Thursday, May 2, 2024
Homeसाप्ताहिककिलबिल“माझी निसर्ग प्रेमनिर्मिती”

“माझी निसर्ग प्रेमनिर्मिती”

निसर्गवेद: डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

मी या पृथ्वीवर जन्म का घेतला? माझा जन्म या पृथ्वीला अजून सुंदर करण्यासाठी झालाय, माझा जन्म या पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी झालाय आणि हेच माझे कर्म आहे. माझे लहानपण मुंबईत चर्चगेटला गेले. माझे वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये इन्चार्ज असल्यामुळे आम्हाला ऑफिसर क्वार्टर म्हणजे टेरेस फ्लॅट होता. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बिल्डिंगमध्ये फक्त आमची फॅमिली राहत होती. या सिमेंटच्या जंगलात आमचे खूप lavish life होते आणि निसर्गाचे सान्निध्य म्हणजे फक्त आकाश होते. माझ्या वडिलांना निसर्गाची आवड असल्याने आमच्या टेरेस फ्लॅटवर जवळजवळ १२६ कुंड्या होत्या आणि बरेच पाळीव प्राणी, पक्षी पाळलेत. त्यामुळे शहरात राहून सुद्धा निसर्गाबद्दल जवळीक आणि प्रेम निर्माण झालं. निसर्गाच्या सौंदर्याची ओळख इथूनच झाली. कलेमध्ये, अभ्यासामध्ये त्याचे रूपांतर कधी झाले हे समजलेच नाही.

१७व्या वर्षी आर्ट टीचरचा डिप्लोमा सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून केला आणि शाळेत शिक्षिकेची नोकरी सुरू केली. शाळेत विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता स्वतःचे शिक्षण चालूच ठेवले. खरं तर इयत्ता चौथीतच स्वतःला ओळखण्याची सुरुवात झाली होती आणि त्या दिशेने वाटचाल सुरू झाली. मुळातच लहानपणापासून पक्षी, झाडे, यांची मी चित्रे काढत असे आणि त्यांच्या कागदाच्या प्रतिकृती बनवत असे. पर्यावरण संबंधित अभ्यास, भारतीय कला, संस्कृती या विषयांवरील चित्र आणि पक्ष्यांच्या कागदाच्या कलाकृती बनवायला लागले हे सर्व एकाच वेळेला चालू होते आणि तेही संसार आणि नोकरी सांभाळत. परिस्थितीमुळे काही वर्षांनी शिक्षिकेची नोकरी सोडली. इयत्ता सहावीत असताना ठरविले होते की, चित्र सर्वजण काढतात; परंतु आपण थोडं काही वेगळं करावं क्रिएटिव्ह करावं. या मनात रुजलेल्या कल्पनेवर काम करू लागले.

पंचतत्त्वांना सुदृढ करणारा सर्वात महत्त्वाचा जीव म्हणजे पक्षी. जगातील सर्वात सुंदर जीवांमध्ये पक्षी हे विविध रंगी, विविध पोत, विविध आकार, स्वभाव व गुणधर्मांमध्ये मला चॅलेंजिंग वाटले म्हणून मग मी पक्ष्यांची निवड केली. या सुंदर पक्ष्यांना जगासमोर आणणं, त्यांना वाचवणं आणि समाजाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण हाच माझा उद्देश या कलाकृती करण्यामागे होता. कागदापासून कटिंग करून त्यातून पक्षी, कीटक, जंगल हे बनवण्यास सुरुवात केली. हळूहळू मॅच्युरिटी आली. निसर्गातील प्रत्येक गोष्टींचे जमेल, तेवढे रिसर्च करून मगच कागदाच्या कलाकृती करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्ष झाडे, पाने, फुले बघून त्यावरून कागदाचे मी बारीक कटिंग करू लागले. कारण त्या वेळेला कम्प्युटर नव्हता.

कालांतराने कम्प्युटर आल्यावर हे काम खूप सोपे झाले. एक फूल जरी बनवायचे असेल तरीही त्या रंगवण्यापासून त्याच्या पाकळ्या कापणे त्याची संवर्धनासाठी काही प्रोसेस करणे यासाठी जवळजवळ २२ प्रोसेस एका फुलामागे कराव्या लागत होत्या. दोन मिलीपासून ते चार सेंटिमीटरपर्यंत पेपरची फुलं बनवली गेली. एका इंचामध्ये ७५ ते १०० कटिंग करून पक्ष्यांचे पंख बनवायला सुरुवात केली. पंख, डोळे, चोच बनवण्यासाठी १०० इमेजेस तरी एका आकारासाठी पाहिल्या. एका पक्ष्यामागे कमीत कमी हजार इमेजेस तरी मी पाहत होते. एक गोष्ट लक्षात आली की, एकाच पक्ष्यामध्ये प्रत्येक पंख हा वेगळाच असतो. प्रत्येक पंखाचा आकार रंग, शेड्स या वेगळ्याच असतात. कावळा काळा दिसला तरी ब्राऊन, ब्ल्यू, ब्लॅक अशा शेड्स असतात. वयोमानाप्रमाणे चोचींचे रंग बदलतात, आवाज बदलतो.

राग, शांतपणा, प्रेम, वात्सल्य हे सर्व भाव बदलतात. किंबहुना म्हातारपणात खूप बदल होत असतात. अगदी स्वभावातसुद्धा बदल होत असतात. पक्ष्याचे म्हातारपण न समजण्याचे कारण म्हणजे नैसर्गिक शुद्ध आहार म्हणजेच फळं, पानं, फुलं आणि निसर्गात निसर्गनियमानुसार राहणे. कागदामध्ये पक्ष्यांच्या विविध रंगछटा, त्यांचे भाव टिकताना मी खूप एन्जॉय केले. १० फुटांपासून ते ४ मिलीचे पक्षी बनवले. एक पक्षी बनवताना महिना २ महिने लागायचे. मी कितीही रिअलिस्टिक बर्ड्स बनवण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी मन असमाधानीच राहायचे. आपण निसर्गाची प्रतिकृती कधीच करू शकत नाही. नैसर्गिक रंग आपण कितीही केले तरी बनवू शकत नाही. फार तर त्याच्या जवळपास पोहोचू शकतो. कारण, हे परमेश्वरी ऊर्जेतून निर्माण झालेले जग आहे. नैसर्गिक रचनेचा अभ्यास करताना अनेक गोष्टी समजल्या. प्रत्येक झाड हे मुळापासून संवेदनशील असते. आपल्या आजूबाजूच्या झाडांची काळजी व जबाबदारी घेणारी मदर ट्री पेरेंट्सची भूमिका चोख बजावत असतात.

dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -