Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखPM Narendra Modi : चला, मोदीजींचे हात बळकट करू या...

PM Narendra Modi : चला, मोदीजींचे हात बळकट करू या…

जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही असलेल्या भारतात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आज पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. भारताच्या लोकसभा निवडणुकीकडे सर्व जगाचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज देशातील १०२ मतदारसंघांत मतदान होणार असून महाराष्ट्रातील विदर्भातील पाच मतदारसंघांत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. सर्व देशभर मोदी की गॅरेंटी व फिर एक बार मोदी सरकार या घोषणेने जादू केली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर देशाला जगात आर्थिक आघाडीवर तिसऱ्या क्रमांकावर नेतील असा विश्वास जनतेला वाटत आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची हॅटट्रीक करणार ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. मोदींचा करिष्मा व त्यांची लोकप्रियता यांच्या जवळपास विरोधी पक्षातील म्हणजे इंडिया आघाडीत एकही नेता नाही हे वास्तव जनतेला समजले आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील सूज्ञ मतदार कमळाचे बटण दाबून मोदींचे हात बळकट करील, असा आम्हाला विश्वास वाटतो.

भारतीय जनता पक्षाने सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातून कोकणचे भाग्यविधाते व महाराष्ट्राचे लढाऊ नेते नारायण राणे यांची उमेदवारी गुरुवारी दुपारी जाहीर केली आणि तमाम कोकणवासीयांमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली. या मतदारसंघात ७ मे रोजी मतदान आहे. यंदाच्या निवडणुकीत नारायण राणे यांना सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधील मतदार दोन लाखांचे मताधिक्य देऊन लोकसभेवर विजय मिळवून देतील असे आज सर्वत्र वातावरण आहे. नारायण राणे यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीचे विशेषत: उबाठा सेनेचे धाबे दणाणले असून मावळत्या लोकसभेतील खासदारांना घाम फुटला आहे. राणेंना विरोध म्हणजे कोकणच्या विकासाला विरोध हे आता मतदारांच्या चांगले लक्षात आले आहे. म्हणूनच उबाठा सेनेला कोकणातील मतदार या निवडणुकीत चांगला धडा शिकवतील हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. देशभर अब की बार ४०० पार असे उत्साहाचे वातावरण आहे.

गेले महिनाभर नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे आणि सौ. निलमवहिनी राणे अशा राणे परिवाराने पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून त्यांच्याशी व्यक्तिगत संवाद साधला आहे. त्यामुळे भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांना राणे परिवाराकडून ऊर्जा मिळाली आहे. कमळाला मत म्हणजे नारायण राणेंना मत, राणेंना मत म्हणजे मोदींना मत हे समीकरण आता मतदारांच्या तोंडपाठ झाले आहे. म्हणूनच या निवडणुकीत महाविकास आघाडीची कोकणात बोबडी वळली आहे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये भाजपाच्या व राज्यात इतरत्र भाजपाबरोबरच महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून दिले पाहिजे हे मतदारांना चांगले समजले आहे.

आज विदर्भात पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघांत मतदान होणार आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे असा सामना आहे. गडकरी येथे विजयाची हॅटट्रीक करतील असे नागपुरात वातावरण आहे. गडकरी म्हणजे वेगवान विकासाचे प्रतीक अशी त्यांची देशभर ओळख आहे. काँग्रेसने त्यांच्याविरोधात माजी महापौर व दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या ठाकरे यांना उमेदवारी दिली असली, तर ते गडकरींसारख्या दिग्गज नेत्याशी किती सामना देऊ शकतील? नागपूर-विदर्भ हा तर खरे काँग्रेसचा वर्षानुवर्षे गड होता, पण १९९६ मध्ये भाजपाच्या तिकिटावर बन्वारीलाल पुरोहित हे प्रथम खासदार झाले आणि तेव्हापासून काँग्रेसची घसरण सुरू झाली.

यूपीएच्या काळात पुन्हा काँग्रेसचा खासदार विजयी झाला, पण नंतर नितीन गडकरी यांनी गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसच्या गडाला मोठा धक्का दिला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेले नागपूर भाजपाकडे खेचून आणले. रामटेकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकला जाऊन रणरणत्या उन्हात मोटारसायकलीवरून फिरून आपल्या उमेदवाराचा प्रचार केला हे सुद्धा उल्लेखनीय आहे. चंद्रपूरमध्ये राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात आहेत. काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा या भाजपाच्या विरोधात मैदानात आहेत. मुनगंटीवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली होती. तर भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोले यांच्यासाठी काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सभा घेतली होती. विदर्भातील लढतीकडे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचे बारीक लक्ष आहे हे त्यातून दिसून आले.

आज होणाऱ्या निवडणुकीत राजस्थानमधील बिकानेरमधून अर्जुनराम मेघवाल (भाजपा) चौथ्यांदा रिंगणात आहेत. ते तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. अल्वरमधून भाजपाच्या तिकिटावर लढणारे भूपेंद्र यादव हे अगोदर दोन वेळा राज्यसभेचे खासदार होते. मध्य प्रदेशात छिंदवाडामध्ये काँग्रेसचे नकुलनाथ उभे आहेत. गेली अनेक वर्षे हा मतदारसंघ काँग्रेसकडेच आहे. स्वत: कमलनाथ हे या मतदारसंघातून नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमधून केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग भाजपाचे उमेदवार आहेत. अरुणाचल पश्चिममधून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हे उभे आहेत. तामिळनाडूतील ३९, राजस्थानमधील १२, उत्तर प्रदेशातील ८, मध्य प्रदेशातील ६, उत्तराखंडमधील ५, बिहारमधील ४, पश्चिम बंगालमधील ३, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूरमधील प्रत्येकी २ मतदारसंघांत आज मतदान होत आहे. शिवाय पुडुचेरी, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, मिजोराम, लक्षद्वीप, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड, अंदमान-निकोबार येथेही प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -