Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजआमची कोकरे, सगळ्या स्पर्धांत मागे का पडतात?

आमची कोकरे, सगळ्या स्पर्धांत मागे का पडतात?

विशेष: डॉ. श्रीराम गीत (करिअर काऊन्सिलर)

माझ्या डोळ्यांसमोर जुनी दोन दृश्ये आहेत. दिवाळी संपली की, धनगर मेंढपाळ त्यांचा मेंढरांचा तांडा घेऊन स्थलांतर करत असत. एकमेकांना ढकलत चालणारी तीन-चारशे मेंढरे त्या वेळेला दिसत. मागे-पुढे राखणीची कुत्री धावत असत. पण मुख्य मेंढपाळाच्या हातात एखादे छोटेसे कोकरू असे. मेंढपाळाच्या हातात ते सुखावलेले व त्याला बिलगलेले दिसत असे. हे कोकरू कुठे तरी हरवू नये, इतरांच्या वेगाने चालण्याची, त्याची अजून ताकद नाहीये म्हणून मेंढपाळ त्याचे कौतुक करत त्याला छातीशी धरून, कडेवर घेऊन सांभाळत असे. तसेच जुन्या काळच्या हिंदी सिनेमामध्ये काश्मीर एखाद्या गाण्यापुरते दाखवण्याची पद्धत होती. त्यावेळी हिरोइन अशीच एखाद्या गोंडस कोकराला उचलून घेऊन कुरवाळताना हमखास दिसे.

सध्याच्या शिक्षण पद्धतीत वाढणारी अशीच लाखो कोकरे कोडकौतुकात वाढतात. इंग्रजी शाळांची फी न परवडणाऱ्या घरातसुद्धा या कोकरांचे असेच कौतुक होत असते. उत्तम कमावणाऱ्या घरांबद्दल तर बोलायलाच नको. पण सगळ्या स्तरातील पालकांचा एकच प्रश्न कायम समोर येतो की, ‘क्लास कोणता लावू?’

एखादा विषय वाचून, समजून घ्यायचा असतो. त्यासाठीचे अवांतर वाचन करायचे असते. एखाद्या संकल्पनेचे उपयोजन कुठे केले आहे, याबद्दल माहिती गोळा करायची असते. यासाठीचे सामान्य ज्ञान आसपास सहज उपलब्ध असते. भाषेचा वापर विविध उदाहरणांतून खुलवता येतो. मग ती इंग्रजी असो, मराठी किंवा हिंदी या साऱ्याचा विसर पालकांना पडला आहे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना इयत्ता पाचवीनंतर मराठी बोलता येत नाही, असे ते बिनदिक्कत ऐकवतात. घरातील वापरातील वस्तूंबद्दल सुद्धा त्यांना मराठीतून केलेले उल्लेख नीट कळत नाहीत. पण याच वेळी सलग पाच मिनिटे हिंदीतून किंवा इंग्रजीतून संवाद साधण्याची क्षमता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यात नसते.

पाठांतरातून आलेले इंग्रजी किंवा हिंदी अर्थ न समजता वापरले जातात. या साऱ्याचा वैयक्तिकरीत्या मी अनेकदा काऊन्सलिंग करताना अनुभव घेतला आहे. आई हिंदी भाषिक, वडील पुण्यातील मराठीत बोलणारे, तर मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारा असे त्रिकूट समोर आल्यानंतर मी एकच प्रश्न विचारतो, कोणत्या भाषेत संवाद साधायचा? आमचे कोकरू म्हणते इंग्लिश. आई म्हणते हिंदी तर वडील म्हणतात काहीही चालेल. मुलाशी पूर्ण इंग्लिशमधून बोलायला सुरुवात केल्यावर, पाच मिनिटांतच त्याचा संवाद हिंदी मिश्रित मराठीकडे येतो व तो उत्तरे त्याच पद्धतीत देऊ लागतो.

थोडक्यात व्यक्त होण्यासाठीचे भाषाप्रभुत्व या तीनही भाषांच्या संदर्भात अर्धे कच्चे राहिलेले असते. क्वचितच या साऱ्या संदर्भात मार्क मात्र अक्षरशः ढिगाने  मिळवलेले असू शकतात. याचे कारण एकच, भाषेच्या पेपरमध्ये सलग स्वतःची दहा वाक्ये लिहा, अशा स्वरूपाचे प्रश्न येणे बंद होऊन अनेक वर्षे झाली आहेत. अशी ही आमची कोकरे इयत्ता दहावी पास होतात. आर्थिक स्तराप्रमाणे त्यांचे विविध बोर्ड असतात. तसेच भाषेचे माध्यमसुद्धा त्यावरून ठरते.

सरकारी किंवा जिल्हा परिषदांच्या शाळेत शिकणाऱ्यांचे माध्यम मराठी, तर निमशहरी किंवा शहरी भागात शिकणाऱ्यांचे माध्यम इंग्रजी. महागड्या इंटरनॅशनल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘गावठी’ शाळातील माध्यम संपूर्णपणे इंग्रजीत. तिथे मराठीचा, हिंदीचा वापर औषधापुरता. पण अकरावीला सुरुवात होते, तेव्हा या सगळ्या कोकरांची एका कळपात रवानगी केली जाते. मेंढरांच्या कळपामध्ये ही कोकरे सामील होतात, तेव्हा त्यांचा तुरुतुरु पळण्याचा वेग उपयोगी पडत नसतो. जसे मेंढरांना दिवसाकाठी १०-१२ मैल चालवत नेऊन विश्रांतीला आणि कुठेतरी चरायला सोडले जाते, तिथे हे तुरुतुरु पळणे उपयोगी पडत नाही. वाचकांच्या माहितीसाठी एक नोंद अत्यंत महत्त्वाची आहे.

महाराष्ट्र हे एकमेव राज्य असे आहे की, तिथे अकरावी-बारावी कनिष्ठ महाविद्यालय नावाची धेडगुजरी शिक्षण पद्धती चालू आहे. भारतात सर्वत्र पाचवी ते बारावीचे शिक्षण माध्यमिक शाळेमध्ये होते. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले, तर सर्व बोर्डांचे मिळून किमान एक लाख विद्यार्थी ९० टक्के मार्कांची मर्यादा ओलांडून अतिहुशार समजले जातात. या  सगळ्यांना बारावीनंतरच्या खऱ्या स्पर्धा परीक्षांना तोंड देण्याची वेळ येते, त्यावेळी या हुशार कोकरांची फरफट सुरू होते.
दहावीची परीक्षा महिनाभर तरी चालते. एक पेपर झाला की, चार दिवसांची सुट्टी.

बारावीच्या परीक्षेसाठी जरा कमी वेळ, पण पद्धत तीच. पण ‘जेईई’ किंवा ‘सीईटी’ या परीक्षांच्या संदर्भात तीन कठीण विषय, पण तीन तासांत एकदम द्यायचे असतात. या दोन परीक्षांच्या संदर्भात एक लाख मुलांच्या दहावीचे टक्क्यांचे कसेबसे पन्नास ते साठ टक्के शिल्लक राहतात. ‘जेईई’द्वारे महाराष्ट्रातून आयआयटीला पोहोचणाऱ्यांची संख्या कधीच ५०चा आकडासुद्धा ओलांडत नाही. पण हे लक्षात न घेता, आपल्या कोकरांना या स्पर्धेमध्ये ढकलण्याचे पाप अनेक पालक गेली दहा वर्षे करत आहेत.

इतकेच नाही तर या परीक्षांचे क्लास लावण्याकरिता स्वतःच्या खिशातील पाच लाख रुपये मोठाल्या जाहिराती देणाऱ्या क्लासवाल्यांच्या खिशात अलगद आनंदाने देऊन टाकतात. ‘सीईटी’चा गेल्या अनेक वर्षांचा निकाल असे सांगतो की, दोन लाख मुलांपैकी जेमतेम पन्नास टक्के मार्क मिळवणाऱ्यांची म्हणजे, १००-२०० गुणसंख्या मिळवणारे कधीही नऊ टक्क्यांपेक्षा जास्त असत नाही. मग ९० टक्क्यांच्या आमच्या कोकरांचे होते तरी काय? परीक्षेकरिता स्व-अभ्यासाची गरज असते, यावरचाच विश्वास विद्यार्थी व पालकांचा उडाला आहे की काय, अशी शंका यामुळे येत राहते. पैसे भरले, क्लास लावला म्हणजे सारी जबाबदारी संपली असे पालक म्हणतात, तर कॉलेजची गरजच काय असे विद्यार्थी समजून घेतात.

‘नीट’ची परीक्षा अतिशय कठीण असते. तशीच केंद्रीय लॉ स्कूलसाठीची ‘क्लॅट’ ही परीक्षा पण. मात्र या दोन्ही परीक्षांचे स्वरूप व काठिण्य पातळी लक्षात न घेता, सरसकट क्लास लावून नाराजीची चव आयुष्यभर ओढवून घेणारे असंख्य पालक व विद्यार्थी निघतात. या दोन्ही परीक्षांची तयारी करण्यासाठी स्वतःची क्षमता काय, हे विचारातही घेतले जात नाही. दुसरी ठळक गोष्ट म्हणजे या दोन परीक्षांसाठी उपलब्ध असलेल्या एकूण जागांची संख्या जेमतेमच  असते, याचीही कल्पना पालकांना नसते. मुलांनी प्रयत्नसुद्धा करायचा नाही काय? अशा काही तरी समजेतून अपयश ओढवून घेतले जाते. त्याचा मुलांच्या आयुष्यावर कायमचा परिणाम होतो.

मुलांना नवीन काहीतरी दिसले, तर त्याचे आकर्षण असते. पण त्यातून मिळणार काय? व कामाचे स्वरूप काय असते? याची चौकशी करण्याचे काम मुलांनीच करायचे असते, हे मात्र पालक लक्षात घेत नाहीत. ते आपल्या कोकरांना छातीशी सांभाळत, प्रवेश परीक्षांच्या नादी लागतात. या साऱ्या संदर्भात एक वाक्य नीट लक्षात घेतले, तर खूप फायदा होतो. दहावीच्या मार्कांचा फुगवटा बाजूला ठेवावा. नववीचे मूळ विषयांचे मार्क पायाभूत असतात. इंग्रजी, शास्त्र व गणिताचे नववीच्या मार्कात बारावीपर्यंत फार तर पाच ते सहा टक्क्यांची भर पडू शकते. याचाच दुसरा अर्थ दहावीचा फुगवटा दहा टक्क्यांनी कमी होऊन बारावीला स्थिरावतो.

पदवीनंतरच्या अखिल भारतीय स्तरावरच्या सर्वच स्पर्धा परीक्षात आपल्या कोकरांची तयारीविना फरफट होत राहते व घसरणे चालू राहते. एम. बीए.ची प्रवेश परीक्षा असो किंवा बँकांसाठीच्या नोकरीसाठी घेतली जाणारी परीक्षा असो, दोन्हीची तयारी खरे तर पदवीच्या शेवटच्या दोन वर्षांत करणारे अनेक जण यशस्वी होतात. उदाहरणच द्यायचे झाले, तर कोणत्याही शहरातील नॅशनलाइज्ड बँकांमध्ये नोकरीला लागणारे महाराष्ट्रीय तरुण-तरुणी फार सापडत नाहीत. संरक्षण दलासाठीच्या प्रवेश परीक्षांची स्थिती यापेक्षा काही वेगळी नाही. ‘एनडीए’ची प्रवेश परीक्षा देऊन आत जाणाऱ्या महाराष्ट्रीय मुलांची संख्या जेमतेम दहावर थांबते, तर ती थोडीफार वाढून इंडियन मिलिटरी अॅकॅडमीच्या पदवीधर कमिशनसाठी दुप्पट होते एवढेच.

यावरती उपाय आहे काय?                                                                        आपले ध्येय काय? कशाकरिता अभ्यास करायचा? त्यातून काय मिळवायचे? याची समग्र आखणी दहावीनंतर करता येणे शक्य असते. त्याच्या जोडीला जे करावेसे वाटते, ज्या प्रवेश परीक्षा द्याव्या असे वाटते, त्याची साद्यंत माहिती पालक विद्यार्थ्यांनी करून घेणे गरजेचे असते. याउलट माझे मित्र अमूक क्लास लावणार आहेत. मला तोच लावायचा आहे, अशी विद्यार्थ्यांची मागणी होते व पालक ते मान्य करतात. जी प्रवेश परीक्षा द्यायची आहे, त्यासाठी बसणारे विद्यार्थी, निवडले जाणारे विद्यार्थी व त्यांची सामान्यपणे क्षमता पातळी काय असते याची माहिती घेणे हे गरजेचे असते. उदाहरणार्थ, पाचवी ते दहावी वर्गात पहिल्या पाचातील क्रमांक कधीच न सोडणाऱ्या  मुला-मुलींनी ‘जेईई’ किंवा ‘नीट’ परीक्षेसाठी प्रयत्न करणे ठीक असते.

इतरांसाठी ‘सीईटी’चा रस्ता हा खरा. अवांतर वाचन, सामान्य ज्ञान कायद्याचे मूलभूत आकलन असले, तर ‘क्लॅट’चा रस्ता योग्य ठरतो. अन्यथा हा कायदा पदवीसाठीची राज्याची ‘सीईटी’ उपयुक्त असते. पदवीदरम्यानच पुढच्या प्रवेश परीक्षांची आखणी व तयारी करणे हे गरजेचे असते. त्यासाठी दोन वर्षांतील शंभर रविवार प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाती असतात. या शंभर रविवारी फक्त दोन तास अभ्यास केल्यास, या परीक्षेची तयारी पुरेशी होते. पदवीनंतरच्या कोणत्याही प्रवेश परीक्षेचे स्वरूप हे बरेचसे सारखेच असते. दहावी समकक्ष गणित, पदवी समकक्ष आकलन क्षमता, पदवी समकक्ष इंग्रजीचे लेखी व तोंडी उपयोजन आणि मुख्य म्हणजे सामान्यज्ञान यांवर आधारित या परीक्षा असतात.

दहावीच्या निकालावर अवलंबून न राहता, पालकांनी विद्यार्थ्यांचा नववीचा पायाभूत निकाल काय आहे, तो समजून घेऊन आपल्या कोकरांना छातीशी कवटाळून न धरता, आपल्याबरोबर चालायला शिकवावे. हळूहळू बारावी संपेपर्यंत त्यांची यथावकाश प्रगती होत जाते. स्वअभ्यास हा महत्त्वाचा असतो. क्लास हा पूरक असतो, हे पक्के लक्षात ठेवावे. कोणतीही स्पर्धा ही पूर्ण तयारीनेच पूर्ण करावी लागते, तरच यश मिळते. जाता-जाता स्पर्धेत भाग घेतल्यास, अपयशाची हमखास चव चाखावी लागते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -