Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीUdyog Ratna Award : रतन टाटा यांना 'उद्योगरत्न पुरस्कार' निवासस्थानी करणार प्रदान

Udyog Ratna Award : रतन टाटा यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’ निवासस्थानी करणार प्रदान

प्रकृती अस्वास्थ्यामुळे टाटा यांची उद्या मुख्य कार्यक्रमाला राहणार अनुपस्थिती

मुंबई : टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांना गेल्या महिन्यात राज्य सरकारचा पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ (Udyog Ratna Award) जाहीर करण्यात आला. त्यानुसार रतन टाटा यांना आज हा पुरस्कार त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी प्रदान करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हा पुरस्कार प्रदान करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचीही उपस्थिती असणार आहे. या पुरस्कार प्रदानासाठी हे सर्वजण टाटांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराप्रमाणे देशातल्या उद्योग क्षेत्रात नावाजला जाणारा उद्योग रत्न हा पुरस्कार महाराष्ट्र शासन या वर्षीपासून सुरू करत आहे. पहिला पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्यात येणार आहे. खरंतर हा पुरस्कार सोहळा उद्या वांद्रे-कुर्ला संकुल येथे करण्यात येणार आहे मात्र रतन टाटा यांचं वय आणि त्यांची प्रकृती लक्षात घेता राज्य सरकारने त्यांचा सन्मान त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल व उद्या मुख्य सोहळा मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथे रंगणार आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तरुण, महिला तसेच मराठी उद्योजक अशा तीन प्रवर्गासाठी आणखी तीन पुरस्कार देण्याची घोषणाही विधान परिषदेत केली होती. त्यानुसार उद्या मुख्य पुरस्कार सोहळा होणार आहे. राज्यातील काही उद्योजकांना यावेळी गौरवण्यात येणार आहे. परंतु रतन टाटा प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे या कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकणार नाहीत, त्यामुळे आज त्यांच्या निवासस्थानी राज्य सरकारने पुरस्कार प्रदानाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला आहे.

अनेक पुरस्कारांचे मानकरी रतन टाटा

रतन नवल टाटा हे टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रात चांगल्या कामगिरीसाठी २००० मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्याकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मानद डॉक्टरेट आहे. नोव्हेंबर २००७ मध्ये फॉर्च्यून मासिकाने त्यांना व्यवसायातील २५ सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचं जाहीर केलं होतं. मे २००८ मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या २००८ च्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता.

यावर्षीच्या एप्रिलमध्ये रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान, ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने गौरवण्यात आलं होतं. तसेच त्यांना इतरही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यंदा त्यांना राज्य सरकारचा ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -