Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजवसुधैव कुटुम्बकम्

वसुधैव कुटुम्बकम्

ओंजळ: पल्लवी अष्टेकर

‘वसुधैव कुटुम्बकम्’ या संज्ञेचा अर्थ ‘हे विश्वची माझे घर’ असा आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून हाच संदेश संपूर्ण विश्वाला दिला. मध्यंतरी वृत्तपत्रात एक बातमी वाचनात आली, ती अशी (जी-२०) या राष्ट्रांच्या समीटमध्ये चीनने ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे वाक्य जी-२०च्या लोगोबरोबर वापरण्यास हरकत घेतली. कारण संस्कृत भाषा यू.एन.च्या मंजूर यादीत नसल्याने चीनने ही हरकत घेतली. असो.

आपली भारतीय कौटुंबिक संस्था अजूनही बळकट आहे. आई-वडिलांनी लहानपणापासून मुलांवर चांगले संस्कार केले, त्यांच्यासोबत सुसंवाद साधला, तर परस्परांशी कौटुंबिक नात्यात सहजता येते; परंतु जर कौटुंबिक संवाद हे नकारात्मक किंवा परस्परांशी तुलना, द्वेष, मत्सर करणारे असतील, तर कौटुंबिक वातावरण गढुळते व याचा परिणाम एकमेकांच्या नातेसंबंधांवर होतो. काव्याचे कुटुंब त्रिकोणी. तिचे दोन्हीकडचे आजी-आजोबा परगावी राहायचे. आई-वडिलांच्या प्रेमळ पंखाखाली तिचे बालपणाचे दिवस गेले. अति-सुरक्षिततेच्या वातावरणात. काव्याच्या आईने सदैव आपल्या मायेच्या, प्रेमाच्या कोषात तिची जपणूक केली. त्यामुळे जगाच्या टक्क्या-टोणप्यातून काव्या अलिप्त राहिली. वडिलांनीही नोकरीच्या व्यापातून माय-लेकींमध्ये कमीत-कमी लक्ष घातले. मग घरी पाहुणे आले की काव्या कायम बुजलेली, घाबरलेली असायची. तिच्या घरी नेहमी येणाऱ्या तिच्या मावशीच्या ही गोष्टं लक्षात आली. जर काव्याचा जगात वावरण्याचा आत्मविश्वास आताच वाढविला नाही, तर पुढे भविष्यकाळात ती अशीच बावरलेली राहील, अशा विचारांनी काव्याची मावशी तिला सुट्टीच्या काळात आपल्याकडे राहायला नेऊ लागली. आपल्या दोन मावस बहिणींसोबत काव्याचा वेळ चांगला जाऊ लागला.अर्थातच तिचे सामाजिकीकरण वाढले. त्यामुळे जगाचा अनुभव येऊ लागला. आपल्या सोसायटीमधील मैत्रिणींसमवेत काव्या हसू-खेळू लागली. त्यामुळे तिच्या घरातील कौटुंबिक वातावरण सुदृढ होऊ लागले. तिचा एकलकोंडेपणा दूर होऊन ती आईसमवेत विविध समारंभाना जाऊ लागली. एकूणच तिच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया घातला गेला.

सुदृढ कुटुंबव्यवस्था ही निरोगी समाजव्यवस्थेचे द्योतक आहे. ज्या घरांमध्ये परस्परांविषयी प्रेम, ओढ, आदर या गोष्टी नांदतात, त्या घरातील मुलेसुद्धा तणावमुक्त वातावरण जगू शकतात. नेहमी एकमेकांशी भांडणारे पालक, प्रत्येक लहान-सहान गोष्टींवर त्रागा करणारे कुटुंबीय असल्यास त्याचे परिणाम मुलांनाही भोगावे लागतात, अशा वेळी त्यांच्या मानसिक विकासात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपल्या कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवणे ही पालकांची, आजी-आजोबांची अशी सर्वांची जबाबदारी आहे, त्यातून मुलांची जडण-घडण चांगली होण्यास मदत होईल व भावी आयुष्यात ही मुले सुजाण नागरिक म्हणून आयुष्य जगू शकतील.

हल्ली अनेक कुटुंबात आपण तणावग्रस्त वातावरण पाहतो, त्याची कारणे विविध आहेत. आकाशच्या घरात तो, त्याचे आई-वडील व आजी-आजोबा राहायचे. आकाशचे आई-वडील दोघेही नोकरी करायचे. आकाशला लहानाचे मोठे करताना आजी-आजोबांची भरपूर मदत व्हायची; परंतु तो आता मोठा झाला तशा त्याच्या आवडी-निवडी बदलत गेल्या. आकाशची आई नोकरीला जायची, तेव्हा त्याच्या आजीने त्याला बाळबोध पद्धतीने मोठे केले होते. आता आकाशच्या वाढत्या वयामुळे त्याच्यात व आजी-आजोबा यांच्यात जनरेशन गॅप तयार झाली होती. मात्र आजी आकाशला अजून लहानच समजायची. आजी दररोज त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ करायची. पण आकाशला आता पिझ्झा, बर्गर अशा आधुनिक पदार्थांची आवड निर्माण झाली होती. त्याचे घरात रममाण होणे कमी झाले होते व मित्र-मंडळीत येणे-जाणे वाढले होते. त्यामुळे घरातले बोलणे अगदीच कमी झाले होते. आकाशच्या आई-वडिलांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी ही परिस्थिती युक्तीने व सामंजस्याने हाताळण्याचे ठरविले. आकाशच्या आईने आता गरजेनुसार फक्त अर्धवेळाची नोकरी स्वीकारली. आजी-आजोबांसोबत गप्पा करण्यास ती योग्य वेळ देऊ लागली. कधी-कधी संवादात जाणीवपूर्वक आई आकाशला सामील करून घेऊ लागली. यातून घरातले वातावरण प्रसन्न राहू लागले. कौटुंबिक वातावरण स्थिर, आनंददायी ठेवण्यासाठी प्रत्येकाने तडजोड करण्याची सवय लावून घ्यायला हवी.

एक सुसंवादाचा पूल, सेतू रुक्मिणीबाई भावे यांनी आपल्या मुलाशी विनोबाशी बांधला होता. रुक्मिणीबाई परोपकारी स्वभावाच्या होत्या. मानवता हाच खरा धर्म आहे यावर त्यांचा विश्वास होता. त्या कधी शाळेत गेल्या नव्हत्या, पण त्यांना जेमतेम अक्षर ओळख होती. त्या पहाटे गोड आवाजात भूपाळ्या म्हणायच्या. आईने शिकविलेली स्तोत्रं, श्लोक विनोबा पाठ करायचे. आईकडून विनोबांना संस्काराचे लेणे मिळाले.

विनोबांच्या घरी नेहमीच खूप पाहुणे येत. त्याकाळी गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या हेतूने वेगवेगळ्या घरांमध्ये राहत असत. विनोबांच्या घरातही असे विद्यार्थी असायचे. तेव्हा विनोबांची आई बाहेरच्या मुलांना ताजे अन्न वाढायची व अन्न कमी पडल्यास आपल्या मुलांना शिळे अन्न वाढायची. धन्य ती माता! आपल्या अशा कर्तव्यतत्पर, प्रेमळ आईकडे पाहून विनोबा मोठे होत होते. एकदा विनोबांनी याबद्दल आपल्या आईला विचारले, “आई, तू या विद्यार्थ्यांना ताजे व आम्हाला शिळे अन्न का वाढतेस?” त्यावेळी विनोबांच्या आईने उत्तर दिले, “विनू, अतिथी देवो भव. हा आपला धर्म आहे. अतिथी हे देव असतात. मग देवांना गार झालेलं, शिळे अन्न वाढायचं का? तूच सांग.” विनोबांच्या समोर त्यांची आभाळाएवढ्या मनाची आई असायची. रुक्मिणीबाई म्हणायच्या, “विनू भीती ही आपल्या मनात असते, ती मनातून काढून टाकावी.” अशा तऱ्हेने निर्भयतेचा वसा विनोबांना आईकडून मिळाला. यातून विनोबांकडून सर्वसामान्यांकडून न घडणारे अतिशय चांगले कृत्य घडले. ते असे, की त्यावेळी चंबळच्या खोऱ्यात दरोडेखोर राहायचे.

विनोबा काही काळ त्यांच्याजवळ जाऊन राहिले आणि आपल्या साध्या, सरळ मार्गदर्शनाने त्यांनी त्या दरोडेखोर डाकूंचे मन:परिवर्तन घडवून आणले. रुक्मिणीबाईंनी आपली तीनही मुले राष्ट्राला अर्पण केली.  येऊ घातलेली पिढी ही सक्षम, विचारांनी सुदृढ घडवायची असेल, तर कुटुंबांमध्ये सुसंवाद घडणे आवश्यक आहे, नाहीतर निव्वळ एकमेकांशी जुजबी नाती ठेवणारी रूक्ष कुटुंबं तयार होतील. कौटुंबिक विसंवाद टाळण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. जसे की, कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या लहान-सहान गोष्टीत लुडबूड करणे टाळावे, प्रत्येकाच्या वैचारिक स्वातंत्र्याचा आदर करावा. षडरिपूंवर ताबा मिळविणे, छोट्या-मोठ्या कारणांवरून वितंडवाद टाळावा. यातून जीवनात आवश्यक अशी मन:शांती प्रत्येकाला प्राप्त होईल. खंबीर पालक, सद्सद्विवेकबुद्धीची जाण असलेली कुटुंब यातून आपली मुलेही तशीच घडतील. सोनेरी भवितव्यासाठी ती एक चाहूल असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -