Sunday, April 28, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘कष्टे मोठे झाले जन’

‘कष्टे मोठे झाले जन’

डॉ. विजया वाड

उर्वशी लग्न करून ठोंबरे कुटुंबात आली तेव्हा तिचे जंगी स्वागत झाले. नंतर मधुचंद्र! मोरपंखी रंगीन साज! वेगळाच बाज! उर्वशी रंगनाथ ठोंबरे सातव्या स्वर्गात होती. रंगनाथ तिचे लाड करीत होता. तिला मंचकावर उठू देत नव्हता. लग्न म्हणजे लाडू, पेढा, बर्फी यांचा गोड मधुर मिलाफ, असा मधुचंद्र संपेपर्यंत तिचा दृढ समज होता, पण… दादरला हसनअल्ली बिल्डिंगमध्ये दोघं परतली, रंगाचा ‘नाथा’ झाला.
“अहो म्हणत जा! रंगा रंगा नको.”
“अरे, जग कुठे गेलंय रंगा?”
“तरी पण चाळ ५० वर्षं मागे आहे आमची.”
“काय? ५० वर्षं?” ती आश्चर्यचकित.
“सौ. उर्वशी लावत जा. मंगळसूत्र हवं. हिरव्या बांगड्या, झालंच तर जोडवी, विरवली.”
“धिस इज थ्रीमच! रंगा…”
“नाव नको गं अंबे! हात जोडितो. विनवतो. अहो… अहो…”
“अहो रंगा?”
“नुसतं अहो. मीसुद्धा तुला अहो म्हणेन… हाकारेन! अहो, श्रीमतीजी. अहो उर्वशीजी ऐशा हाका देईन.”
“ते सीरियलमध्ये अप्पा मारतात तसं अहो ‘मालकीण बाई’ म्हण!”
“मालकीण पुढील १२ वर्षे तुझी सासू आहे. मी छोट्या श्रीमतीजी, …अशी न दुखावणारी हाक मारत जाईन तुला,” त्याचा उतरलेला चेहरा बघून तिला दु:ख झाले. ती समजदार झाली.
“येतेस का बल्लाळेश्वरी? जागृत देवस्थान आहे बघ.” सासूनं विचारलं. ती काही नास्तिक नव्हती.
“चला” ती म्हणाली. सासू सुरेख साडी नेसली आणि पटकन् स्टाईलमध्ये स्कूटर काढली. “चलतेस ना? मी सफाईदार चालवते. नो टेन्शन ॲट ऑल!” सासू हसून म्हणाली.
“मी टेन्शन घेत नाही.” ती समजदारपणे म्हणाली. अशा दोघी टेचात बल्लाळेश्वरी पोहोचल्या.
देवदर्शन झाले. दोघी वारा खात कट्ट्यावर बसल्या. सासूला तोंड फुटले. “आज आराम कर. उद्यापासून कष्टांना सुरुवात. बदली मिळेपर्यंत ठाण्याला जावं लागेल. स्कूटर चालवता येते का? म्हणजे स्वावलंबी राहशील. इकडे, माझ्या ओळखी आहेत, तुझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी! पण घाई घाई, नको! थोडे कष्ट काढ.” सासू म्हणाली. तिच्या बोलण्यात खरेपणा होता, असे नव्या सुनेला जाणवले.
दुसरा दिवस.
सासू पाच वाजताच उठली. पोळ्या करून ठेवल्यानं. भाजी फोडणीला टाकली. बाबा-मुलगा-ती-सून चौघांचे डबे भरले. सासूचा डबा तिच्या उशाशी ठेवला, मग स्नान! लफ्फेदार नट्टापट्टा! साडी. कंटाळण्याचा मागमूस नाही. ती ‘बघी’ होती.
“आता ‘बघी’ यस उद्या ‘करी’ हो.
कष्टांशिवाय फळ नाही हो. कष्टे होती बरे जन. कष्ट जीवनी श्रावण, कष्ट जीवनी देताती ऊन-पावसाचे सुख! सुख पाहता लोचनी पळू लपू पाही दु:ख.” वाहवा! सासू कवने पण करते? रात्री थकून अंथरुणावर पडली. नवऱ्याने वसुली केली. सुख-सुख जाहले “दमलीस?” नवऱ्याने हात-पाय चेपले. पाठीवर प्रेमाने हात फिरवला.
सारा शीण पळाला. नवऱ्याला गच्च मिठी मारून ती झोपली. एवढे सुख? तिने अपेक्षिले नव्हते. तो कुरवाळत होता. बोलत होता.
“सकाळी आई साडेपाचला उठते. कामावर जाते. स्वयंपाक करून जाते. आता तू आलीस…” त्याच्या बोलण्यात अपेक्षा होती.
“मी सारे ss करीन. सारे सारे ss”, “हात लावू देणार नाही त्यांना. खरंच रंगा.”
“आईसमोर अहो.”
“अगदी. तुमचा आब राखेन. अदब पाळेन.”
“किती छान. मी चक्क सुखावलो.”
“अजूनही सुखवेन रंगा… तुझ्या आईला ‘आई’ म्हणेन ‘सासुबाई’ नाही. कामातून विश्राम देईन. इतके वर्षं कष्टल्या; आता थोडा विसावा.” रंगाचे डोळे तिच्या बोलांनी भरून आले.
“मी फार ऋणी आहे तुझा.
आज मला खऱ्या अर्थाने जोडीदार मिळालीय, असं मी समजतो”. मग तो बोलत राहिला.
“अकरा घरी पोळ्या करून आईनं वाढविले.
पावणेचारला उठे ती. साडेआठला घरी येई. पोळीभाजी गरमागरम करून देई. कधीच कंटाळा नाही. आळस नाही. प्रेम फक्त. ‘प्रेमाने स्वयंपाक केला की, अंगी लागतो रंगा!’… असे म्हणे. तिच्या कष्टांनी मी सीए झालोय. रेडीमेड ‘नवरा’ झालोय तुझा.” “मला ठाऊक आहे ते पुरते.” तिने त्याचे केस कुरवाळले.
म्हणाली, “कष्टे मोठे झाले जन… सदा सोयरे सज्जन! ऐशा पाठी मन… एकरूप मन… तन!” त्यांच्या मिठीत सारे प्रेम सामावले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -