आमचे एक स्नेही आहेत. अगदी खेड्यात बालपण गेलेले असताना स्वकर्तृत्वाने शिक्षण घेतले, शिष्यवृत्त्यांवर शिकून शून्यातून सर्व उभे केले. मोठ्या शहरात दोन खोल्यांच्या घरातून पाच-सहा रूमच्या फ्लॅटमध्ये व फ्लॅटमधून एका मोठ्या बंगल्यात सध्याचे त्यांचे वास्तव्य असा सर्व प्रवास आम्हीही पाहिला. त्या कर्तृत्वाबद्दल आदर आहेच पण त्यांची एक मोठी खोड आहे, ती म्हणजे स्वतःच्या मुलांची तोंडफाटेतोवर स्तुती करणे. मुलांची प्रत्येक मागणी ते पूर्ण करीत आलेले आहेत. मुलंही हुशार होती अभ्यासात. पण घरात मात्र त्यांना जराही शिस्त नव्हती. मुलं शिकत असताना त्यांचा पाच-सहा रूम्स असलेला फ्लॅट होता. प्रत्येक खोलीत पसाराच पसारा. त्यांच्या पत्नीच्या हाताखाली तीन-चार नोकर असत. पण घरातील व्यवस्थापन झिरो होते. पत्नी दिवसभर तरीही कामातच असे. घरातील या कर्तृत्ववान पुरुषाने मुलं लहान असताना कधीही त्यांना कडेवर सुद्धा घेतले नाही. मुलांची शाळेतून, क्लासमधून ने-आण पत्नी किंवा नोकर करत. पुढे मुलं टीनेजमध्ये आल्यावर त्यांच्या गरजा वाढल्या. त्या सर्वच पुरवल्या गेल्या. घरात वस्तूच वस्तू आल्या पण त्या कधीच जागेवर नसत. नोकरांकरवी काम करून घेण्याचे कसब पत्नीकडे नव्हते. शिवाय मुलं इतकी लाडकी की प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातात देणार. उष्टी प्लेट, ग्लास ,चहाचा कप वगैरे जे काही असेल ते स्वतःचे स्वतः उठून घ्यावे किंवा ठेवावे ही सवय, घरातील बाई सोडता, कोणालाच नाही.
https://prahaar.in/2026/05/26/ipl-2026-playoffs-ipl-playoffs-start-today-know-which-team-will-prevail-over-whom/
घरात संपत्ती असून स्वच्छता नव्हती. स्वयंपाक घरातील सगळे कप्पे, लॉफ्ट वगैरे ओसंडून वाहत. हॉलमधून बेडरूममध्ये जाताना किचनमधून जावे लागत असे, तर मध्येच पिठांचे डबे, भाजीने भरलेली पिशवी, दुधांच्या बाटल्या, नारळ, केरसुणी वगैरेंचे संमेलन असे. स्वयंपाकाच्या कट्ट्यावर सदैव बाजार भरलेला व फ्रीजच्या टॉपवर डबे बाटल्या यांचं गेट-टुगेदर. फ्रीजमध्ये डोकवायची हिंमत मी कधीच केली नाही. प्रत्येक कॉटवर मुलांचे कपडे, टॉवेल, शाळा-कॉलेजचे सामान, खेळायच्या रॅकेट्स इतस्ततः बागडत. छोटीशी बाल्कनी गाद्या-उशांनी व एक्स्ट्रा पांघरूणांनी भरलेली. छोट्या टेरेसवर काही झाडांच्या कुंड्या व बाकी सगळी अडगळच. दारापाशी चपलांचा हा ढीग. मुलांना टूथब्रशवर पेस्ट लावून मिळत होती व इस्त्रीचे कपडे हातात मिळत होते. आई घरात राबराब राबते हे मुलांच्या कधी ध्यानातच येत नसे. वडिलांचा रोल घरात फक्त पैसे कमावून आणणे. मुलीला नोकरी लागण्यापूर्वीच वडिलांनी कार घेऊन दिलेली. तिला ड्रायव्हिंग उत्तम येते, ती डान्स शिकते याचे वडिलांना कोण कौतुक. कुटुंबात सर्वांना भरपूर मित्र- मैत्रिणी पण कोणी नातेवाईक येऊन बसला तर आई-बाबांच्या गैरहजेरीत मुलं पाण्याचंही विचारतील की नाही ही खात्री नसे. मुलांना अशा पद्धतीने वाढवण्यात आई-बाबांचा मुख्य रोल होताच पण घरात येणारा पैसा व वस्तूंचा ओघ इतका प्रचंड होता की त्यात अडकायला होत असे. चैन व गरज यातील फरक कुणाच्या डोक्यातही येत नसावा. घरातून किंवा खोलीतून बाहेर पडताना तेथील चालू विजेचे दिवे, पंखे, लॅम्प वगैरे बंद करायचे असतात हेही कुणाच्या गावी नसायचे. घरातील एकटी बाई कुठे कुठे व काय काय बघणार? जेवलेल्या ताटातील खरकटं किंवा उष्टं एका वाटीत भरून ताट स्वच्छ करूनच घासायला टाकावे ही खरे तर किती साधी व आवश्यक सवय. पण मोठ्या घमेल्यात टाकलेल्या त्या कचरायुक्त ताटांचा वास सुटायचा. घरातील लोकांना तो सवयीने यायचाच नाही. पण बाहेरून येणाऱ्याला तो यायचा यायचा.
https://prahaar.in/2026/05/26/eknath-shinde-fadnavis-shiledar-in-the-field-to-persuade-eknath-shinde/
आता ते सर्व मोठ्या बंगल्यात राहायला गेले. मुलांची लग्नं झाली. नातवंडं शाळेत जायला लागली. पण तीच कथा पुढे चालू आहे. नातवंडांच्या रूम्स मोलकरीण आवरतात. स्विगी, झोमॅटोवरून मागवलेले पदार्थ खाऊन झाले की ती कागदं, फाईलपेपर, उष्टं टाकलेलं अन्न तिथेच तासंतास पडून राहतं. नातवंडं इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकून बाहेर पडली. इतर अनेक कलाही शिकत आहेत. घरात प्रचंड प्रमाणात वस्तू आहेत, काही वापरात तर काही बिन वापराच्या. तीन-चार फोर-व्हीलर्स दारात आहेत. भरपूर नोकरचाकर आहेत. मुलं, नातवंडं त्यांच्या त्यांच्या विश्वात रमलेली आहेत . घरात एकूण बिजनेसवरच जास्ती चर्चा चालतात. आता आजोबा नातवंडांचे कौतुक करण्यात मश्गुल असतात. नातवंडांचे आई-वडील आपल्या लेकरांना परदेशात शिकायला पाठवणार आहेत. ऐपत तर आहेच आहे. एक लेकरू गेलं सुद्धा तिकडे…
आपण पहातो अनेक घरांमध्ये की सासू-सून, मुलगा-वडील, नवरा-बायको यांच्यातील नातेसंबंध वरवरचे वाटतात. आत्मीयता जाणवत नाही. घरात लोकशाही वातावरण असते परंतु सह्रुदयता अजिबात नसते… खरं शिक्षण कुटुंबातून सुरू होतं याची खूणगाठ प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी बाळगावी.
आपण बघतो, काही कुटुंबं सामान्य आर्थिक परिस्थितीतही किती नीटनेटकी व काटकसरीने राहतात. कधी बायको लवकर किंवा आधी मरण पावल्यास एखादा नवरा मुलांना चांगलं वळण लावतो, सुनेला मदत करतो, नातवंडं सांभाळतो, स्वतःची खोली एकदम स्वच्छ ठेवतो. आणि नवरा गेलेली स्त्री तर स्वतः पायांवर उभे राहून मुलांची शिक्षणं करते, त्यांची लग्नं लावून देते, त्यांचे संसार थाटून देते हे तर अगदी नेहमीचं चित्र आहे. चंगळता वादात अडकलेल्या लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट होते हे मात्र खरे.