Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीकोयता गॅंगची दहशत कायम; कोयते नाचवत शिवीगाळ, एकास मारहाण

कोयता गॅंगची दहशत कायम; कोयते नाचवत शिवीगाळ, एकास मारहाण

नवीन नाशिक परिसरात टवाळखोरांचा धुमाकूळ

नवीन नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोयता गँगची दहशत कायम असून रविवारी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास कोयता गँगने रस्त्यावर शिवीगाळ करत आणि कोयता आपटत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

अंबड पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या दत्त चौक भागात अज्ञात अशा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन परिसरात जोर-जोरात शिवेगाळ करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने पोलिस यंत्रणा जागी झाली असून आरोपींचा शोध सुरु झाला आहे. तथापि, असे प्रकार वारंवार घडू लागल्याने या परिसरात पोलिसांचा धाक आहे की नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सिडकोतील दत्तचौक परिसरातील स्वामी समर्थ केंद्रा जवळ रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी परिसरातून पायी चालत जोरजोरात शिवीगाळ केली. त्यातील एक – दोन टवाळखोरांच्या हातात धारदार कोयते होते. हे टवाळखोर फोनवर कोणाशी तरी संपर्क साधत जोरदार शिवीगाळ करीत भर रस्त्यात कोयते आपटत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. रविवारच्या सुमारास ही घटना घडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दर सात ते आठ दिवसांनी सदर टवाळखोर हे दत्त चौक भागात दहशत माजवत असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. याबाबत अंबड पोलिसांकडे तक्रार करूनही या टवाळखोरांचा टोळक्याचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अंबड पोलीस येताच हे टवाळखोर जागेवरून पळ काढत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. दिवसाढवळ्या तसेच सायंकाळच्या सुमारास परिसरातून धारदार कोयते व जोरदार शिवीगाळ सततच सुरू असल्याने नागरिकांनी सांगावे तरी कोणाला असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे परिसरातील महिला वर्गासह युवक, युवतीं मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन कधी?

पोलिस आयुक्त आयुक्त अंकुश शिंदे यांनी अंबड परिसरातील कायदा – सुव्यवस्था सुरळीत व्हावी या उद्देशाने पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हे पोलिस निरीक्षक म्हणून चांगली कामगिरी केलेले पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांच्यावर अंबड पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपवली. कारभारी बदलले, तरी परिस्थितीत मात्र कुठलाच बदल झालेला दिसत नाही. पोलिस ठाण्याचे उपलब्ध मनुष्य बळ, कार्यक्षेत्राचा एकूण आवाका या बाबीही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कळीचे मुद्दे आहेत. या पोलिस ठाण्याचे विभाजन व्हावे या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागणीवर सकारात्मक विचार व्हायला हवा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -