Friday, May 3, 2024
Homeमहत्वाची बातमीपुढच्या ४८ तासात मान्सून कोकणात दाखल होणार

पुढच्या ४८ तासात मान्सून कोकणात दाखल होणार

हवामान विभागाची माहिती

मुंबई : कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी अखेर कोकणात येणार आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढच्या ४८ तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यापूर्वी मान्सून यंदा लवकर येणाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र, मान्सूनच्या आगमनासाठी थोडा उशीर झाल्याचे दिसत आहे.

राज्यातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाची वाट बघत आहेत. कोकणात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर पुढच्या ४ दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकतील असे सांगण्यात आले आहे. तळकोकणात पुढच्या ४८ तासात मान्सून दाखल होणार आहे. तर राज्याच्या अन्य काही ठिकाणी उष्णतेची लाट असल्याची स्थिती देखील आहे. पुढील चार दिवसात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी

राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नवी मुंबईत सकाळी जोरदार पाऊस पडला. हिंगोली, अमरावती, सातारा नाशिकसह कोकणातील काही भागात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही भागातही पावसाने हजेरी लावली. या पावसाचा केळी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. हिंगोलीत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकरवरील केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे.

तर नाशिकच्या मनमाडमध्येही जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांवरील पत्रे उडाले आहेत. अमरावतीच्या धामणगाव इथे टोल प्लाझाचे छप्पर उडाले आहे.

उत्तर रत्नागिरीत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. काल संध्याकाळी चिपळूण, खेड, दापोलीत पावसाने दमदार हजेरी लावली.

दरम्यान, कोकणच्या काही भागासह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्याने उकाडा चांगलाच वाढला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -