Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणNavy day in Sindhudurga : महाविजयाच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान कोकणात! सिंधुदुर्ग किल्ल्यावर...

Navy day in Sindhudurga : महाविजयाच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान कोकणात! सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदल दिन होणार साजरा…

सिंधुदुर्ग : लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या देशातील ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly Elections) भाजपला (BJP) भरभरुन यश मिळाले आहे. चारपैकी तीन राज्यांत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) विजयी सभेला संबोधित करताना हा विकास आणि विश्वासाचा विजय असल्याचं म्हटलं. त्यानंतर, आज म्हणजेच निकालाच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यात विशेषतः ते कोकणात येणार आहेत. आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर (Sindhudurga Fort) नौदल दिन (Navy Day) साजरा होणार आहे. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आज पंतप्रधान आपली उपस्थिती दर्शवणार आहेत.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर इतिहासात पहिल्यांदाच साजरा होणाऱ्या या सोहळ्यात सिंधुसागरावर नौदल आपली ताकद दाखवणार आहे. तर, नौदलाने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५ फूट उंचीच्या पुतळ्याचे राजकोट समुद्रकिनारी अनावरण होणार आहे. यापूर्वी हा दिन मुंबईत साजरा केला जायचा, पण यंदाच्या वर्षी शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत.

तारकर्ली एमटीडीसीजवळ प्रमुख कार्यक्रम होणार असून नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार हे पंतप्रधानांचं स्वागत करतील. यावेळी, नौदलाकडून आपली प्रात्यक्षिके दाखवत देशाचं सागरी सामर्थ्य जगाला दिसणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालवलेल्या तेजस या फायटर जेटचाही यात समावेश असेल.

मोदींच्या ताफ्याची रंगीत तालीम

सिंधुदुर्ग किल्ल्याकडे पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावर शनिवारी प्रशासनाच्या वतीने रंगीत तालीम घेण्यात आली. सागरी महामार्ग, कोळंब पूल, बोर्डिंग मैदान, फोवकांडा पिंपळ, राजकोट, भरड, एसटीस्टॅण्ड, वायरी, तारकर्ली या मार्गावर दुपारी चार ते सहा या वेळात पोलिसांनी गाड्यांचा ताफा नेऊन रंगीत तालीम घेतली. यावेळी रस्त्याच्या बाजूने नागरिकांनी उभे राहून पोलिसांच्या रंगीत तालीमचा आनंद घेतला. दरम्यान, आज ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरात आणि तारकर्ली मार्गावर सुरक्षा यंत्रणांकडून वाहनांचा ताफा फिरवून तपासणी करण्यात आली. या ताफ्यामध्ये सर्व सुरक्षा यंत्राणांचे अधिकारी तसेच इतरही पथके सहभागी झाली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -