Sunday, May 5, 2024
Homeक्रीडामुंबई विजयाच्या उंबरठ्यावर

मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर

६६२ धावांची भक्कम आघाडी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

बंगळूरु (वृत्तसंस्था) : यशस्वी जयस्वाल (१८१ धावा) आणि अरमान जाफर (१२७ धावा) या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या मोठ्या भागीदारीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील दुसऱ्या डावात ६६२ धावांची डोंगराएवढी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मुंबईचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून तसे झाल्यास मुंबई अंतिम फेरीत प्रवेश करेल.

अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक वेळा विजेतेपद उंचावलेल्या मुंबईने यंदा आपला धमाका कायम ठेवला. उत्तर प्रदेश विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी यशस्वी जयस्वाल आणि अरमान जाफर या जोडीने कमालीची फलंदाजी केली. जयस्वालने १८१ धावांची मॅरेथॉन खेळी खेळली. त्याला अरमान जाफरने चांगली साथ दिली. जाफरने १२७ धावांची खेळी खेळली. मुंबईने चौथ्या दिवसाअखेर ४ फलंदाजांच्या बदल्यात ४४९ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईने ६६२ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात उत्तर प्रदेशचा प्रिंस यादव बळी मिळवण्यात यशस्वी ठरला. त्याने दोन बळी मिळवले. शिवम मावी आणि सौरभ कुमार यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

दरम्यान मुंबईने उत्तर प्रदेशला पहिल्या डावात १८० धावांवर सर्वबाद केले. तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, तनुष कोटीयन या मुंबईच्या त्रिकुटाने उत्तर प्रदेशच्या फलंदाजीचा कणाच मोडला. या तिघांनीही प्रत्येकी ३ फलंदाज बाद करत उत्तर प्रदेशला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. धवल कुलकर्णीने एक बळी मिळवला. त्यामुळे उत्तर प्रदेशचा पहिला डाव अवघ्या १८० धावांवर आटोपला होता.

तत्पूर्वी पहिल्या डावातही मुंबईची फलंदाजी बहरली. यशस्वी जयस्वालने पहिल्या डावातही शतकी कामगिरी केली होती, तर हार्दिक तामोरेनेही शतक झळकावले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -