावाची बदनामी करायची, त्याचवेळी सुसंकृत नेतृत्व म्हणत शरद पवारांचा उदो उदो करायचा. या गुरू-शिष्य कोंडाळ्याचा एकदाचा उलगडा होऊन जाऊ दे. निर्लज्जम सदा सुखी. स्वतःच्या बुडाखाली धूर निघताना आम्ही पाहतो आहोत. एका महिलेची हेतूपुरस्सर छळवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या केसेस आपल्यास चिकटलेल्या आहेतच. ‘लबाड लांडगं ढाँग करतंय, लगीन करायचं साँग करतंय…’ बेलाशक, जनतेची स्मरणशक्ती – आकलनशक्तीने दगा द्यावा, इतकी आपली कृती इतिहासकालीन – अनाकलनीय निश्चितच नाही. निर्विवाद, शरद पवार हेच आपले आजन्म गुरु!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -