Tuesday, May 7, 2024
Homeअध्यात्मनामाचे सूक्ष्म स्वरूप

नामाचे सूक्ष्म स्वरूप

ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

नुसते ‘राम राम’ म्हणून राम कसा भेटेल, हा प्रश्न माणूस सहजच विचारतो आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो की, समजा एखादा मनुष्य ‘नोकरी नोकरी’ असा जप करीत खोलीत बसला, तर त्याला नोकरी मिळणे शक्य आहे का? वरकरणी हा दाखला अगदी बेमालूम दिसतो खरा, पण थोडासा विचार केला, तर तो इथे मुळीच लागू पडत नाही, असे कळून येईल. जो दाखला द्यायचा आणि ज्या बाबतीत तो द्यायचा, त्यांचे गुणधर्म सारखे असावे लागतात. ‘रामनाम’ आणि ‘नोकरी’ यांचे परिणाम एकमेकांविरुद्ध आहेत. ‘राम राम’ म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वत:च्या विस्मरणात होत असतो; म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणे, म्हणजे स्थुलांतून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे, हा ‘राम राम’ म्हणण्याचा परिणाम; परंतु नोकरीचा प्रकार याच्या अगदी विरुद्ध आहे. मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे. नंतर ती मिळावी म्हणून दहाजणांचे आर्जव करायचे, त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा आणि मग आपण ती नोकरी करायची. म्हणजे नोकरी या कल्पनेतून, सूक्ष्मातून, स्थुलात जाणे हा नोकरीचा प्रकार. पण ‘राम राम’ म्हणणे हा प्रकार स्थूलांतून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा आहे. यावरून नोकरीचा हा दाखला इथे लागू पडत नाही, हे स्पष्ट होते.

दुसरी गोष्ट म्हणजे, ‘नोकरी नोकरी’ असा जप करून नोकरी मिळणे कठीण हे तर खरेच, पण ‘राम राम’ म्हणून राम मिळणे कसे सोपे, किंबहुना कसे हमखास शक्य आहे, हे पाहा. नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून, ती प्रत्यक्षात आणण्याकरिता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळव करावी लागते, हे आपण आत्ताच पाहिले. तसेच, घर बांधणे ही कल्पना; ती पूर्ण करून ते घर सर्व बाजूंनी सुखसोयीचे आगर व्हावे, या हेतूने सर्व जिनसा पैदा करून त्यात आणून ठेवणे, म्हणजेच कल्पनेतून कृतीत येण्याचा प्रकार झाला. आता हे करणे किती कष्टाचे आणि अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांना आहे. ‘राम राम’ म्हणण्याचे उद्दिष्ट, स्थुलांतून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हे आहे; म्हणजेच, अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेले घर एकेक वस्तू फेकून देऊन रिकामे करण्यासारखे आहे. ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखी आहे. तेव्हा ‘नोकरी नोकरी’ म्हणून नोकरी मिळणे जितके कठीण, तितकेच ‘राम राम’ म्हणून राम मिळणे निश्चित आहे. सबब ‘राम राम’ म्हणून राम कसा भेटेल, अशी शंका न घेता ‘राम राम’ जपावे. मनाच्या सर्व दु:खाला कारण देहबुद्धी आहे. ती जायला उपाय एकच; प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करावे. त्याच्या योगाने सर्व मल जाईल. नामस्मरणच रामाची गाठ घालून देईल. चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे. ‘मी’पणा टाकावा आणि परमात्म्याचे होऊन राहावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -