Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडी‘नाचू कीर्तनाचे रंगी’ मकरसंक्रांत विशेष सोहळा

‘नाचू कीर्तनाचे रंगी’ मकरसंक्रांत विशेष सोहळा

मुबई: गेले दोन वर्ष प्रत्येक जण कोरोनाच्या भीतीछायेखाली वावरत आहे. अजूनही याचे सावट दूर झालेले नाही. या सावटामुळे सण साजरे करण्याची मजा ही प्रत्येकजण हरवून बसला आहे. अशावेळी आपल्या रसिक प्रेक्षकांना घरबसल्या सणाचा आनंद मिळावा मनोरंजनाने त्याचे रंजन व्हावे या उद्देशाने झी टॉकीजने ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या कीर्तनाच्या आगळयावेगळया सोहळयाच्या भक्तीरसाची भावपूर्ण मेजवानी आपल्या प्रेक्षकांना देण्याचे ठरविले आहे.

प्रेक्षकांचा विचार करून झी टॉकीजने नेहमीच नाविन्यपूर्ण संकल्पना आणल्या आहेत. भक्तिरसपूर्ण कीर्तनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. संतांच्या काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे. ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ असं म्हणत आजवर असंख्य कीर्तनकारांनी अभंग, संतवाणी, कथा, दैनंदिन घडामोडी यांच्या आधाराने निरुपण करत समाजातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याचा तसेच चांगल्या विचारांची देवाण-घेवाण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही परंपरा जपत महत्त्वाच्या धार्मिक सणांचं औचित्य साधत त्यानंतर येणाऱ्या रविवारी ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ हा कीर्तनाचा विशेष सोहळा रंगणार आहे.

जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरुवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. सौभाग्यवती स्त्रियांचा हा अतिशय महत्त्वाचा सण. या सणाला सौभाग्यवती स्त्रिया वाण देतात. ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ असं म्हणत आपल्या स्नेहसंबंधातील कटुता नष्ट करुन मैत्रीचे बंध निर्माण करायचे व एकमेकांना चांगली दिशा दाखवायची हा या सणामागचा उद्देश. याच उद्देशाने ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या सोहळयातून संताच्या वाणीचे गोड विचार ऐकायला मिळणार आहेत.

‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण सणांची महती सांगितली जाणार आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिला कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचे निरूपण रंगणार आहे. रविवार १६ जानेवारीला दुपारी १२.००वा. आणि सायं ६.०० वा. झी टॉकीजवर याचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल. शिवलीलाताई पाटील या महाराष्ट्रातील लोकप्रिय युवा स्त्री कीर्तनकार असून महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर त्यांच्या कीर्तनाचे अनेक कार्यक्रम संपन्न होतात.

शिवलीलाताई पाटील यांच्या ओघवत्या शैलीतील कीर्तनातून लोकरंजनाचा वसा जपला जाणार आहे. भक्ती आणि मनोरंजनाचा मिलाफ साधत आणलेला ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ हा विशेष सोहळा प्रेक्षकांना निश्चितच आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -